आपण दुसऱ्याशी संवाद साधणे हेच तर मानवी आयुष्याचे मनोरंजन आहे तसेच मानवी भावना व्यक्त करण्याचे साधन म्हणून देखील संवाद आणि भाषा यांचा उपयोग होत असतो. भाषेचा वारंवार उपयोग आणि आपली स्मृती यांमुळे आपले विचार तयार होत जातात. ते विचार सहजपणे कसे प्रकट करावे याची संपूर्ण माहिती या लेखात दिलेली आहे.
एखादी परिस्थिती किंवा व्यक्ती असेल त्याच्याबद्दल आपण पूर्वग्रह बनवतो किंवा त्याचे वागणे कसे असेल याचा पूर्वानुमान लावतो. त्यामुळे अगोदरच मनात एका पद्धतीचा विचार तयार झालेला असतो. त्या विचारानुसार आपली वर्तणूक होत असते.
ही वर्तणूक जगण्यासाठी आवश्यक आहे. परंतु दुसऱ्यांच्या वागण्याचा त्रास होत असेल आणि त्याला आपले मत समजवायचे असेल तर आपले विचार आणि स्वभाव खंबीर आणि परखड असला पाहिजे. त्यानंतर आपण आपले विचार सहज मांडू शकतो.
आपण सर्वांचे ऐकून, एकमेकांचा मान राखून, दुसऱ्याला काय वाटेल याचा सतत विचार करून बोलत असतो परंतु त्यामुळे स्वतःचे विचार व्यवस्थित प्रकट करता येत नाहीतच शिवाय त्याचा परिणाम म्हणून व्यक्तित्व खुंटत जाते.
व्यक्तिमत्त्वात घट व्हावी असे जर वाटत नसेल तर नक्कीच आपले विचार हे जिवंत अनुभवातून आणि निरिक्षणातून प्रकट झाले पाहिजेत. त्यासाठी भरपूर वाचन, ज्ञानी लोकांचा व्यासंग, सकारात्मक जीवन जगण्याकडे कल असायला हवा.
विचार सहज प्रकट करण्याच्या तीन पायऱ्या –
१. बडबड बंद करणे / अनावश्यक बोलणे टाळणे
आपण सकाळी उठल्यापासून खूप वेळेस अनावश्यक बडबड करत असतो. गरज नसताना, कोणीही विचारले नसताना दुसऱ्यांच्या जीवनात किंवा परिस्थितीत नाक खुपसत असतो.
त्यामुळे आपला बौद्धिक विकास तर होत नाही पण विनाकारण आसपास सर्वांबद्दल मत तयार होत जाते. त्याच सवयी मुळे आपण आपल्याला बरोबर समजू लागतो आणि दुसऱ्याला चुकीचे ठरवत जातो.
पुढील उदाहरणे वाचा –
✓मुख्यमंत्र्यांनी काय केले पाहिजे याची चर्चा गावातील पारावर होत असते.
✓शिक्षकांनी कसे वागले पाहिजे हे पालक ठरवतात आणि काहीवेळा विद्यार्थ्यांना देखील ते कळत असते.
✓कंपनीतला बॉस किती उद्धट आहे हे तेथे काम करणाऱ्या लोकांना कळत असते.
✓शेजारील स्त्रीचे वागणे कसे चुकीचे आहे हे पुरुष ठरवत असतात.
वरील सर्व उदाहरणांवरून काय दिसून येते? आपले काम नसताना दुसऱ्या व्यक्तीवर अथवा परिस्थितीवर टिप्पणी देणे. यामधून एक विश्वास प्रक्रिया तयार होत जाते जी बहुतेक वेळा चुकीची असते आणि स्वतःच्या प्रगतीत आड येत असते.
यातून बाहेर येण्यासाठी सर्वप्रथम शांत बसायला शिका. आपले काम नसताना बोलू नका, विचारले नसताना मत मांडू नका.
२. निरीक्षण वाढवणे / जागरूकता (Observation)
जेव्हा तुम्ही शांत राहायला शिकता, विनाकारण कोणावरही टिप्पणी देत नाही तेव्हा कळून येते की इतर लोकांचे वागणे हे बहुतेक वेळा त्यांनी इतरत्र ऐकलेल्या किंवा बघितलेल्या गोष्टीच आहेत. त्यामध्ये ज्ञानाचा किंवा प्रतिभेचा काहीएक संबंध नाहीये.
त्यामुळे निरीक्षण करायला सुरुवात करा. सुरुवातीला अगदी कंटाळवाणे वाटेल पण हळूहळू जीवनातल्या छोट्या छोट्या समस्या सोडवल्या गेल्यावर मज्जा वाटू लागेल आणि तुम्ही आणखी जागरूक व्हाल.
निरीक्षण करताना मन आणि विचार एकदम शांत आणि स्थिर असावे लागतात. अशा स्वरूपाचे मन, स्वतःहून शांत राहण्यातून आणि निरिक्षणातून घडत असते.
शांत मनाचा व्यक्तीच योग्य विचार करून योग्य निर्णय घेऊ शकतो. त्याच्या बोलण्यात मधुरता आणि स्पष्टता येते. तो कधीही फसू आणि फसवू शकत नाही.
३. प्रामाणिकपणा
विनीत हा गॅरेजमध्ये काम करतो. त्याचे काम उत्तम आहे. खूप शांत स्वभावाचा विनीत हा प्रत्येक काम नीट समजून घेतो आणि करतो. इतरत्र काहीही गप्पा मारत नाही म्हणजे वेळ वाया घालवत नाही.
तो ग्राहकांना विनाकारण कधीच फसवत नाही. गेल्या पाच वर्षात त्याच्या या स्वभावामुळे ग्राहकांचा त्याच्यावरील विश्वास खूप वाढला आहे. त्याचे जीवन उत्तम चालले आहे.
वरील उदाहरणात दिसून येते की, विनीतला स्वतःचे काम चांगले असणे आवडते, त्याचे निरीक्षण चांगले आहे आणि त्याच्या कामात तो तरबेज आहे. आणखी काही वर्षात तो एक नावाजलेला मेकॅनिक बनेलच, यात शंकाच नाही!
आपले वागणे आणि काम प्रामाणिक असेल तर आपले बोलणे देखील स्पष्ट होत जाते. त्यासाठी नैतिकता आणि प्रामाणिकपणा जोपासावा लागतो. कोणालाही फसवणार नाही अशी भावना असावी लागते.
प्रामाणिकपणा जोपासल्यानंतर आपल्याला स्वतःच्या कामात आणि वागण्यात हळूहळू विश्वास येऊ लागतो. स्वतःवर विश्वास निर्माण झाल्यावर इतरांनाही आपल्यावर विश्वास वाटू लागतो.
त्यानंतर आपण जे बोलू, जेथे बोलू, ज्यांच्या सोबत बोलू ते स्पष्ट आणि परखडच असेल! त्याला इतर कोणाच्याही विचारांची झालर नसेल, कोणाच्याही मान्यतेची गरज नसेल. ते बोलणे आणि वागणे स्वानुभवातून आलेले असेल.