प्रस्तुत लेख हा माझा आवडता ऋतू – हिवाळा (My Favourite Season Winter Essay In Marathi) या विषयावर मराठी निबंध आहे. हिवाळा ऋतुत काय घडते, त्याचे महत्त्व आणि त्या ऋतूची विशेषता या बाबींची चर्चा या निबंधात केलेली आहे.
माझा आवडता ऋतू – हिवाळा निबंध | My Favourite Season – Winter Essay in Marathi |
भारतात मुख्यतः तीन महत्त्वाचे ऋतू आहेत. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. या तिन्ही ऋतूंचे नैसर्गिक महत्त्व आणि विशेषता वेगवेगळी आहे. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या ऋतूंचा आनंद घ्यायला आवडतो. त्यामध्ये मला सर्वात जास्त आवडणारा ऋतू म्हणजे हिवाळा.
हिवाळा हा ऋतू साधारणपणे ऑक्टोबर ते जानेवारी या महिन्यांदरम्यान येतो. पावसाळ्यातील शेतीनंतर हिवाळ्यात सुद्धा पुन्हा शेती केली जाते. हिवाळ्याला शरद ऋतू देखील म्हटले जाते. सूर्याची उष्णता खूप कमी जाणवत असल्याने हा ऋतू अत्यंत आल्हाददायक वाटतो.
हिवाळा हा माझा आवडता ऋतू आहे कारण या ऋतूत वातावरण पूर्ण थंड झालेले असते. सूर्याच्या तापत्या उष्णतेपासून मुक्ती मिळते. या ऋतूत लोक अधिक ऊर्जावान आणि क्रियाशील बनतात. शरीरात न थकता जास्तीत जास्त काम करण्याचा उत्साह निर्माण होतो.
पहाटेच्या वेळी जी धुक्याची चादर पसरलेली असते ती अनुभवायला खूप आनंद मिळतो. त्यानंतर सकाळी पडलेले सूर्याचे कोवळे ऊन अंगावर घेताना होणारा आनंद तर शब्दातीत आहे. रात्री सुद्धा थंडी पडल्याने शेकोटी करून सर्व शरीर शेकण्यात एक वेगळीच मज्जा येते.
भारतात हिवाळ्याचा हिमालय पर्वताशी संबंध आहे. जेव्हा हिमालयात बर्फ पडतो आणि उत्तरेकडून वारे वाहायला लागतात तेव्हा भारतात हिवाळ्याचे आगमन होते. हिवाळ्यात दिवस लहान आणि रात्र मोठी असते.
हिवाळ्यात सकाळच्या वेळी धुके तयार होत असते. अतिशय थंड वातावरण असल्याने सर्दी, खोकला यासारख्या समस्या या ऋतूत मोठ्या प्रमाणात वाढतात. याशिवाय हिवाळ्यात सकाळी चालणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
हिवाळा ऋतू निरोगी फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा हंगाम असतो. आरोग्याच्या बाबतीत हा हंगाम चांगला आहे कारण या हंगामात पाचकशक्ती मजबूत असते. शरीराचे तापमान योग्य प्रमाणात राहण्यासाठी शारिरीक हालचाल आणि अन्नग्रहण यांचे प्रमाण देखील वाढते.
हिवाळा या ऋतूत दिवाळी, नाताळ आणि मकरसंक्रांत असे महत्त्वाचे सण येतात. या ऋतूत सर्व लोक गरम कपडे, हातमोजे, आणि कानटोपी यांचा हमखास वापर करताना आढळतात. असा हा हिवाळा ऋतू आपल्याला जीवनाच्या संघर्षांना सामोरे जाण्यासाठी प्रेरित करतो म्हणून हिवाळा ऋतू मला फार आवडतो.
लेखन सौजन्य – सिद्धी पवार.
तुम्हाला माझा आवडता ऋतू – हिवाळा हा मराठी निबंध (My Favourite Season Winter Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…