अंतर्दृष्टी विकसित नसल्याने आपल्याला स्वतःवर आणि इतर व्यक्तींवर विश्वास वाटत नाही. त्यामुळे जीवनातील व्यक्तिगत संबंध व इतर नाती काळानुरूप विकसित न होता बिघडत जातात. प्रस्तुत लेखात मनुष्य वापराची वस्तू की कुतूहल? यासंदर्भात विचार मांडण्यात आलेले आहेत.
व्यक्तिगत संबंध बिघडण्याचे मुख्य कारण म्हणजे व्यक्तीला आपण वापराची वस्तू म्हणून पाहतो. घरातील भावी पिढीतील मुलांना आपण प्रेमाचे संस्कार न देता अहंकार, स्वार्थ, ईर्ष्या वाढेल असे संस्कार देतो. मोठपणी देखील त्यांचा उपयोग होऊ शकेल, असेच आपले विचार असतात.
त्या संस्कारांचा आणि विचारांचाच परिणाम असा होतो की कोणतीही व्यक्ती आपल्यापासून मनाने दूर जाते. आपण जसे संस्कार देतो त्यांचाच उपयोग आपल्या विरुध्द होत असतो. त्यामुळे वस्तूंचा वापर कशासाठी आणि व्यक्तींचा वापर कशासाठी हे सर्वप्रथम जाणून घेतले पाहिजे.
वस्तूंचा वापर करून आपण जीवन आरामदायक बनवू शकतो. वस्तू आपल्याला जीवनात महत्त्वाच्या आहेत फक्त जीवन चालवण्यासाठी. परंतु व्यक्तींचे महत्त्व त्याहीपेक्षा उच्च आहे.
जिवंत व्यक्ती आपल्या जीवनात आनंद, प्रेम, सुख निर्माण करू शकते. परंतु त्या आनंदाची व प्रेमाची आकांक्षा आपल्यात आहे का? त्यातून निर्माण होणाऱ्या उन्नत जीवनाला आपण प्राप्त होऊ शकतो का? असे विचार मनात डोकावले पाहिजेत.
कोणतीही व्यक्ती ही फक्त उपभोगाची किंवा वापर करून घेण्याची गोष्ट नाही तर प्रेमाचा विकास घडवण्याची गोष्ट आहे. दोन व्यक्तींच्या संबंधात दोन्ही बाजूंनी अशा प्रेमाचा विकास शक्य होतो जर आपण व्यक्तींना प्रेम केले आणि वस्तूंचा उपयोग केला तर…
प्रत्येक व्यक्ती आनंद आणि कुतूहल वाढवू शकते. त्यासाठी तुम्ही स्वतः देखील त्या इच्छेने भारलेले असला पाहिजे. आनंदी आणि आश्चर्यपूर्ण आयुष्य जगण्याचा मंत्र म्हणजे प्रत्येक व्यक्तीला कुतूहलयुक्त नजरेने पाहणे!
कुतूहल युक्त नजर म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या भल्याचा विचार मनात असणे. अशी कुतूहलयुक्त नजर कशी काय निर्माण होऊ शकते? त्यासाठी प्रत्येक व्यक्तीतील सौंदर्य बघण्याचा प्रयत्न करा. तशी सुरुवात केली तर हळूहळू पुढचा व्यक्ती तुम्हाला सुंदर आणि प्रेमपूर्ण वाटू लागेल.
तुम्हाला प्रेमपूर्ण वाटलेला व्यक्ती ही तुमच्या मनातील भावना आहे. त्या समोरील व्यक्तीच्या मनात काय चालले आहे त्याच्याशी तुमचे काही देणे घेणे नाही, परंतु तुम्ही त्याच्याप्रती दाखवलेले प्रेमच त्याचेही तुमच्या प्रती असलेले वागणे सरळ करून जाईल.
सद्यस्थितीत मनुष्य फक्त एकमेकांना वापरत आहे. काळजी, प्रेम आणि आनंदाचा कुठेही तपास नाही. स्वतःचा अहंकार आणि प्रतिष्ठा मोठी वाटत असल्याने व्यक्तिगत महत्त्व कमी झालेले आहे.
दुसऱ्या व्यक्तीला त्रास न देता, त्याला फक्त स्वतःच्या अहंकाराच्या पूर्तीची वस्तू न पाहता एक कुतूहल आणि नवीनतम नजरेने पाहता आले तर जीवन एक दुसऱ्याच मार्गाने गतीमय होईल ज्यामध्ये मनुष्य एकमेकांना प्रेम देऊ शकेल, खऱ्या पद्धतीची काळजी करू शकेल.
म्हणजेच मनुष्याचा फक्त वापर न करता त्यांच्याप्रती प्रेमाने भारले जाऊन कुतूहल निर्माण करणे हाच जीवन जगण्याचा योग्य मार्ग असू शकेल ज्यामध्ये तुम्हाला नाती आणि इतर व्यक्ती या बंधने वाटणार नाहीत तर स्वतःच्याच विकासातील सहाय्यक वाटतील.
दोन व्यक्तींतील असे कुतूहलयुक्त आणि प्रेमपूर्ण संबंध दोघांच्याही स्वभावात विवेक निर्माण करतात आणि एकमेकांच्या आयुष्यात आपोआप आनंद आणि शांतीची निर्मिती होते.
मनुष्य – वापराची वस्तू की कुतूहल? हा लेख आवडला असल्यास तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…