“विराट कोहली” एक असे नाव जे भारतीय क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तळपत आहे. स्वतःच्या फलंदाजीने पूर्ण क्रिकेट विश्वाला भुरळ घालणारा हा फलंदाज देि मॉडर्न लेजंड नावाने प्रसिद्ध कसा झाला आणि त्याच्या या यशामागे कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत त्याचा आढावा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न.
चिकू, किंग कोहली, रन मशीन या टोपण नावांनी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू मैदानात उतरताच सर्व क्रिकेट रसिकांचा एकच जल्लोष असतो. मूळचा दिल्लीचा रहिवासी असणारा हा फलंदाज, त्याची क्रिकेट खेळण्याची सुरुवात कशी झाली, त्याला क्रिकेट बद्दल एवढे आकर्षण आणि चिकाटी निर्माण कशी काय झाली याबद्दल अगोदर जाणून घेऊ. कोहली लहानपणापासून क्रिकेट खेळत आहे. दररोज काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा त्याला इतरांपासून थोडे वेगळे बनवते. प्रत्येक दिवशी स्वतःचा खेळ आणखी सुधारत जाणे हेच त्याचे उद्दिष्ट होते.
जन्म आणि क्रिकेटची आवड –
विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ मध्ये दिल्ली येथील एका पंजाबी कुटुंबामध्ये झाला. व्यवसायाने वकील असणाऱ्या त्याच्या वडिलांचे नाव प्रेम कोहली आहे आणि आईचे नाव सरोज कोहली असे आहे. त्याला एक मोठा भाऊ आणि एक मोठी बहीण आहे. त्यांची नावे विकास आणि भावना आहेत.
कोहलीचे टोपण नाव “चिकू” आहे त्याचे हे नाव प्रशिक्षक राजीव शर्मा यांनी ठेवले आहे. लहानपणापासून चिकू हातात बॅट घेऊन वडिलांना गोलंदाजी करायला लावायचा. त्याची ही आवड ओळखून शेजाऱ्यांनी प्रेम कोहलींना, त्याला अकॅडमीत भरती करा असे सांगितले. त्याचे प्राथमिक शिक्षण विशाल भारती पब्लिक स्कूलमध्ये चालू होते शिवाय त्याला पश्चिम दिल्ली क्रिकेट अकॅडमीमध्ये देखील भरती करण्यात आले. अकॅडमीत त्याला प्रशिक्षक राजकुमार शर्मा उर्फ राजीव शर्मा यांचे प्रशिक्षण लाभले. ह्या व्यवसायिक क्लब मधून तो क्रिकेटचे धडे गिरवत गेला. क्रिकेटमधील जास्त सरावासाठी दिल्लीतील पश्चिम विहार नावाच्या वसाहतीमधील सेवियर कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला.
कोहली लहानपणापासूनच हुशार आणि चपळ असल्याने तो क्रिकेटमध्ये खूपच प्रगती करत गेला. कोहलीच्या वडिलांचे १८ डिसेंबर २००६ रोजी मेंदूच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे निधन झाले असताना कोहलीची कसोटी क्रिकेट मॅच चालू होती. वडिलांच्या दुःखद मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी तो क्रिकेट मॅच खेळायला जाणे हे अनेक जणांना आश्चर्यचकित करणारे होते. परंतु आजचा किंग कोहली पाहता त्यावेळीही असणारे त्याचे क्रिकेटबद्दलचे वेड दिसून येते. वडिलांचा अभाव त्याला खूप जाणवतो, असे त्याने खूप वेळा नमूद केले आहे. त्याचे वडील त्याला सतत सरावासाठी घेऊन जायचे. त्यांच्या पाठिंब्यामुळे मी क्रिकेट खेळू शकलो अशी टिप्पणी देखील तो वारंवार करत असतो.
क्रिकेट करियरचा पाया –
• २००३-०४ साली “पॉली उम्रीगर ट्रॉफी”साठी त्याची संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली. त्या स्पर्धेत त्याने दोन शतके झळकावली.
• २००४-०५ मध्ये विजय मर्चंट ट्रॉफीसाठी १७ वर्षांखालील दिल्ली संघात निवडला गेला. त्या स्पर्धेत त्याने दोन शतकांसह ४७० धावा केल्या.
• २००५-०६ मध्ये दिल्लीने विजय मर्चंट ट्रॉफी जिंकली. त्या स्पर्धेत कोहली सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज होता. त्याने ७ सामन्यांत तीन शतकांसह ८४.११ च्या सरासरीने ७५७ धावा केल्या.
• जुलै २००६ मध्ये कोहली इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारताच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघात निवडला गेला. भारताच्या क्रिकेट संघाने १९ वर्षांखालील क्रिकेट सामन्यांच्या दोन्ही वनडे आणि कसोटी मालिकांमध्ये विजय मिळवले.
• सप्टेंबर महिन्यात भारताच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केला. कोहलीने या दौऱ्यात, कसोटी मालिकेत ५८ तर एकदिवसीय मालिकेत ४१.६६ च्या सरासरीने धावा केल्या.
• नोव्हेंबर २००६ मध्ये, तो १८ वर्षांचा असताना तामिळनाडूविरुद्ध प्रथम श्रेणी सामन्यात पदार्पण केले.
• याच काळात डिसेंबर महिन्यात त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्या वेळी निधनानंतर ही कर्नाटक विरूध्द त्याने जी ९० धावांची खेळी साकारली त्यावेळी तो खरा प्रसिद्ध झाला. त्यावेळी तो बाद झाल्यानंतर वडिलांच्या अंत्यविधीसाठी गेला.
• या घटनेनंतर तो खूप बदलला. प्रत्येक सामना त्याने खूप गंभीरपणे घेतला. प्रत्येक सरावसत्र जणू मॅचप्रमाणे घेऊ लागला. त्याच आयुष्य म्हणजे क्रिकेटच अशी जाणीव त्याने त्याच्या खेळण्यातून करून दिली.
• जुलै-ऑगस्ट २००७ मध्ये भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचा श्रीलंकेचा दौरा होता. श्रीलंका, बांगलादेश आणि भारत या तिन्ही देशांच्या त्रिकोणी मालिकेत त्याची फलंदाजी खूपच सुधारली होती. त्याच्याकडे या मालिकेत खेळपट्टीवर तग धरून धावा जमवत राहण्याचे कौशल्य आले होते.
• फेब्रुवारी-मार्च २००८ मध्ये भारतीय 19 वर्षाखालील संघाने मलेशिया येथे पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. या स्पर्धेत त्याने ६ सामन्यांत ४७च्या सरासरीने त्याने २३५ धावा केल्या. या विजेतेपदानं तर कोहली भारताचे भविष्य म्हणून उदयास येऊ लागला.
कारकिर्दीची सुरुवात –
तेंडुलकर आणि सेहवाग उपलब्ध नसल्याने सलामीवीर म्हणून विराट कोहलीने ऑगस्ट २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले. सलामीच्या सामन्यात कोहली १२ धावांवर बाद झाला. उर्वरित सामन्यांत त्याने ३७, २५, ५४ आणि ३१ धावा काढल्या.
नंतर सप्टेंबर २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध भारत अ संघात त्याची निवड अनधिकृत कसोटी मालिकेसाठी झाली. त्याला एकदाच फलंदाजी मिळाली. त्या डावात त्याने ४९ धावा केल्या.
नोव्हेंबर २००८ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी कोहलीला निवडण्यात आले. परंतु तेंडुलकर आणि सेहवाग असल्यामुळे त्याला एकही सामना खेळता आला नाही.
जुलै – ऑगस्ट २००८ मध्ये उदयोन्मुख खेळाडूंच्या स्पर्धेसाठी त्याची निवड भारतीय संघात करण्यात आली. या स्पर्धेत त्याने ६६.३३ च्या सरासरीने सर्वाधिक ३९८ धावा केल्या. अंतिम सामन्यात त्याने १०४ धावांची खेळी साकारली. तो सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने १७ धावांनी जिंकत विजेतेपद पटकावले.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याची निवड झाली. जखमी युवराज सिंहच्या जागी तो चौथ्या क्रमांकावर खेळला. वेस्ट इंडिज विरूध्द १३० धावांचा पाठलाग करताना त्याने ७९ धावांची खेळी साकारली. या सामन्यात प्रथमच त्याने क्रिकेटमध्ये “सामनावीर” हा पुरस्कार पटकावला.
डिसेंबर २००९ मध्ये मायदेशात श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत त्याने पहिल्या दोन सामन्यात २७ व ५४ धावा केल्या. तिसरा सामना युवराज सिंह खेळला. पुन्हा दुखापत झाल्याने युवराज चौथा सामना खेळू शकला नाही. यावेळी कोहलीने शानदार १११ चेंडूत १०७ धावा केल्या. त्याचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक होते.
जानेवारी २०१० मध्ये बांगलादेश, श्रीलंका आणि भारत या संघांमध्ये त्रिकोणी मालिका झाली. या मालिकेत तेंडुलकरला विश्रांती दिली गेल्याने सर्व सामने खेळण्याची संधी कोहलीला मिळाली. या मालिकेत त्याने दोन अर्धशतके आणि एक शतक झळकावले. त्याने पाच सामन्यांमध्ये ९१.६६ च्या सरासरीने २७५ धावा केल्या.
फेब्रुवारी २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याने दोन सामन्यांत त्याने ३१ आणि ५७ धावा केल्या.
मे – जुन २०१० मध्ये होणाऱ्या मालिकेसाठी त्याची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली. अनुभवी खेळाडूंना श्रीलंका, झिम्बाब्वे, भारत या संघांच्या त्रिकोणी मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. कोहलीने मालिकेत दोन अर्धशतकाच्या मदतीने ४२ च्या सरासरीने १६८ धावा केल्या. यादरम्यान तो भारतातर्फे सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला.
जून २०१० मध्ये आशिया चषक स्पर्धेत कोहली फक्त १६.७५ च्या सरासरीने ६८ धावा जमवू शकला तर पुढच्याच मालिकेत म्हणजे ऑगस्ट २०१० मध्ये न्यूझीलंड, श्रीलंका आणि भारत या त्रिकोणी मालिकेत देखील त्याने फक्त १५ च्या सरासरीने धावा केल्या.
यानंतर ऑक्टोबर २०१० मध्येच ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत दुसऱ्या सामन्यात २९० धावांचा पाठलाग करताना वैयक्तिक तिसरे शतक झळकावून कोहलीने भारताला तो सामना जिंकून दिला. त्यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली. कोहलीने पहिल्या एकदिवसीय सामन्यात १०४ चेंडूत १०५ धावांची शानदार खेळी करत कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले.
जानेवारी २०११ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध च्या मालिकेत त्याने दोन अर्धशतकांसह ४८.२५ च्या सरासरीने त्याने १९३ धावा केल्या. त्यानंतर विश्वचषक २०११ साठी १५ खेळाडूंच्या यादीत कोहलीचे देखील नाव होते.
विश्वचषक स्पर्धा म्हणजे एक स्वप्नवतच होते. कर्णधार धोनीने विराट कोहलीला नियमित खेळवले. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने नाबाद १०० धावा केल्या आणि कारकिर्दीतील ५ वे शतक झळकावले. पुढच्या पाच सामन्यांत त्याने ८, ३४, १२, १ आणि ५९ अशा धावा केल्या. पुढच्या फेरीतील ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्ध त्याने अनुक्रमे २४ आणि ९ धावा केल्या. हे दोन्ही सामने भारताने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. २७५ धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर तेंडुलकर आणि सेहवाग लवकर गमावल्याने गंभीर सोबत कोहलीने केलेली ८३ धावांची भागीदारी महत्वाची होती. तीच भागीदारी सामन्याचा टर्निंग पॉइंट असल्याचे अनेक जाणकार मानतात. या भागीदारीत त्याचा ३५ धावांचा वाटा होता. हा सामना जिंकत भारताने विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न साकार केले.