प्रार्थनेचे महत्त्व | Importance of a Prayer In Marathi |

प्रत्येक मंगळवारी किंवा रविवारी मंदिरात जाणे हा माझा आणि प्रदिपचा उपक्रम! ते दोन दिवस आम्ही तासभर तरी मंदिरात असतो. प्रार्थना करणे, तेथील भजन ऐकणे हे एवढे मनाला प्रसन्न करून जाते की टीव्हीवरील मनोरंजन त्यापुढे फिके पडते.

असाच एकदा प्रदिपची वाट पाहत मंदिराबाहेर उभा होतो. एक व्यक्ती भरभर चालत आला, मोबाईल वर बोलत होता तो, त्याने अशा गडबडीत चपला काढल्या न काढल्या तोच फोन वरून कोणालातरी अभद्र असे बोलू लागला. त्याचे ते शब्द मंदिराच्या वातावरणात अशोभनीय होते. प्रदीप येईपर्यंत मनात असा विचार आला की हा व्यक्ती जर सरळसरळ तोंडातून असे विचित्र शब्द बोलत असेल तर मनातून तो किती शिवीगाळ करत असेल.

तो पटकन मंदिरात गेला आणि 5 मिनिटात माघारी आला देखील! आता तर मला प्रश्नच पडला, का गेला असेल तो मंदिरात? पाच मिनिटे वेळ देऊन त्याने काय प्रार्थना केली असेल? प्रार्थनेसाठी किंवा देवदर्शनासाठी 5 मिनिट वेळ असावा तोदेखील मोबाईलवर शिवीगाळ करत करत!

प्रदीप आल्यानंतर आम्ही मंदिरात गेलो. पण तो प्रसंग माझ्या मनात अनेक प्रश्न ठेवून गेला. प्रार्थना जीवनात किती महत्त्वाची ठरू शकते? लहानपणी लागलेली एक सवय आपले पूर्ण जीवन बदलून टाकू शकेल का?

सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना प्रार्थना करणे म्हणजे आपले जीवन कसे असावे याची रूपरेषा आपण नित्यनेमाने स्वतः ला सांगत असतो. ते शब्द सातत्याने बोलले गेल्याने आपल्या मेंदूपर्यंत ती एक प्रकारे सूचना असते. त्या सूचनेचे पालन मनाला करावेच लागते. त्यामुळे प्रार्थना केल्याने खरोखरच मनःशांती लाभू शकते. असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

आपल्या अहंकाराला दुजोरा न देता प्रार्थनेत आपण देवाला उच्च स्थान देतो किंवा काही दैवी गुणांचा पुरस्कार करत असतो. त्यामुळे ते शब्द हे आपल्या जीवनात हळूहळू गुण बनून उतरत जातात. म्हणजेच आपण जे मनातल्या मनात बोलत राहतो तेच आपले वास्तविक जीवन बनत असते.

तो मंदिरातील 5 मिनिटांचा व्यक्ती जे शब्द फोनवर बोलताना वापरत होता त्याचे मन कसे असेल हे वेगळे काही सांगायची गरज नाही. अशा व्यक्तीच्या तुम्ही संपर्कात जरी आलात तरी तुमचे देखील मन अशातच होणार!

प्रार्थना केल्याने सुख समाधान लाभते कारण त्यासाठी तुमचे मागणे हे देवाकडे नसते तर स्वतःच्या चांगल्या जीवनासाठी तुम्ही केलेली मनोकामना असते. त्यामुळे प्रार्थना करताना देखील भौतिक वस्तूंची मागणी देवाकडे करू नये. ज्या गोष्टी मानवी प्रयत्नांनी शक्य आहेत त्या तर चुकूनही देवाकडे मागू नयेत. याउलट त्या गोष्टी मिळवण्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नांना यश येऊदेत… असं काही मागणं प्रार्थनेत असू शकेल.

प्रार्थनेने आपले विचार शुद्ध होत जातात. मन प्रसन्न आणि पवित्र बनत जाते. परिणामी जीवनात आनंद उतरू लागतो आणि खऱ्या मानसिक शांततेची अनुभूती येऊ लागते.

Leave a Comment