सूर्य उगवला नाही तर – मराठी निबंध | Surya Ugavla Nahi Tar Nibandh

प्रस्तुत लेख हा सूर्य उगवला नाही तर (Surya Ugavala Nahi Tar Marathi Nibandh) या विषयावर आधारित मराठी निबंध आहे. सूर्य हा संपूर्ण सजीव सृष्टीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा घटक आहे. त्यामुळे सूर्य उगवलाच नाही तर काय होईल? या प्रश्नाचा कल्पना विस्तार या निबंधात करायचा असतो.

सूर्य उगवला नाही तर…

मला ऊन जराही आवडत नाही. ऊनात खेळल्यावर खूप दमायला होते. काल दिवसभर मी ऊनात खेळल्याने रात्री चांगलाच झोपलो होतो. मला रात्रीची शांतता आणि झोप इतकी आवडली की मला वाटू लागले सूर्य उगवूच नये. शाळेत जाईपर्यंत माझ्या मनात एकच विचार सतत चालला होता, खरंच सूर्य उगवला नाही तर!

सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित झाल्याने आपण वीज आणि विजेवर चालणारी उपकरणे बनवण्यात यशस्वी झालेलो आहोत. त्यामुळे आपली उजेडाची समस्या राहिलेली नाही. तसेच सूर्य उगवला नाहीच तर पृथ्वीवर तप्त आणि उष्णतेचं वातावरण देखील नसेल आणि आपण मस्तपैकी इलेक्ट्रॉनिक संसाधनांचा वापर करत असू.

सध्या मला रात्री खूप मज्जा येते. वीज, टेलिव्हिजन, मोबाईल आणि इंटरनेट असल्याने जगण्याची एक वेगळीच पद्धती सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे दिवसाऐवजी रात्र खूप चांगली वाटत आहे. तसेच सूर्य नसेल तर उठणे आणि झोपणे या क्रियांसाठी वेळेचे कोणतेच बंधन नसेल.

सूर्य नसेल तर शाळा, शिक्षण आणि सामाजिक व्यवस्था यासाठी विशिष्ट वेळ निर्मित केली जाणार नाही. तसेच निसर्गात ऊन नसल्याने सर्वत्र शीतलता आणि थंडावा जाणवेल. तेव्हा दळणवळण आणि विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर खूपच वाढेल. सर्वत्र झगमगाट आणि प्रकाशाचे वातावरण असेल.

सूर्य न उगवण्याचे नुकसान मात्र खूप मोठे असेल. आपली जीवन ऊर्जाच सूर्य आहे. संपूर्ण पृथ्वीवर सजीव सृष्टीला प्राण ऊर्जा देण्याचे काम सूर्य करत असतो. त्यामुळे सूर्य उगवला नाही तर निसर्गात बदल होणारच नाहीत आणि पर्यायाने सजीवसृष्टी अस्तित्वात राहणार नाही.

सूर्य न उगवल्याने अन्नधान्य उत्पन्न करता येणार नाही. सूर्यप्रकाश नसल्याने झाडे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकणार नाहीत. तसेच सूर्यामुळे जी पाण्याची धूप होते आणि ढग तयार होऊन पाऊस पडतो ती सर्व क्रिया आपोआप बंद होईल. म्हणजेच सूर्य नसेल तर पाऊस आणि पाणी यांची भीषण समस्या निर्माण होईल.

निसर्गातील इतरही घटक जसे की पशु पक्षी, कीटक, नद्या, झाडे, आपले अस्तित्व गमावून बसतील. म्हणजेच अन्न आणि पाणी अशा सजीवांच्या जीवनावश्यक गरजाच जर पूर्ण होणार नसतील तर सूर्य हा आपले जीवन चालवण्यासाठी किती महत्त्वाचा घटक आहे ते समजते.

भौगोलिक स्थिती आणि वास्तविकतेनुसार सूर्य हा एकाच ठिकाणी आहे. त्यामुळे सूर्य न उगवणे म्हणजे सूर्यमालेतील ग्रह हे स्वतःभोवती किंवा सूर्याभोवती फिरणे बंद करतील. फिरणे बंद झाले की अस्तित्व हळूहळू नष्ट होऊ लागेल. संपूर्ण जीवनातील गतीच निघून जाईल.

निसर्ग, ग्रह, तारे, सूर्य आणि संपूर्ण अवकाश हे एकमेकांशी एका गतीने जोडले गेलेले आहेत. त्यामुळे सूर्य न उगवणे ही स्थिती पाहता गतीत जोडले गेलेले सर्व घटक आपली गती आणि ऊर्जा गमावून बसतील. त्यामुळे “सूर्य उगवला नाही तर…” हा विचारसुद्धा मला आता करवला जात नाहीये.

तुम्हाला सूर्य उगवला नाही तर हा मराठी निबंध (Surya Ugavla Nahi Tar Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment