विचारापेक्षा कृती श्रेष्ठ – मराठी निबंध | Vicharapeksha Kruti Sreshth Nibandh |

प्रस्तुत लेख हा विचारापेक्षा कृती श्रेष्ठ (Vicharapeksha Kruti Sreshth Nibandh) या सुविचारावर आधारित एक मराठी निबंध आहे. योग्य कृती ही नेहमीच निरर्थक विचारांपेक्षा कशी काय श्रेष्ठ असते अशा आशयाचा विस्तार या निबंधात केलेला आहे.

विचारापेक्षा कृती श्रेष्ठ – निबंध मराठी

जसे आपले विचार असतील तशीच कृती असते परंतु आपल्या विचारांवर जर आपले नियंत्रण नसेल तर मात्र कोणतीही कृती पूर्णत्वास जाताना अत्यंत कष्टदायी अनुभव येतो. त्यामुळे कृतीच अवघड आहे असे आपल्याला वाटते पण विचारांवर कोणी प्रश्नचिन्ह उभे करताना दिसत नाही.

जीवन उत्तम प्रकारे जगण्यासाठी योग्य कृती अत्यंत आवश्यक आहे. योग्य कृती होण्यासाठी योग्य प्रकारचे विचार आणि भावना आवश्यक आहेत. आपण आपल्या मनाचे आणि शरीराचे व्यवस्थित निरीक्षण केल्यास हळूहळू आपले व्यक्तिमत्त्व सजग आणि कृतिशील बनत जाते. आपले विचार आणि भावना आपल्या नियंत्रणात येऊ लागतात.

आपण जागृत असू तर आपल्याला समजते की सर्वप्रथम विचार असतो. त्यानंतर त्याला भावना आणि इच्छा जोडल्या गेल्या की कृती प्रत्यक्षात उतरत असते. परंतु विचारांवर आपली पकड मजबूत नसल्याने आणि अनुभवांवर आधारित आपले विचार नसल्याने सतत फक्त कोणत्याही कल्पना आपल्या मनात चाललेल्या असतात.

उदाहरणार्थ, आपल्याला अभ्यास पूर्ण करायचा असेल तर कृती गरजेची आहे. अशावेळी जर अभ्यासाविषयी तिटकारा असेल, भय असेल किंवा अभ्यासाचे अनुभव कंटाळवाणे असतील तर आपल्या मनात सातत्याने अभ्यासाच्या कल्पना आणि विचार तर चालतील परंतु अभ्यास कधीच केला जाणार नाही.

अभ्यास असो वा काम, ते आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करणे अत्यावश्यक ठरते. त्यानुसार कमीत कमी विचार आणि आणि संपूर्ण लक्ष्य अभ्यासात किंवा कामात असणे गरजेचे राहील, तेव्हाच ती कृती पूर्णत्वास जाऊ शकेल. म्हणजेच अशावेळी कामासाठी लागलेला वेळ हा खूप महत्वपूर्ण ठरतो.

कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त नीटनेटके काम हाच सर्व ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याचा मूलमंत्र आहे. व्यवसाय, नोकरी, कला-क्रीडा, शिक्षण अशी क्षेत्रे कोणतीही असो, तुम्ही जर वेळेवर कृती पूर्ण करत असाल तरच तुम्ही यशस्वी ठरता. त्यासाठी सर्वात जास्त महत्त्वपूर्ण ठरते ती कृती!

प्रत्येक क्षेत्रात कृती करण्याअगोदर निरीक्षण आणि योग्य विचार केला जातो. त्यानंतर पूर्ण क्षमतेने कृतीला प्राधान्य दिले जाते. आपली गरज आणि आकांक्षा काय आहे त्यानुसार सर्वात अगोदर इच्छा निर्माण करावी. त्या इच्छेनुसार विचारांना प्राधान्य द्यावे. मग आपण सतत विचार करत बसण्यापेक्षा कृतीवर जोर देऊ शकतो.

आपल्या इच्छेनुसार आपल्याला कृती करण्याची प्रेरणा मिळत असल्याने योग्य इच्छा आणि त्यानंतर योग्य कृती असे समीकरण जुळून आल्यास कृती करण्याचा आनंद उपभोगता येतो. मग आपण करत असलेली कृती आपल्याला दबावात आणि ताण तणावात ढकलत नाही तर आपल्याला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी बनवत असते.

तुम्हाला विचारापेक्षा कृती श्रेष्ठ हा मराठी निबंध (Vicharapeksha Kruti Sreshth Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment