व्यायामाचे महत्त्व – मराठी बोधकथा | Marathi Bodhkatha |

बोधकथा ऐकणे अथवा सांगणे सर्वांनाच आवडते. त्यातून होणारा बोध हा आपल्या जीवनातील सुद्धा अनुभव असू शकतो.

व्यायाम केल्याने आपल्या जीवनात कसे बदल घडून येऊ शकतात अशा आशयाची व्यायामाचे महत्त्व ही मराठी बोधकथा (Marathi Bodhkatha) आहे.

व्यायामाचे महत्त्व | Marathi Bodhkatha | Marathi Moral Story |

कुणाल इयत्ता बारावीत शिकणारा मुलगा पण शरीराने खूपच रुष्ट आणि बारीक दिसायचा. तो अभ्यासात मात्र हुशार होता. त्याचे वर्गमित्र आणि घरचे नेहमीच त्याला ‘सुका बोंबील’ म्हणून चिडवायचे. अभ्यासात हुशार असणारा कुणाल असे टोमणे ऐकून पुरता कंटाळला होता.

कुणाल कोणताच मैदानी खेळ खेळत नसे अथवा त्याला शारिरीक कष्टाची देखील आवड नव्हती. व्यायाम करण्याची सुप्त इच्छा त्याला असायची पण लहानपणापासून तशी सवय नसल्याने कशी काय सुरुवात केली पाहिजे हे त्याला समजत नव्हते.

बारावीची परीक्षा झाल्यावर त्याने प्रणच घेतला. अत्यंत हळुवार पद्धतीने व्यायाम सुरू केला. पहाटे उठून पळायला जाऊ लागला. सुरुवातीला पायाला गोळे आले होते परंतु त्याने हार मानली नाही. सातत्याने 1 महिना धावल्यानंतर त्याने आहारात मोठा बदल केला. पूर्ण पोषण आहार घेण्यास सुरुवात केली. दोन मोकळ्या रंगांच्या डब्यात सिमेंट भरून वजन तयार केले. ते वजन तो रोज उचलू लागला.

लगबग 3 महिन्यानंतर कुणाल आता धष्टपुष्ट दिसू लागला होता. त्याचा दिवसभराचा दिनक्रम असा असायचा की त्यामध्ये 1 तास व्यायाम आणि 2 km धावणे हे असायचेच. सर्वात महत्त्वाची गोष्ट जी त्याने मला सांगितली, तो म्हणायचा, “शारिरीक बदल महत्त्वाचे आहेतच, ते केल्यानेच माझ्या attitude मध्ये आणि माझ्या स्वभावात फरक पडलेला आहे.”

बोध / तात्पर्य –

कुणालला आलेला अनुभव हा कित्येक लोकांचा अनुभव असू शकतो. व्यायाम सुरू केल्यावर अगदी नको नको होत असते. सर्व अंग भरून येते. व्यायाम करताना अत्यंत वेदना जाणवतात. मनाला वेदनेची सवय नसल्याने मन नको म्हणत असते. पण सुरुवातीच्या कष्टातून तुम्ही पार झालात की त्यानंतर एक अत्यंत सुखदायी अनुभव आपले शरीर अनुभव करत असते.

एका स्वस्थ शरीरात एक स्वस्थ मन वास करत असते असे म्हणतात, ते खरेच आहे. कुणालला जाणवलेला स्वभावातील बदल हा स्वस्थ मनाचेच लक्षण आहे. खूप जण फक्त विचार करत राहतात की व्यायाम करायचा आहे पण सुरुवात करत नाहीत. काहीजण सुरुवात करतात आणि लगेच बंद करतात.

व्यायामात सर्वात जास्त कोणती गोष्ट महत्त्वाची असेल तर ती म्हणजे “सातत्य”! रोज ठरवलेला व्यायाम करणे हे मनाला पटत नाही. मन सवयींचे गुलाम असते. लहानपणापासून लागलेल्या सवयी आपल्याला नवीन काही बदल करून देत नाहीत. इथेच आपल्या इच्छाशक्तीचा वापर करणे गरजेचे आहे.

समजा, कोणी लहान असल्यापासून व्यायाम करत असेल त्याच्यासाठी व्यायाम करणे ही अत्यंत सहज गोष्ट आहे, कारण त्याची ती सवय बनलेली आहे. जे लोक व्यायाम करत नाहीत त्यांनी फक्त एवढेच समजले पाहिजे की त्यांना व्यायामाची सवय नाहीये. सुरुवातीला एक आठवडा, त्यानंतर एक महिना, सहा महिने असे सातत्याने काहीतरी नियोजन करून सुरुवात करणे गरजेचे आहे.

व्यायामानंतर जे बदल जाणवतात ते शब्दात व्यक्त करता येत नाही. असे म्हणू शकतो की जेवढा व्यायाम किंवा शारिरीक कष्ट जास्त तेवढाच आरोग्यदायी अनुभव जास्त! व्यायाम करणाऱ्या व्यक्ती तुम्हाला कधीच आजारी किंवा रोगट दिसणार नाहीत, हे वास्तव आहे. स्वतःच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे कधीही हितावह असते.

व्यायाम या विषयावर जेवढे बोलू तेवढे कमीच होईल; काही गोष्टी अशा असतात, ज्या करण्यात धन्यता मानावी. व्यायामसुद्धा त्यापैकीच एक आहे.

तुम्हाला व्यायामाचे महत्त्व ही मराठी बोधकथा (Marathi Bodhkatha) आवडली असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment