शिक्षक होणे हे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. त्यामधील काही विद्यार्थी हे त्यांना आदर्श वाटणाऱ्या शिक्षकांकडून प्रेरणा मिळवत असतात आणि शिक्षक होण्याचे स्वप्न बाळगून असतात. तेच स्वप्न सत्यात उतरल्याचे वर्णन “मी शिक्षक झालो तर..” (Mi Shikshak zalo Tar) या निबंधात करायचे असते.
शिक्षक होण्याचे स्वप्न | मी शिक्षक झालो तर | Mi Shikshak Zalo Tar |
आजचा दिवस खूपच महत्त्वपूर्ण होता. आज पाटील सरांचा निरोप समारंभ होता. लगबग 35 वर्षे ते शाळेची सेवा करून निवृत्त होणार होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद साफ झळकत होता. पाटील सर सर्वांचे लाडके होते. त्यांची निवृत्ती पाहून माझ्याही मनात विचार आला की मी शिक्षक झालो तर…
शिक्षक होण्याची प्रेरणा आपल्याला कोणीतरी आपला आदर्श व्यक्तीच देऊ शकतो. तशी प्रेरणा मला आज मिळाली होती. शिक्षक होणे ही केवळ उपाधी नाही तर तो एक समाजमनाचा आरसा आहे. शिक्षक समाजातून घडतो आणि समाज घडवतो. त्यामुळे मी शिक्षक झालो तर नक्कीच माझा उद्देश्य माझ्या व्यक्तिगत स्वार्थापेक्षा समाजहितासाठी असेल.
विद्यार्थी शिक्षण घेतात ते शिक्षणच त्यांचे आयुष्य घडवत जाते. माझा दृष्टिकोन सतत उत्तमोत्तम शिक्षण देण्याचा असेल. प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे असे मला मनोमन वाटते. जर मनुष्य भाषा शिकला तर तो स्वतःसाठी चांगला विचार करू शकेल त्यामुळे माझी जबाबदारी विद्यार्थ्यांना चांगले विचार अंगी बाणवण्याची असेल.
अनेक विद्यार्थी हे शिक्षकांना घाबरत असतात. मी त्यांना खेळी मेळीत शिक्षण देण्याचा प्रयत्न करेन ज्याद्वारे ते शिक्षणाला आणि शिक्षकांना आपलेसे करून घेतील. एकदा का विद्यार्थी शिक्षकांना घाबरला तर त्याचे विचार व अस्तित्व संकुचित बनत जाते. विद्यार्थ्यांची भीती नाहीशी करून त्यांना मुक्त वातावरणात चौकस बुद्धीने शिक्षणाचे स्वातंत्र्य प्रदान करेन.
जसा विद्यार्थी घरी असताना आपल्या पालकांचे अनुकरण करतो त्याचप्रमाणे शाळेत असताना तो शिक्षकांचे अनुकरण करत असतो. त्यामुळे शिक्षकाचे वागणे, बोलणे आणि स्वभाव हा विद्यार्थ्यांना समजून घेणारा असला पाहिजे. त्यानुसार मग ते भविष्यात घडत जातील.
शाळेत मला नेहमी भाषेचे विषय शिकवायला आवडतील कारण त्याद्वारे मन आणि बुद्धीची दारे खुली होतात. केवळ शाळेच्या ठरलेल्या वेळेत नाही तर संपूर्ण दिवस हा विद्यार्थ्यांना उपक्रमशील कसा बनवता येईल त्याबद्दल उपाय योजना करेन. विद्यार्थी हा फक्त शाळेत बौद्धिक हुशार न बनवता त्याचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू घडवण्याचा माझा प्रयत्न असेल.
शाळेचा संपूर्ण वेळ हा फक्त तार्किक शिक्षणात न घालवता शारीरिक शिक्षण, नृत्य, संगीत, चित्रकला, तसेच विविध उपक्रम साजरे करणे यामध्ये व्यतित करेन. त्यानुसारच शाळेचे वेळापत्रक असेल. त्यानुसार विद्यार्थी हा शाळेत आल्यावर आनंदी, मुक्त आणि स्वतंत्र अनुभव करू शकेल असे मला वाटते.
मी शिक्षक झालो तर खरेच एखादी पिढी घडवल्याचे सार्थक मला वाटत राहील. स्वतःच्या स्वार्थापलिकडे जाऊन भावी समाज उन्नत, प्रगत आणि ध्येयनिष्ठ बनवण्याचा माझा प्रयत्न असेल. विद्यार्थ्यांशी जास्त कठोरपणे न वागता त्यांना शिस्त आणि मानवी मूल्ये शिकवण्याचा प्रयत्न करेन.
संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला मी शिक्षक झालो तर… (Mi Shikshak Zalo Tar…) हा निबंध कसा वाटला, त्याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा…