कर्माचे फळ तत्काळ मिळते | कर्म – फळ आणि संस्कार…

आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत की आपण जे भोगतो ती आपल्या कर्माची फळे आहेत. ते वास्तविक सत्य आहेच परंतु कर्माचे फळ तत्काळ त्याच क्षणी मिळते हेही तेवढेच सत्य आहे.

कर्म आणि फळ –

समजा आपण क्रोध केला तर त्याचे फळ आपल्याला त्याच क्षणी मिळत असते. त्याच क्षणी रक्तदाब वाढतो, त्याच हृदयाची धडधड वाढत असते. त्यानंतर काही वेळ तेच विचार त्याच भावना आपल्यावर परिणाम करत राहतात. अशा प्रकारची क्रोधाची घटना घडल्यावर आपल्याला दुःखद फळ तर त्याच क्षणी मिळते.

आपण कुटुंबात किंवा इतर ठिकाणी अधिकार पदावर असल्यास त्या रागाचा परिणाम म्हणजे आपल्या मनानुसार कामे तर होत राहतात पण व्यक्तिमत्व मात्र दूषित बनत जाते. आपण स्वतःचेच शत्रू बनत जातो.

क्रोध करणे हे व्यक्तीसाठी घातक आहेच परंतु काहीवेळा इतर जणांना त्या क्रोधाने आपण नियंत्रित ठेवू शकत असल्याने आपल्याला क्रोध करणे अत्यंत सवयीचे होऊन जाते. त्याचा परिणाम असा होतो की प्रेम, स्नेह, शांती, आदर, आनंद अशा गोष्टींचा स्पर्शही त्या व्यक्तीस होत नाही.

कर्म – फळ – संस्कार :

क्रोध केला म्हणजे त्याला आपण कर्म म्हणुयात, मन विषाक्त आणि दुःखी झाले तेव्हा आपल्याला त्याचे फळ मिळाले, असे समजुयात. आता सवय किंवा संस्कार कसा निर्मित होत असतो ते पाहुयात.

फळ मिळाल्यानंतर व्यक्ती त्या फळाची चिंता करत नाही तर बाहेर घडलेल्या परिणामाची काळजी करतो. म्हणजे क्रोधामुळे एखादे काम शक्य झाले तर ते काम वारंवार पूर्ण करवून घेण्यासाठी तो व्यक्ती क्रोधाचाच वापर करणार. भले त्याला माहीत असेल की क्रोध करणे ही वाईट गोष्ट आहे.

अशा प्रकारे बाहेर घडून येणाऱ्या परिणामासाठी तो आंतरिक कलह किंवा दुःख भोगण्यासाठी तयार असतो. अशाच प्रकारे जेव्हा जेव्हा क्रोध होतो तेव्हा त्याचा संस्कार मागे उरतो आणि तशी सवयच होऊन जाते.

वरील उदाहरण फक्त क्रोध या भावनेसाठी दिलेलं आहे. आनंद, सुख, चिंता, निराशा अशा अनेक भावनांसाठी आपण आपले कर्म, फळ आणि संस्कार तपासू शकतो.

कर्म – फळ – संस्कार यामुळे स्वभाव घडत जातो. त्यासाठी व्यक्तीने जर ठरवले की असे कोणते गुण असतील ज्याने आपले जीवन चांगले घडू शकते. त्यासाठी त्यापद्धतीचे कर्म करणे आवश्यक आहे. त्यानंतर कर्माचे फळ सुद्धा तत्काळ मिळेल, आणि त्याचेही संस्कारही घडत जातील.

समजा तुम्ही स्वतःहून कोणाची मदत केलीत, त्यावेळी तुम्हाला सुखाची अनुभूती होईल, तसेच संस्कार घडत जातील आणि तसाच तुमचा स्वभाव बनेल. मात्र कर्म हे सातत्याने होत राहिले पाहिजे.

आनंदी राहणे, प्रेमपूर्ण वागणे, शांततेने वागणे अशा काही सवयी असतील ज्या तुम्ही वारंवार केल्या तर तुमचा स्वभाव हळूहळू बदलू लागेल.

स्वतःहून चांगले वागणे जमत नसेल तर अशा व्यक्तींची संगत करा जे तुम्हाला चांगले वाटतात अथवा तशा पद्धतीचे वाचन करणे, तशी पुस्तके, ग्रंथ सतत वाचत राहणे यामुळे चांगले कर्म करण्याची प्रेरणा मिळत राहील.

Leave a Comment