माणसाच्या जगण्याचा अर्थच शिक्षण आहे. शिक्षण म्हणजे शाळेतले शिक्षण असा अर्थ घेऊ नका तर जीवनाची चाललेली वाटचाल ही शिक्षणाने समृद्ध बनत असते. त्यामुळे शिक्षणाचे महत्व आणि त्याचे सर्व फायदे विद्यार्थ्यांना शालेयदशेत असताना समजले पाहिजेत म्हणून शिक्षणाचे महत्त्व निबंध ( Importance Of Education Essay ) लिहायला आला पाहिजे.
शिक्षण प्रत्येक पिढीत बदलत गेले आहे. त्याची जाण ठेऊन विद्यार्थ्यांनी पुरेशी माहिती मिळवून मगच या निबंधाचा सराव करावा. हा विषय वास्तविक प्रकारचा असल्याने काल्पनिक विस्तार अपेक्षित नाही. अतिशयोक्ती न करता हा निबंध मुद्देसूद लिहायचा असतो. चला तर मग पाहूया, कसा लिहू शकतो “शिक्षणाचे महत्त्व” हा निबंध!
शिक्षणाचे महत्त्व निबंध | Shikshanache Mahattva Marathi Nibandh |
मानवी विकास खऱ्या अर्थाने बुद्धीचा विकास म्हणता येईल. माणूस जेव्हा दोन पायावर चालायला शिकला तेव्हापासून बुद्धी विकसित होऊ लागल्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे. माणूस हा अन्य प्राण्यांपेक्षा बौद्धिक पातळीवर वेगळा आहे.
शारीरिक रचना आणि गरजा काही जास्त वेगळ्या नाहीत परंतु वाचन, विचार, आणि अस्तित्वाची जाणीव या गोष्टी माणूस अनुभवू शकतो.
वाचन आणि विचार हेदेखील सुंदर आणि शुद्ध असणे गरजेचे आहे नाहीतर माणूस त्याच्या अशुद्ध विचारांनीच लयास जातो. सर्व चांगले आणि मंगल अनुभव आयुष्यात घडण्यासाठी माणसाने शिक्षण निर्माण केले. ते शिक्षण त्याच्या आंतरिक प्रेरणेतून निर्माण झाले. माणूस म्हणून कितीतरी विविध गोष्टी आणि वस्तू आपण सहजरीत्या हाताळू शकतो. आज विज्ञान आणि भौतिक विकास जो शक्य झाला त्यासाठी शिक्षणच जबाबदार आहे.
शिक्षण विविध प्रकारे दिले जाते आणि ग्रहण सुद्धा केले जाते. एका महान व्यक्तीचा अनुभव हा पुढच्या पिढ्यांसाठी शिक्षण आणि मार्गदर्शन बनत असतो. त्या व्यक्तीचे विचार हे शब्दात मांडले जातात आणि आपण ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो. माणसाच्या पिढीजात गरजेनुसार शिक्षण बदलत गेले आहे तसेच त्याचा उपयोगही वेगवेगळ्या प्रकारे केला जात आहे.
शिक्षण हे बौद्धिक आणि मानसिक स्तरावर होत असते. पूर्वी म्हणजे एका शतकापूर्वी शिक्षण हे सामाजिक विकासाच्या दृष्टीने कार्यरत होते. समाजाचा विकास आणि समाजातील प्रत्येक घटकाला विकसित कसे करता येईल याकडे शिक्षणाचा सर्व कल होता. आज विज्ञान आणि तंत्रज्ञान एवढे पुढे गेले आहे की सर्व ज्ञान एक संगणक सांभाळून ठेवू शकतो. माणसाची सर्व कामे मशिन्स करू लागल्या आहेत. मग शिक्षणाचे महत्त्व इथून पुढे कसे विकसित होईल, याचा विचार आपण केला पाहिजे.
विज्ञानाचा विकास ही न थांबणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे शिक्षणही आता बदलत चालले आहे. लहानपणी सर्व मुले साक्षर होणे गरजेचे होऊन बसले आहे. प्रत्येक देश हा विकासाची वाटचाल करत आहे ते तेथील साक्षर लोकांमुळेच! जेवढी लोकसंख्या साक्षर असेल तेवढे गुणात्मक बदल आपण समाजात घडवू शकतो. प्रत्येक पिढी शिक्षित होऊन स्वतःचे आणि समाजाचे भले करू शकते.
उचित शिक्षणामुळे माणूस प्रगल्भ बनत जातो. मागील दोन दशकांपूर्वी कितीतरी सामाजिक प्रथा या फक्त अंधश्रद्धा आणि अज्ञान यामुळे चालू होत्या. त्याला देवाचे किंवा नशिबाचे स्वरूप देऊन भीतीदायक वातावरणात सर्वजण जगत होते पण शिक्षणामुळे आज एकविसाव्या शतकात सर्व समाज विकास आणि समान हक्कांसाठी एकत्र येत आहे. पूर्वीचे दुराग्रह हे आता मान्य नाहीत. कोणी फक्त बोलण्याने कोणाला फसवू शकत नाही कारण सर्वजण चांगला विचार करण्यास सक्षम आहेत. हे सर्व फक्त शिक्षणाने शक्य झाले आहे.
शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करताना गरिबी आणि लाचारी हे मुद्देदेखील विचारात घेतले पाहिजेत. एखादे कुटुंब जर गरीब असेल तर भविष्यात फक्त शिक्षणाने ते कुटुंब गरिबीतून वर येऊ शकेल. त्या कुटुंबातील कोणालाच लाचारीने काम करावे लागणार नाही. मग गरीब श्रीमंत हा भेद हळूहळू संपुष्टात येईल. समाज एका समानतेच्या उंचीवर जाऊन पोहचेल. याउलट जे लोक अशिक्षित राहतात त्यांना आयुष्यभर अडाणी असल्याची खंत टोचत राहते.
जीवनात मोठे होत असताना कर्तृत्व गाजवले पाहिजे असे कर्तुत्व समोर नसल्याने मग व्यसन, शिव्या देणे, घृणा करणे असे दुर्गुण अंगी बाणवले जातात. असा व्यक्ती त्याच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी घातकच ठरत असतो. त्यामुळे लहानपणीच शिक्षण आणि वाचन याची सवय प्रत्येक मुलाला असली पाहिजे तेव्हाच तो विकासाच्या दृष्टीने स्वतःला घडवू शकेल.
शिक्षण हे नुसते तर्कयुक्त नसले पाहिजे तर त्यामध्ये मानवी मूल्येदेखील जोपासली गेली पाहिजेत. स्नेह, करुणा, आदर, असे गुणही बुद्धीबरोबर विकसित झाले पाहिजेत. मानसिक आणि शारीरिक क्षमता सुदृढ झाली पाहिजे. त्यासाठी नवनवीन दिशांचा शोध घेणे शिक्षणामुळे शक्य होईल. आज करीयरच्या एवढ्या संधी उपलब्ध आहेत की कुठल्याही क्षेत्रातले सामान्य शिक्षण जरी घेतले तरी एक उज्ज्वल भविष्य एखादा व्यक्ती घडवू शकतो.
शिक्षणाचे महत्त्व हे अपार आहे. माणूस वैयक्तिक विकास तर घडवूच शकतो शिवाय आपल्या कुटुंबाचा, समाजाचा विकासही करू शकतो. शाळेत जाऊन नुसती पुस्तके अभ्यासणे हे शिक्षण नाही तर त्यांचा जीवनात उपयोगही करून घेता आला पाहिजे. विद्यार्थी हे सहज समजू शकत नाही त्यामुळे शिक्षकांचे कर्तव्य या कार्यात महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्ती शिक्षणाने भारावून गेल्यास आपण आपला देश आणि समाज खऱ्या अर्थाने प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकतो.
तुम्हाला शिक्षणाचे महत्त्व मराठी निबंध ( Importance Of Education Essay In Marathi ) कसा वाटला? हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा…..