सत्य काय आणि असत्य काय? हे व्यक्ती परत्वे वेगवेगळे असते. बोलण्यातील सत्य आणि असत्य हे मानवी जीवनासाठी घातक असते. सामाजिक जीवनासाठी सत्य, असत्य, कायदे आणि नियम आवश्यक असतात.
जगण्यातील नियमांना आणि मूल्यांना आपण सत्य समजतो पण सत्य ही एक आंतरिक अनुभूती आहे जी आपल्याला प्रत्येक क्षणी होत असते. आत्ता या क्षणी तुम्ही कसे आहात त्यावर तुमची जीवनाची गुणवत्ता आधारित होते. त्यानुसारच मग व्यक्तिगत सत्य आणि असत्य प्रकट होत असते.
आत्ता तुम्ही दुःखी, निराश असाल तर असत्य जीवन जगत आहात आणि प्रेममय, करुणामय असाल तर सत्य जीवन जगत आहात. कारण आपल्याला रोजच्या जीवनातील काही कृत्ये सतत चांगल्या आणि वाईट अनुभवांची प्रचिती करून देत असतात.
Table of Contents
सत्य अनुभूतीसाठी कृत्ये –
• मदत करणे.
• स्वभाव प्रेमळ आणि संवेदनशील बनवणे.
• मैत्री जपणे.
• चेहऱ्यावर सतत स्मितहास्य ठेवणे.
• इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करणे.
• स्वावलंबी बनणे.
असत्य अनुभवण्यासाठी कृत्ये –
• खोटे बोलणे.
• ईर्ष्या, मोह, लोभ बाळगणे.
• अहंकारी स्वभाव असणे.
• इतरांचा मत्सर करणे.
• सतत क्रोध करणे.
वरील कृत्ये तुम्हाला कशा प्रकारे सुखद आणि दुःखद अनुभव प्रदान करतात याची अनुभूती सर्वांना आहेच. त्यामुळे सत्य आणि असत्य या संकल्पना म्हणजे खोल अर्थाने तुम्ही जीवन कशा प्रकारे जगता त्यावर अवलंबून आहेत.
त्यामुळे जीवन चांगले जगणे म्हणजे काय? तसेच जीवनाची गुणवत्ता कशी वाढू शकेल? त्यासाठी काय केले पाहिजे हे सर्वप्रथम आपण पाहुयात.
प्रत्येक जण ज्या स्तरावर जीवन जगतो त्याला सत्य आणि असत्याची अनुभूती त्याच प्रकारे होत असते. त्याच्या अनुषंगाने मग जीवनातील ध्येय आणि प्राधान्यता आपल्या जीवनाचा स्तर ठरवत असते.
तो स्तर भौतिक जगण्यातील नाही तर अंतर्गत अनुभूतीचा आहे. मैत्री, करुणा आणि प्रेमातून उत्पन्न होईल ते सत्य आणि द्वेष, ईर्ष्या, राग, वासना या भावनांतून उत्पन्न होईल ते असत्य! सत्य आणि असत्य हे तीन निकषांवर आधारित असू शकते.
बोलणे, जगणे आणि स्वभाव हे तिन्ही निकष जर आपण अनुभवले तर सत्य म्हणजे काय आणि असत्य म्हणजे काय याची प्रचिती खूप खोल अर्थाने होऊ शकेल.
सत्य बोलणे –
आपण सत्य किंवा असत्य बोलतो तेव्हा आपल्याला आतून जाणवते की आपण काय बोलत आहोत. असत्य बोलण्याने आपल्याला वाटते की लोक आपल्याला सन्मान देत आहेत. त्या सन्मानार्थ आपल्याला खोटे बोलण्याची सवय जडत जाते.
लोकांच्या नजरेत फक्त चांगले दिसण्यासाठी खोटे बोलतो पण सत्य काय आहे हे स्वतः व्यतिरिक्त कोणालाच माहीत नसते. फक्त सवयींमुळे आपण खोटे बोलत राहतो आणि शब्दांच्या आड स्वतःचा खरा चेहरा लपवून बसतो.
त्यासाठी सर्वप्रथम एका दिवसात आपला किती जणांशी संपर्क येतो ते पाहा. त्यांच्याशी आपण कोणत्या विषयावर बोलतो आणि काय बोलतो त्याचेही निरीक्षण करा. हळूहळू त्या बोलण्यातच खरेपणा आणत चला.
सत्य बोलणे म्हणजे दुसऱ्याच्या जीवनात डोकावणे आणि त्याचे वागणे सर्वांना सांगत फिरणे नाही तर स्वतः जसे आहोत तसे व्यक्त होत जाणे.
सत्य जगणे –
एकदा नियमित खरे बोलायला लागलात की तुमची सर्व खोटी नाती संपतील. तुमची ज्यांना खरोखर काळजी वाटते असेच लोक तुमच्या आसपास राहतील. मग त्या लोकांशी तुमचा जास्तीत जास्त संपर्क आणि संवाद असेल. त्या संवादातून तुम्ही ज्ञान मिळवण्याचा आणि शिकण्याचा प्रयत्न करत राहाल.
अशा वागण्याने तुमच्या जगण्यात मानवी मूल्ये आपोआप रुजली जातात. त्यांना थोपावे लागत नाही.
सत्य हाच स्वभाव बनणे –
नित्य शिस्तबद्ध आणि प्रामाणिक जगण्यातून सत्य हाच स्वभाव बनून जातो. ज्यातून तुम्ही स्वतःशी आणि इतरांशी अप्रामाणिक वागत नाही. तुमच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींनाही तुम्ही असत्याचा मार्ग सुचवित नाही. त्यांना सतत प्रेरक ठरत असता.
प्रत्येक क्षण उत्कटता आणि उल्हासपूर्ण जगला जातो. त्यासाठी जीवन कसे जगायचे हे ठरवल्यावर आपल्याला विविध कर्म आणि सवयी ठरवाव्या लागतात ज्यातून आपली दैनंदिन स्तरावर वाढ होते. ही वाढ जगण्यातील अंतर्गत सत्य अनुभूती असते.
तुम्हाला सत्य आणि असत्य म्हणजे काय? (Truth And Untruth In Marathi) हा लेख आवडल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…