प्रस्तुत निबंध हा कलावंत नसते तर (Kalavant Naste Tar Nibandh Marathi) या विषयावर आधारित मराठी निबंध आहे. समाजात कलावंत असण्याचे महत्त्व, फायदे आणि उपयोग अशा बाबींचे वर्णन या निबंधात केलेले आहे.
कलावंत नसते तर…
मनुष्य जीवनाची अभिव्यक्ती कलेतून व्यक्त होत असते. जीवनाचा प्रत्येक पैलू कलेमार्फत अत्यंत सुंदर पद्धतीने समजला जाऊ शकतो. आपल्या अस्तित्वात जे काही असेल जसे की निसर्ग, समाज, कुटुंब, नाती, मानवी भावना यांना कलापूर्ण पद्धतीने जाणून घेण्याचे काम कलावंत करत असतात. त्यामुळे कलावंत नसतील तर काय होईल?
कलावंत नसते तर आपल्याला आपला इतिहास आणि संस्कृती कळलीच नसती. साहित्य, संगीत, चित्रकला यांद्वारे आपल्याला अध्यात्मिक, सामाजिक आणि कौटुंबिक संरचना प्रत्येक पिढीत संक्रमित झाल्याचे समजते. त्यामुळे कलावंत नसते तर पुढच्या पिढीत कोणतीही कला पोहचलीच नसती.
मानवी जीवनात सुख-दुःख, आनंद, प्रेम, मैत्री अशा भावना आहेत. त्यांना अनुसरूनच एखादा व्यक्ती स्वतःचे जीवन जगत असतो. त्या भावना कलेमार्फत व्यक्त होत नसतील तर मानवी जीवनात सुंदरता झळकणार नाही. त्यामुळे कलावंत नसतील तर समाजातील जो वर्ग भावनाशील आहे त्यांची अत्यंत कुचंबना होईल.
कलावंत नसतील तर आपण आपली परंपरा आणि संस्कृती टिकवू शकणार नाही. जीवनात मानसिक स्तरावर विकसित होण्यासाठी मनुष्याला भावना जोपासायला लागतात नाहीतर समाजात भावनिक मूल्य कमी होत जाते आणि एक निरर्थक स्पर्धा निर्माण होते ज्यामध्ये फक्त वैमनस्य वाढीस लागत असते.
संगीत, नृत्य, अभिनय, चित्रकला, शिल्पकला आणि साहित्य अशा विविध कलांद्वारे समाजातील कलावंत आपले जीवन जगत असतात. अत्यंत सूक्ष्म आणि सहज भावाने ते जीवन व्यक्त करत असतात. जर असे कलावंत नसते तर जीवनाची सुंदरता आणि अस्तित्वातील विविधता आपल्याला समजलीच नसती.
लहानपणापासून आपण आपल्या सभोवती कलांचे प्रदर्शन पाहत असतो. त्यामुळे आपले मनोरंजन होते आणि थोडासा विरंगुळा देखील मिळतो. एकदा का लोकांना कला आवडली की त्यामध्ये रस निर्माण होत जातो. जीवन हळूहळू कलापूर्ण आणि उदात्त बनत जाते. एखादी कला शिकण्याची आणि त्यातील तथ्य जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होत जाते.
जेव्हा जीवनात कला शिकण्याची आवड निर्माण होते तेव्हा आपण पाहतो की आपला भावनिक स्तर उंचावत आहे. कला शिकायला सुरुवात केल्यावर कलेमार्फत आपल्या प्रत्येक प्रकारच्या भावनांना व्यक्त होण्यासाठी वाट मोकळी होत जाते. अशावेळी आपल्याला आदर्श वाटणारे कलावंत हेच आपले गुरू बनत असतात.
कलावंत हे समाजमनाचा आरसा असतात. त्यांच्या कलेद्वारे ते जीवनाचा आणि सद्य परिस्थितीचा आढावा घेत असतात. कलावंत जगण्यात एक उत्साह निर्माण करत असतात ज्यामुळे लोकांना जीवन जगण्याचे प्रोत्साहन मिळत असते. त्यामुळे जर कलावंत नसते तर जीवन अगदीच निरस झाले असते, जगण्याची आधारभूत पद्धतीच हरवून गेली असती.
तुम्हाला कलावंत नसते तर हा मराठी निबंध (kalavant Naste Tar Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…