रस्ता सुरक्षा ( Road safety ) हा प्रश्न मागील दोन दशकांत सतावू लागला आहे. रस्ता सुरक्षा आणि मानवी जीवन याचा विचार आता सुरू झाला आहे. एका चुकीमुळे किती मोठे नुकसान होऊ शकते परिणामी लोकांना त्यांचे प्राणही गमवावे लागत आहेत. रस्ता सुरक्षेचा मुद्दा हा व्यक्ती, प्राणी, वृक्ष या सर्वांची सुरक्षा असाच घेतला पाहिजे.
लोक रस्त्यावरून चालत प्रवास करत असतात. त्यांना जी कसरत करावी लागते, त्याचा काही हिशोब नाही. आज गर्दीतून प्रवास करताना सर्वजण घाईत असतात त्यामुळे रस्ता सुरक्षा हा मुद्दा विद्यार्थ्यांना लवकरात लवकर समजणे आवश्यक आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षा निबंध ( Road Safety Essay In Marathi ) त्यांना शाळेत असताना लिहायला लावतात. हा निबंध मुद्देसूद असणे अपेक्षित आहे.
रस्ता सुरक्षा निबंध | Road Safety Marathi Nibandh |
आजची वाढलेली लोकसंख्या आणि त्यामुळे जगण्याची वाढलेली स्पर्धा ही जीवघेणी ठरत आहे. गरजेपुरती धावपळ आवश्यक आहे परंतु हव्यास आणि लोभासाठी माणूस स्वतःचे प्राण देखील गमावण्यास तयार होत आहे. त्यामध्ये रस्ता सुरक्षा किती महत्त्वाची आहे हा मुद्दा समोर येत आहे. वाढती वाहने आणि प्रदूषण, नको असलेली गर्दी, सर्वांचा एकत्र निवास या गोष्टी अक्षरशः माणसाचा दम काढत आहेत.
सर्व कामकाज आणि उद्योग हे शहरात वाढत आहेत त्याप्रमाणे तेथील लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. गावाकडील लोक देखील शहरात स्थलांतरित होत आहेत. दळणवळण आणि प्रवासासाठी वाहनांची संख्या वाढली आहे. रस्त्यावरून फिरणे कठीण होऊन बसले आहे. रोज एक तरी बातमी अशी ऐकू येते की रस्त्यावरून चालताना एक व्यक्ती अपघाताने दगावला!
रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे. माणूस जवळचे अंतर असले तरी गाडीनेच फिरणे पसंत करतो. त्यामुळे गर्दी मात्र रस्त्यावर झालेली दिसते. मग रस्त्यावरून चालणाऱ्या माणसांना त्याचा त्रास होणारच की! रस्त्यावर वाहनांची सुरक्षासुद्धा त्यामुळे धोक्यात येऊ लागली आहे. व्यवस्थित आणि सुरक्षित रस्ता असताना देखील अपघात होतात तर रस्ता खराब असेल तर किती अपघात होत असतील, याचा अंदाज आपण लावू शकतो.
आता प्रत्यके राज्य किंवा देशाचे सरकार काही अधिनियम लागू करत असते. ज्यांचा प्रत्येक व्यक्तीने अवलंब करणे आवश्यक आहे. व्यक्तीचा संबंध जेव्हा प्रवासाशी येतो तेव्हा, वाहन जर खाजगी असेल तर ते नियम पाळले गेले पाहिजेत. रस्त्यावर सिग्नल असतात त्यानुसार प्रवास करणे, स्टॉप सिग्नल आल्यावर थांबणे, कमी वेगात गाडी चालवणे, हॉर्नचा वापर गरजेनुसार करणे, पायी चालणाऱ्या व्यक्तींना त्रास होईल असे काहीही न करणे, ही सर्व कर्तव्ये आणि नियम खाजगी वाहन असणाऱ्यांनी पाळले पाहिजेत.
रस्ता सुरक्षा म्हणजे कोणाच्याही जीवावर बेतले जाऊ नये, याचसाठी केलेल्या उपाययोजना! ट्रॅफिक पोलिस ही यंत्रणा त्यामुळेच उदयास आली. ठिकठिकाणी जर पोलिस असतील तर लोक व्यवस्थित रस्ता आणि वाहन नियम पाळतील नाहीतर लोकांना आर्थिक दंड भरावा लागेल. नियम तोडणे हे जर कोणाच्या जीवावर बेतले असेल तर वाहन मालकाला कारावासाची देखील शिक्षा होऊ शकते.
ट्रॅफिकचे नियम हे सर्वांना माहीत पाहिजेत तरच आपण व्यवस्थितरित्या सुरक्षित वाहन चालवू शकतो. आज तुम्ही मोबाईलवर देखील सर्व रस्ता सुरक्षा नियम वाचू शकता. कुठलेही वाहन असले की त्याची कागदपत्रे, चालक परवाना, इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. यदाकदाचित जर अपघात झाला तर तुमचे जास्त आर्थिक नुकसान तरी होऊ नये. लहान किंवा किशोरवयीन मुलांनी ट्रॅफिकमध्ये गाडी चालवू नये. चालक परवाना मिळाल्यानंतरच वाहन चालवण्यासाठी घ्यावे नाहीतर स्वतःबरोबर इतर व्यक्तींचा जीव देखील तुम्ही धोक्यात घालू शकता.
ट्रॅफिक पोलिस आणि सरकार हे गर्दीच्या विविध नियमांचे फलक लावत असते. ते फलक आणि त्यावरचे नियम, सूचना या समजल्या पाहिजेत. वाहन योग्य गतीने चालवणे आणि मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी न घेणे हे चालकाचे कर्तव्य आहे. रस्ता सुरक्षा त्यामुळे धोक्यात येऊ शकते. शाळा, मंदिरे, वाचनालये, बागा, जेथे गर्दी जास्त असते अशा ठिकाणी सर्व बाजूंनी बघून, सर्वांची काळजी घेऊन वाहन चालवणे अपेक्षित असते. जर चुकून अपघात झालाच तर त्वरित पोलिसांना कळवावे.
रस्ता सुरक्षा ही कोणा एकाची जबाबदारी नाही तर सर्व नागरिकांचे ते कर्तव्य आहे. काळजी जर घेतली नाही तर शारीरिक हानी आणि आर्थिक नुकसान होत असते याचा विचार करावा. सरकार किंवा पोलिस हे सर्व नियम लागू करू शकतात पण ते पाळण्याची नैतिक जबाबदारी आपलीच असते. त्यामुळे सुरक्षित वाहन चालवा, व्यवस्थित रस्ता पार करा, आणि सर्व रस्ता सुरक्षेचे नियम पाळा. असे केल्याने स्वतःबरोबर दुसऱ्याचेही प्राण तुम्ही वाचवत असता.
तुम्हाला रस्ता सुरक्षा मराठी निबंध ( Road Safety Essay In Marathi ) कसा वाटला? याबद्दलचा अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा…