आपल्याला नित्य जीवनात विचारांचा घोळ सतत जाणवत राहतो. आपली वैचारिक विषमता आपल्यालाच सलते. त्याच्यावर आधारित हा लेख तुम्हाला नक्की नवीन दृष्टी देऊन जाईल. लेख वाचून झाल्यावर मात्र त्यातील मुद्द्यांवर नक्की विचार करा.
सकाळी उठल्यावर जी गती आणि तीव्रता जगण्यासाठी आपल्याला हवी असते ती गती न मिळाल्याने आपण एकदम सुस्त होऊ शकतो. आपले काम एकदम मंद गतीने होऊ लागते. मग सर्व जीवन ऊर्जा विचार करण्यात निघून जाते आणि खरोखर कृती करण्यासाठी शारीरिक पातळीवर ऊर्जा शिल्लक राहत नाही.
ऊर्जा सतत एका दिशेने प्रवाहित नसल्याने असंख्य प्रकारचे विचार मनात येत राहतात. दिवसाची सुरुवातच जर ध्येय अथवा कामाच्या दिशेने नसल्यास विचारांचा कल्लोळ माजू लागतो. त्यामुळे बुध्दी एका विचारावर स्थिर राहत नाही.
तुम्हाला जीवनात काय प्राप्त करायचे आहे, त्यानुसार विचारांची एका दिशेने वाटचाल होणे गरजेचे आहे. त्या एका दिशेने प्रवाहित झालेल्या विचारांनीच आपल्या ऊर्जेत नवा संचार होऊ लागतो आणि आपल्याकडून कृती केली जाते.
बहुतेक वेळा मनात आलेल्या विचारांचे फक्त निरीक्षण न करता आपण त्यांना प्रतिसाद देऊ लागतो, येथेच आपण फसतो. विचारांना प्रतिसाद न देता त्यातील आपल्या कामाचे आणि आवश्यक किती प्रकारचे विचार आहेत हे पाहावे लागेल. त्यानंतरच खऱ्या अर्थाने आपल्या मनात विचारांचा घोळ होणार नाही.
समजा आपल्या मनात दिवसभरात शंभर प्रकारचे विचार येत असतील, त्यातले कदाचित दहा विचार फक्त आपल्या कामाशी निगडित असतील. अशा विचारांनाच प्रतिसाद देणे गरजेचे आहे. तर आणि तरच आपल्या कामात आपल्याच विचारांचे आणि भावनांचे अडथळे येणार नाहीत.
जीवन ऊर्जा ही एका दिशेने प्रवाहित झाली की ध्येय प्राप्ती होईलच यात शंकाच नाही. परंतु ती गती आणि प्रवाह बाह्य प्रेरित नसले पाहिजेत. कोणी व्यक्ती किंवा परिस्थिती त्यासाठी कारणीभूत नसले पाहिजेत तर ती गती तुम्ही अंतर्गत प्रेरणेतून निर्माण केली पाहिजे.
विचारांचा घोळ का होतो ?
• आपले ध्येय निश्चित नसते. त्यानुसार कामाला प्राधान्य दिलेले नसते.
• दिवसातील काम नियोजित नसते.
• सर्व काही अनिश्चित असल्याने विचार, भावना आणि ऊर्जा या कोणत्याही दिशेला प्रवाहित होत राहतात.
• भावनामय वातावरण असेल तर आपले विचार देखील त्याच दिशेने जातात. तसेच आपले विचार जसे असतात तशाच भावना देखील निर्माण होत राहतात.
• त्यामुळे ऊर्जेची क्षमता ही अंतर्गत कार्यातच समाप्त होते आणि शारीरिक स्तरावर कोणतेही काम पूर्ण होत नाही.
• त्याचा परिणाम म्हणून विचारांचा घोळ मात्र वाढत जातो.
विचारांचा घोळ कसा थांबवायचा ?
• सर्वप्रथम जीवनात कामाचे नियोजन आणि त्यानुसार दिवसाची प्राधान्यता ठरवली गेली पाहिजे.
• रात्री झोपताना आपण जसा विचार करतो किंवा जी कृती करतो त्याचा सकाळी आपल्या वागण्यात परिणाम जाणवतो म्हणून रात्री झोपताना उद्याच्या महत्त्वाच्या आणि नियोजित कामाची कल्पना करायची आणि झोपी जायचे.
• सकाळी उठल्यावर आपली ऊर्जा, विचार आणि भावना त्या कामाच्या दिशेने प्रवाहित होतील अशा सूचना आणि वाक्ये मनातल्या मनात बोलावी लागतील. त्या सूचना बुद्धीला मान्य होईपर्यंत म्हणजेच मनातील इतर विचार शांत होईपर्यंत द्यायच्या आहेत.
• आता दिवसभर तुम्ही मनातून शांत आणि स्थिर अनुभव करू शकाल आणि आपल्या कामात ध्यान देऊ शकाल. विचारांचा घोळ बऱ्यापैकी कमी झालेला असेल.
• तुम्ही भविष्याचे निर्णय आणि कल्पना यांचा विचारही करू नका. एक – एक दिवस ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत राहा. एका दिवसाचे काम कसे पूर्ण होईल, त्या दिवसाचा अनुभव कसा काय चांगला असेल, त्याचाच विचार सतत राहुद्या.