प्रस्तुत लेख हा मकर संक्रांत या सणाबद्दल सर्व माहिती सांगणारा असा निबंध आहे. वर्षाच्या सुरुवातीस येणारा हा सण धार्मिक, सांस्कृतिक आणि भौगोलिकदृष्ट्या अति महत्त्वाचा सण मानला जातो. विद्यार्थ्यांना या सणाबद्दल सर्व आवश्यक माहिती मुद्देसूद स्वरूपात लिहावी लागते. चला तर मग पाहुयात कसा लिहायचा मकर संक्रांत मराठी निबंध (Makar Sankrant Marathi Nibandh)!
मकर संक्रांत सण – निबंध लेखन | Makar Sankrant Essay In Marathi |
मकर संक्रांत हा पौष महिन्यात येणारा एक शेतीसंबंधित, भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व ठेवणारा सण आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यावर इसवी सनाच्या सुरुवातीच्या काही दिवसात सूर्य मकर राशीत संक्रमण करत असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य पूर्णपणे मकर राशीत प्रवेश करतो.
मकरसंक्रांत हा सण १४ जानेवारी आणि लिप वर्ष असल्यास १५ जानेवारीला असतो. या दिवसांमध्ये उगवलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकींना देतात. ववसा देणे, ओटी भरणे, आणि हळदी कुंकू असे विविध कार्यक्रम या सणात साजरे केले जातात.
भोगी, संक्रांत आणि किंक्रांत अशा तीन दिवशी साजरा होणाऱ्या मकर संक्रांत या सणाला महाराष्ट्रात शेतकीय महत्त्व देखील आहे. हरभरा, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ असे सर्व पदार्थ देवाला अर्पण केले जातात.
संक्रांतीअगोदरचा दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा केला जातो. या दिवसांमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व शेंगभाज्या, फळभाज्या आणि तिळ यांची एकत्र अशी मिश्र भाजी बनवली जाते. त्यासोबत तिळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी आणि मुगाची खिचडी आवर्जून खाल्ली जाते.
सुगड पूजन म्हणजेच पाच छोटी मडकी पूजण्याची प्रथा देखील केली जाते. यामध्ये भोगी दिवशी बनवलेले थोडेसे जेवण ठेवले जाते. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीला ते जेवण प्रसाद म्हणून सर्वांना वाटले जाते.
संक्रांतीच्या दिवशी सर्व कुटुंबीयांना, आप्तेष्टांना व शेजारी-पाजारी सर्वांना तिळगुळ वाटले जातात. “तिळगुळ घ्या गोड बोला” असे बोलले जाते. तिळगुळ वाटण्यातून सर्वांप्रती असणारा स्नेहभाव व प्रेमभाव दर्शविला जातो.
स्त्रियांसाठी मकर संक्रांती दिवसापासून हळदी-कुंकू लावण्यास सुरुवात होते. हळदी-कुंकू लावण्याचा शेवट “रथसप्तमी” या दिवशी होतो. तसेच संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी काळी साडी नेसण्याची प्रथा देखील आहे.
तिळात खूप स्निग्धता असल्याने त्याचा वापर तिळगुळ बनवण्यात करतात. स्नेहाची गोडी वाढावी म्हणून गुळात टाकून तिळगूळ बनवले जातात. येथे स्नेह म्हणजे तिळ असे अभिप्रेत आहे, तर गूळ हा गोड पदार्थ म्हणून प्रचलित आहे.
मकर संक्रांत मराठी निबंध (Makar Sankrant Marathi Nibandh) तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा… धन्यवाद!