रक्त हे कृत्रिमरित्या तयार होत नसते. ते प्रत्येकाच्या शरीरात नैसर्गिकरित्या उपलब्ध असते आणि निर्माण देखील होत असते. कधी कोणाला रक्ताची गरज भासलीच तर रक्त उपलब्ध असावे आणि ते मानवाचेच असावे यासाठी अतिरिक्त रक्त हे दान स्वरूपात लोकांकडून घेण्यात येते. लोकांनी स्वेच्छेने रक्तदान करावे असे आवाहन त्यानिमित्ताने केले जाते.
रक्त मिळाल्याने एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. तसेच बाहेरून रक्त पुरवठा झाल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून येते. त्यामुळेच रक्तदानाचे महत्त्व अधिक लोकांना कळावे आणि रक्तदान करण्यासाठी लोक प्रवृत्त व्हावेत यासाठी प्रत्येक वर्षी १४ जून रोजी रक्तदाता दिन संपूर्ण जगभरात साजरा केला जातो.
प्रत्येक वर्षी रक्तदाता दिनासाठी एक घोषवाक्य दिले जाते. या वर्षी म्हणजे २०२४ साली ‘देणगी साजरी करण्याची 20 वर्षे: रक्तदात्यांचे आभार!‘ असे घोषवाक्य आहे.
जागतिक रक्तदाता दिन – १४ जून
जागतिक आरोग्य संघटना, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस आणि रेड क्रीसेट सोसायटीज यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वप्रथम २००४ साली १४ जून या दिवशी जागतिक रक्तदाता दिवस साजरा करण्यात आला होता. त्यानंतर प्रत्येक वर्षी १४ जून रोजी रक्तदाता दिन साजरा करण्यात येऊ लागला.
रक्तदान केल्याने शरीरास कोणताही धोका नसतो. रक्तदान केल्यावर शरीरातील कमी झालेले रक्त पुन्हा निर्मित होत असते. त्यामुळे आपण रक्तदान केल्यावर एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात अशा मानवी भावनेने जागृत होऊन सर्वांनी नक्की रक्तदान करावे. दवाखाने, रक्तपेढी संस्था रक्त जमा करून घेतात आणि आवश्यक वेळी त्या रक्ताचा पुरवठा करतात.
रक्तदाता दिनी लोकांनी रक्त द्यावे असा प्रचार केला जातो. त्यानिमित्ताने रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. लोकांमध्ये जनजागृती केली जाते. रक्तदानाचे महत्त्व लोकांना पटवून सांगितले जाते. रक्तदानाचे महत्त्व स्पष्ट करणारे संदेश सोशल मीडियावर पाठवले जातात.