बॉर्डर – गावस्कर ट्रॉफीसाठी खेळत असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत या उभय संघांतील पहिला कसोटी सामना नागपूर येथे खेळवला गेला. भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि १३२ धावांनी पराभूत करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतलेली आहे.
ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात अवघ्या १७७ धावांवर ऑल आऊट केल्यानंतर भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ४०० धावा झाल्या. त्यामध्ये जडेजा आणि अक्षर पटेल यांची अर्धशतके तर रोहित शर्माचे शतक समाविष्ट आहे.
सामन्याचा निकाल तिसऱ्या दिवशीच –
भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्हीही संघ या सामन्यासाठी तुल्यबळ मानले जात होते. परंतु भारताने आपली फलंदाजी आणि गोलंदाजी सरस ठेवत अक्षरशः तिसऱ्या दिवशीच सामना निकालात काढला.
ऑस्ट्रेलिया २२३ धावांनी पिछाडीवर असताना दुसऱ्या डावात प्रतिकार करेल असे वाटले होते. वॉर्नर, ख्वाजा, लबुशेन, स्मिथ, कॅरी अशी भक्कम फलंदाजी असतानाही त्यांच्याकडून अपेक्षित अशी कामगिरी झाली नाही आणि ऑस्ट्रेलियासारखा तुल्यबळ संघ अवघ्या ९१ धावांत आटोपला.
फिरकीपटुंचा या सामन्यात चांगलाच दबदबा राहिला. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात आश्विनने पाच बळी टिपले, शमी व जडेजा यांनी प्रत्येकी २-२ तर अक्षरने एक बळी घेतला आणि सामना भारताकडे झुकवला. मालिकेत १-० आघाडी घेतल्याने रोहित आणि टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!