कर्तव्य दिले परी ते निभावून सुटलो ! या उक्तीप्रमाणे जर शब्द दिला तर प्राण गेले तरी बेहत्तर.. अशी वर्णने कितीतरी शूरवीर बाजी प्रभू देशपांडे यांना कमी पडतील. शिवराय घडले, राजे झाले आणि स्वराज्य स्थापिले. या स्वराज्यात कितीतरी बलिदान लौकिकाला आलेली आहेत. फक्त एक पराक्रम आणि आयुष्याची सांगता करणारा हा योद्धा किती कणखर दिलाचा असेल!
शिवरायांनी जे मावळे घडवले ते त्यांच्या जीवाला जीव देणारे होते. वीर बाजी प्रभू देशपांडे यांचा घोडखिंडीतील पराक्रम कुठल्या युद्धापेक्षा कमी नाही. शिवाजी राजे विशाळ गडापर्यंत पोहचे पर्यंत शत्रूंना एका खिंडीत अडवून धरणे असा सळसळते रणकंदन बाजी प्रभूंनी घडवून आणले.
बाजी प्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले होते. बाजी प्रभू हे हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या बांदलांचे दिवाण होते. परंतु त्यांचे शौर्य आणि व्यक्तिमत्त्व अफाट होते. वयाच्या पन्नाशीत देखील २० तास काम करणारा सच्चा मावळा होता. त्यांचा त्याग, स्वाभिमान, करारी स्वभाव वाखाणण्याजोगा होता.
पावनखिंडीतील लढाई – अखेरचा श्वास !
सिद्दी जौहर आपल्या सैन्याच्या मदतीने पन्हाळगडाशेजारी आला. त्याने पन्हाळगडाला वेढा दिला. काही सरदार, मावळे आणि शिवाजी महाराज यांना गडावर स्थानबद्ध केले. हा वेढा फोडण्यासाठी नेताजी पालकरांना वारंवार अपयश येत होते. आता एक धोक्याचा मार्ग पत्करला जाणार होता.
शिवा न्हावी हा महाराजांसारखा दिसत असे. या शिवा न्हाव्याला महाराजांची कपडे घालण्यात आली आणि महाराजांनी मावळ्याचा वेष परिधान केला. शिवा न्हाव्याला महाराजांच्या मेण्यात बसवण्यात आले. बाजी प्रभू, शिवाजी महाराज आणि सैन्य आतून वेढा फोडतील असा बेत ठरला.
जवळजवळ ६०० मावळे, बाजी – फुलाजी बंधू आणि शिवाजी महाराज वेढा फोडण्यात यशस्वी झाले. शत्रूने पाठलाग करून शिवाजी महाराज समजून शिवा न्हाव्याला पकडून आणले. तो पर्यंत शिवाजी महाराज खूप दूरवर सरशी करण्यात यशस्वी झाले. सर्वजण विशाळगडाच्या दिशेने कूच करत राहिले. शिवा न्हावी स्वतःच्या जीवावर खेळत होता. त्याला याची संपूर्ण कल्पना होती की जेव्हा सत्य समजेल तेव्हा आपले प्राण घेतले जाणार.
फसवणूक झालेली आहे असे कळताच विजापुरी सैन्य भलेमोठे संख्याबळ घेऊन महाराजांचा पाठलाग करू लागले होते. शत्रुसैन्य जास्त असल्याने विशाळ गडापर्यंत पोहचेन याची शाश्वती देता येत नव्हती. बाजी प्रभूंच्या आग्रहाखातर आणि पुढचा धोका लक्षात घेता शिवराय आणि सोबत ३०० मावळे विशाळगडाकडे निघाले. विशाळगडावर पोहचताच तोफेची सलामी होईल अशी ग्वाही शिवरायांनी बाजीप्रभू यांना दिली.
आता बाजी आणि फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत म्हणजेच घोडखिंडीत उभे ठाकले. सिद्दीच्या हजारोंच्या सैन्याला ३०० मावळ्यांनी हतबल करून सोडले होते. घोडखिंडीत अरुंद रस्ता असल्याने संपूर्ण सैन्य एकदम चालून येऊ शकत नव्हते. त्यातच फुलाजी देशपांडे धारातीर्थी पडले परंतु खचून न जाता लढा चालूच होता. स्वतःच्या शरीरावर झालेल्या जखमांचा देखील विसर पडला होता. तोफेच्या आवाजाकडे संपूर्ण लक्ष लागून राहिले होते. जो पर्यंत तोफेचा आवाज होत नाही तोपर्यंत प्राण सोडणार नाही आणि लढतच राहीन असा प्रण घेतलेले बाजी प्रभू लढले, घोडखिंड गाजवली. लढण्याची तीव्रता एखाद्या तरुणाला देखील लाजवेल अशी होती. तब्बल २१ तास चालल्यानंतर ६ ते ७ तास खिंड लढवून तोफेचा आवाज ऐकू येताच शिवाजी राजे पोहचले याचा आनंद आणि कर्तव्यपूर्तीचे समाधान चेहऱ्यावर ठेवून बाजीप्रभूंनी प्राण सोडला.
Pavankhind | घोडखिंड बनली पावनखिंड!
ही घोडखिंड कोल्हापूर जिल्ह्यात आहे. ह्या पराक्रमाची तारीख १३ जुलै १६६० अशी आहे. बाजी आणि फुलाजी या दोन्ही बंधूंचे अंत्यसंस्कार विशाळगडावर शिवाजी राजांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्या दोन्ही बंधूंची समाधी विशाळगडावर आहे. मराठी मावळे आणि बाजी – फुलाजी यांच्या रक्ताने पवित्र झालेल्या या खिंडीस ” पावनखिंड ” असे नामकरण करण्यात आले. असा हा स्वामिनिष्ठ, महापराक्रमी, महान योद्धा शतकानुशतके मराठी माणसाच्या हृदयावर राज्य करीत राहील हे मात्र नक्की. अशा या शूरवीर सरदारास कोटी कोटी प्रणाम ! जय महाराष्ट्र !