“काही पुस्तके भलतीच छंद देऊन जातात. आज या तंत्रज्ञानाच्या युगात नक्कीच खूप कमी लोक वाचनाचा छंद जोपासून असतील. तरीही जर पुढच्या पिढीला वाचनाचा अभिजात अनुभव जाणून घ्यायचा असेल आणि रोजच्या जीवनापेक्षा उदात्त अशा काही संकल्पना अनुभवायच्या असतील तर मराठी साहित्य आणि काही पुस्तके त्यासाठी खूपच उपयुक्त ठरतील”
आज आम्ही अशाच प्रकारच्या ५ पुस्तकांबद्दल माहिती सांगणार आहोत जी तुम्हांला एक वेगळेच विश्व देऊन जातील. जीवनातल्या विविध पैलुंवर विचार करायला लावणारी अशी ही पुस्तके आहेत.
Table of Contents
१.श्यामची आई-
आपला आईबद्दल रोजचा अनुभव तसा कुरकुर करण्यातच जात असतो. आईलाच खूप साऱ्या गोष्टी आपण समजवत असतो. आपण फक्त बुद्धीच्या पातळीवर विचार करत असतो पण तिचे काम व तिची कुटुंबात,आपल्या मुलांत असणारी समरसता आपण जाणून घेत नाही. श्याम, त्याची परिस्थिती, जीवनाची उत्सुकता, गुरुस्थानी असणारी त्याची आई,आणि मानवी संवेदनशील मन या सर्वांचे कथन “श्यामची आई ” या पुस्तकात केलेले आहे.
साने गुरुजी कसे घडले असतील याचं उत्तर या पुस्तकात सापडतं. आईने वेळोवेळी केलेले संस्कार साने गुरुजींच्या आयुष्यात कसे उपयोगी आले हे काही प्रसंगाच्या माध्यमातून योग्यरित्या मांडण्यात आले आहे. आज आपण मुलांना फक्त वरचेवर संस्कार देत असतो पण त्याचे प्रात्यक्षिक आपल्या आयुष्यात दिसत नाही, असे न करता लहान मुलांसाठी योग्य जडणघडण कशी असू शकते हे “श्यामची आई ” पुस्तक वाचल्यावरच कळते.
२.मृत्युंजय–
महाभारत म्हणजे सामाजिक, आध्यात्मिक, व राजकीय समीकरण. या तिन्ही गोष्टींचा एकत्रित मिलाप. भगवान कृष्ण केंद्रबिंदु बनून जरी उपस्थित असले तरी एकाच कुटुंबातला संघर्ष फक्त लालसेने कसा उद्भवला व कृष्णाची लीला या सर्वांना कुठल्या धार्मिक दिशेला घेऊन गेली याबद्दल आपण सर्वजण जाणतो पण ‘शिवाजी सावंत’ यांनी कर्ण या व्यक्तिरेखेला एक वेगळीच छटा देण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे.
कर्ण महाभारतात कसा घडत गेला, जन्मतः मिळालेली दिव्यशक्ती, स्वतःचे खरे कूळ काय याची त्याला माहिती न होणे, त्याचा वेळोवेळी होणारा अपमान , त्याची सर्वोत्तम धनुर्धर होण्याची दुर्दम इच्छाशक्ती, उत्तरोत्तर आयुष्यात घेतले गेलेले निर्णय हे सर्व त्याला कोणकोणत्या मार्गाने घेऊन जाते व त्याचे परिणाम म्हणून त्याचा झालेला अंत या सर्व घटना एकत्रितपणे “मृत्युंजय” या पुस्तकात मांडलेल्या आहेत. या कथेचा नायक कर्ण हा अनेक मानवी श्रेष्ठ गुणांचा अधिपती म्हणून वर्णिला गेला आहे.
३. कोसला-
खानदेशातील एका खेड्यातून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या पांडुरंग सांगवीकर या तरुणाची ही कथा आहे. शिक्षण, लग्न, अध्यात्म, राजकारण या सर्व पैलूंवर त्याचे विचार कसे बदलत जातात याचे ज्वलंत व मार्मिक कथन ‘कोसला’ या पुस्तकात भालचंद्र नेमाडे यांनी केले आहे.
सर्व स्तरांवर कार्यरत असलेल्या लोकांचा खोटेपणा, जीवनाबद्दल असलेली उदासीनता, नीतिमत्तेच्या नावाखाली असणारा भंपकपणा अशा अनेक गोष्टी कथेतल्या तरुणाला समाजापासून तोडत जातात किंबहुना तोच तुटत जातो. संवेदनशील मन असलेल्या लोकांसाठी ‘कोसला’ म्हणजे वास्तववादी समाजातील जगण शिकवून जाते.
४. छावा–
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे भोसले हे व्यक्तिमत्व म्हणजे अखंड ज्ञानाची गंगा, साहित्यप्रेमी, संवेदनशील तितकेच पराक्रमी, शूरवीर. दातृत्वात मिळालेली कर्तृत्वाची धार तशीच अविरत चालू ठेवत आपल्या पराक्रमाने पुरते मोगल साम्राज्य हादरवून सोडणारे संभाजी महाराज यांचे वर्णन शिवाजी सावंत यांनी ‘छावा’ या कादंबरीत केलेलं आहे.
उद्दम पराक्रमाने शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले ते तसेच अबाधित राखण्यासाठी त्यांच्यानंतर केले गेलेले प्रयत्न, राणी सोयराबाई व त्यांचे पुत्र राजाराम यांची स्वराज्य हाताळण्यासाठीची भूमिका, संभाजी राजांचा त्याला असलेला अजाणता विरोध, एकही युद्ध न हरता वाढवलेल स्वराज्य, ऐन तारुण्यात आलेला भयावह मृत्यु या सर्व घटनांचे ज्वलंत कथन शिवाजी सावंत यांनी केले आहे. भाषेचा कणखरपणा आणि इतिहासाची पुनरावृत्ती मांडण्यात शिवाजी सावंत पुरेपूर यशस्वी झालेले आहेत.
५. ययाती-
ययाती नामक राजा महाभारत काळात होऊन गेला. त्याच्याकडे सर्व वैभव असूनदेखील त्याची न पूर्ण होणारी कामवासना , त्या वासनेसाठी त्याने घेतलेले निर्णय त्याला खूप कष्टदायी कसे ठरतात व कर्तृत्व असूनदेखील आयुष्य कसे नर्क बनत जाते याचे सादरीकरण वि.स.खांडेकर यांनी आपल्या ‘ययाती’ या कादंबरीत केले आहे.
स्वतः वारंवार कामवासनेकडे आकर्षित होऊन स्वतःच्या मुलाचेदेखील आयुष्य जगणाऱ्या या राजाची कथा खूपच रंजक स्वरूपात मांडली गेली आहे. या पुस्तकातून जीवन, त्यातले उपभोग व मृत्यू यांची स्पष्टोक्त अशी माहिती मिळते.
तस बघायला गेलं तर मराठी साहित्य हे अजरामर आहे. या पाच पुस्तकांव्यतिरिक्त देखील खूप सारी पुस्तके आहेत जी तुम्हाला मराठी म्हणून जन्माला आल्यावर वाचलीच पाहिजेत.
तुमच्यामते अशी कोणती पुस्तके आहेत, ती आम्हाला कंमेंट करून जरूर कळवा. तुमचा अभिप्राय आमच्यासाठी मौल्यवान आहे.