भारत आणि इंग्लंड ( India Vs England forth Test) या संघांदरम्यान खेळला जाणारा चौथा कसोटी सामना चांगलाच रंगात आलेला आहे. कालच्या दिवशी भारताने 466 धावांचा डोंगर उभा केला. परंतु पहिल्या डावातील 99 धावांच्या पिछाडीमुळे इंग्लंड संघापुढे 368 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
इंग्लंड संघाने सावध सुरुवात करत शेवटच्या सत्रात बिनबाद 77 धावा बनवल्या. त्यामध्ये बर्न्स 31 तर हमीद 43 धावांवर नाबाद आहेत. आजचा दिवस हा कसोटीचा शेवटचा दिवस असल्याने इंग्लंड संघाला अजुन 291 धावा जमवणे आवश्यक आहे तर भारताला 10 बळींची आवश्यकता आहे.
बुमरा, उमेश आणि जडेजा या गोलंदाजांवर सर्वांची नजर असेल तर रूट, मलान आणि बेयरस्टो हे फलंदाज कसा खेळ करतील याकडे सर्वांचे लक्ष असेल. सामन्याचा निकाल दोन्ही बाजूने लागू शकतो आणि अनिर्णित राहण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
चौथ्या दिवसाची सुरुवात झाल्यावर जडेजा, कोहली आणि रहाणे लगेच बाद झाले. कोहलीने अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर शार्दुल ठाकूर आणि रिषभ पंत यांनी डावाला आकार देत शानदार अर्धशतके झळकावत शतकी भागीदारी केली. त्या जोरावर भारत 466 धावा जमवू शकला.
वोक्सने 3 तर मोईन अली आणि रॉबिन्सन यांनी प्रत्येकी 2 – 2 बळी घेतले. संपूर्ण दिवस सूर्य प्रकाश असल्याने खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती. पाचव्या दिवशी ढगाळ वातावरण असेल तर भारतीय गोलंदाज त्याचा फायदा घेऊ शकतील.
संक्षिप्त धावफलक –
भारत पहिला डाव – 191/10
इंग्लंड पहिला डाव – 290/10
भारत दुसरा डाव – 466/10
इंग्लंड दुसरा डाव* – 77/0
आज डावाची सुरुवात इंग्लंड संघ बिनबाद 77 धावा अशी करेल. तर जडेजा आज महत्त्वपूर्ण गोलंदाज ठरेल, असा अंदाज आहे.