प्रत्येक वर्षी संपूर्ण जगभरात 14 जून हा दिवस रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो, तर 1 ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिन साजरा केला जातो.
रक्तदान दिन कसा साजरा केला जातो आणि त्या दिवसाचे महत्त्व रक्तदान दिन या मराठी निबंधात (Blood Donor Day Essay In Marathi) वर्णिलेले आहे.
रक्तदान दिन निबंध मराठी | Blood Donor Day Marathi Nibandh |
रक्तदानाचे पुण्य फार मोठे आहे. चरकांच्या शास्त्राप्रमाणे रक्तदान हेच जीवनदान आहे. दरवर्षी 1 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिन म्हणून आपण साजरा करत असतो तर संपूर्ण जगभरात 14 जून हा दिवस रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो.
समाजामध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजवणे, तरुण पिढीमध्ये रक्तदानाबद्दल जागृती निर्माण करणे, निरोगी व तंदुरुस्त असताना देखील जे लोक रक्तदान करत नाहीत त्यांना रक्तदानासाठी प्रेरणा देणे हा स्वैच्छिक रक्तदान दिनाचा हेतू असतो.
एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या मर्जीने रक्तपेढीत किंवा रक्तदान शिबिरात रक्त देणे म्हणजे रक्तदान! रक्तदान हे स्वैच्छिक असले पाहिजे. कोणत्याही मोबदल्यात रक्तदान करणे, बदली रक्तदाता होणे अशा संकल्पना नष्ट करून स्वैच्छिक रक्तदानाची मोहीम जनमानसात रुजू करणे गरजेचे बनले आहे.
आजच्या काळात बऱ्याच ठिकाणी, छोट्या मोठ्या अपघातात ऑपरेशनच्या वेळी रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज असते. त्यावर रक्तदान हा एकच उपाय आहे आणि तो उपाय आपल्यासारखे सुज्ञ नागरिकच करू शकतात.
रक्तदान केल्यावर आपल्या शरीरातला एक महत्त्वाचा घटक वाया जाईल असा काही व्यक्तींचा गैरसमज आहे पण तसं नाही. आपण जर रक्तदान केले तर आपल्या शरीरातील रक्त निर्मितीला चालना मिळत असते.
वैद्यकीय संशोधनामुळे रक्तगटाचा अभ्यास शक्य झालेला आहे. रक्तगटाचे विविध प्रकार आहेत, त्यानुसार ज्या व्यक्तीला रक्ताची गरज आहे त्याला त्याच्याच रक्तगटाचे रक्त पुरवावे लागते. त्यामुळे रक्तदान हे प्रत्येक नागरिकाने करायला हवे जेणेकरून प्रत्येक रक्तगटातील रक्त उपलब्ध होऊ शकेल.
ज्या व्यक्तीचे वय 18 ते 60 वर्ष, हिमोग्लोबिन 12.5 पेक्षा जास्त, वजन 45 किलोपेक्षा जास्त, नाडीचे ठोके 80 ते 100 प्रति मिनिट आणि तापमान व रक्तदाब नियमित असेल असा व्यक्ती किंवा तीन महिन्यापूर्वी रक्तदान केले असेल असा व्यक्ती रक्तदान करू शकतो.
रक्तदानानंतर प्रत्येक शासकीय रक्तपेढीतर्फे एक रक्तदाता कार्ड सुद्धा आपल्याला देण्यात येते. त्यामुळे रक्तदान हा एक सामाजिक उपक्रम म्हणून देखील राबवला गेला पाहिजे. युवक-युवतींनी रक्तदानाचे महत्त्व समजून घेऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान केले पाहिजे.
लेखन सौजन्य – निकिता पवार (सातारा)
तुम्हाला रक्तदान दिन – मराठी निबंध (Blood Donor Day Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…