प्रस्तुत लेखात सूर्यनमस्कार माहिती (Suryanamaskar Information In Marathi) विस्तृत स्वरूपात देण्यात आलेली आहे. त्यामध्ये सूर्यनमस्काराचे महत्त्व, सूर्यनमस्कार घालण्याचे फायदे व सूर्यनमस्कार कसा करावा हे मुद्दे स्पष्ट करण्यात आलेले आहेत.
सूर्यनमस्काराचे महत्त्व | Importance of Suryanamaskar
सूर्य सर्व सजीव सृष्टीचा जीवन स्त्रोत आहे. सूर्याचे सानिध्य लाभल्यास अनेक आरोग्याच्या समस्या दूर होतात. तसेच दीर्घायुष्य आणि उत्तम जीवनाची अनुभूती देखील लाभते. याची जाणीव आणि पुरेपूर अभ्यास भारतात प्राचीन काळापासून आहे.
प्राचीन धार्मिक ग्रंथ आणि योग सूत्रांत सूर्याचे आणि त्याच्या उपासनेचे महत्त्व सांगितले गेले आहे. कोवळ्या ऊनाच्या केवळ स्पर्शाने आपल्या शरीरात एक नवीन जीवन ऊर्जा प्रवाहित होऊ शकते. त्यामुळे अनेक व्यायाम प्रकार आणि योगासने ही सकाळी कोवळ्या ऊनात करावयाची असतात.
सूर्याच्या कोवळ्या किरणांचा लाभ आपल्या जीवनात, म्हणजेच शारीरिक, मानसिक आणि आत्मिक अस्तित्वात करून घ्यायचा असेल तर योगासने करायला सुरुवात करा आणि मुख्यतः सूर्यनमस्कार घालायला सुरू करावा. सूर्य नमस्कार घालण्याचा लाभ मानवी शरीरासाठी होतोच शिवाय मानसिक समाधानही प्राप्त होते.
पृथ्वी आणि सूर्य हे एका विशिष्ट प्रकारे एकमेकांच्या संपर्कात आहेत. मानवी शरीर हे पंच तत्त्वांनी बनलेले आहे. तत्वे जसे की पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांचा समावेश शरीरात होत असतो. या पंच तत्त्वांचा शरीरात असलेला मेळ व्यवस्थित बसला की आरोग्य प्राप्ती होत असते. तो मेळ बसवण्याचे काम सूर्यनमस्कार करत असतो. त्यासाठी तो खूपच उपयोगी आणि फायदेशीर ठरतो.
सूर्यनमस्काराचे फायदे |Health Benefits of Suryanamaskar
१. शारीरिक फायदे –
रक्त शुद्धी होऊन सर्व अवयवांना सुरळीत रक्त पुरवठा होतो. रक्तपुरवठा व्यवस्थित झाल्याने हृदय, मेंदू, फुफ्फुसे, यांची कार्यक्षमता वाढते. रक्तदाब नियंत्रणात येतो.
ऑक्सिजन पुरवठा जास्त झाल्याने शरीरात ऊर्जेची पातळी वाढते. तसेच शरीरातील विषारी घटकांचा निचरा होण्यास मदत होते.
स्नायू आणि हाडे बळकट बनतात. कॅल्शिअमची कमतरता पूर्ण केली जाते. कंबर आणि पाठीचा मणका लवचिक बनतो.
सूर्यनमस्कार हा वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा व्यायाम प्रकार आहे. त्यामुळे पचनक्रिया सुधारते त्याबरोबरच ऊर्जेची पातळी वाढल्याने अतिरिक्त भोजन ग्रहण केले जात नाही.
२. मानसिक फायदे
मनात येणारे विचार, नकारात्मक भावना कमी होऊ लागतात. त्यामुळे मनाची एकाग्रता वाढते. जीवन संपूर्ण असल्याची जाणीव होऊन समाधान प्राप्त होते.
सूर्यनमस्कारावेळी कराव्या लागणाऱ्या श्वसनक्रिया :
• पूरक – दीर्घ श्वास आत घेणे.
• रेचक – दीर्घ श्वास बाहेर सोडणे.
• कुंभक – श्वास रोखून धरणे.
(आंतर्कुंभक म्हणजे श्वास आत घेतल्यावर रोखणे आणि बहिर्कुंभक म्हणजे श्वास बाहेर सोडल्यावर रोखणे.)
सूर्यनमस्कार कसा घालावा ? Types/Methods of Suryanamaskar
सूर्यनमस्कार पूर्वेला तोंड करून सकाळच्या वेळी घालावा. सूर्यनमस्कार घालण्याचे एकूण दहा प्रकार/पद्धती आहेत. त्यांना आपण शरिराची स्थिती म्हणुयात.
स्थिती १
दोन्ही पाय जुळवावेत. दोन्ही हात जोडावेत. मान व शरीर ताठ ठेवावी. श्वासाची कुंभक स्थिती असावी.
स्थिती २
जोडलेले दोन्ही हात वरच्या दिशेने नेऊन शरीराला थोडे मागे वाकवावे. हात कोपऱ्यातून वाकवू नये. श्वासाची पूरक क्रिया करावी.
स्थिती ३
आता शरीराला पुढे वाकवत हात जमिनीकडे न्यावेत. दोन्ही हात जमिनीला पायाच्या बाजूला टेकवावे. गुडघे न वाकवता काही वेळ त्या आसनात थांबावे. श्र्वासाची रेचक क्रिया करावी.
स्थिती ४
हळूहळू गुडघे वाकवावे. एक पाय मागे न्यावा. हाताचे पंजे जमिनीला टेकलेले असावेत. दुसरा पाय दोन्ही हातांच्या मध्ये असावा. नजर वर असावी. श्वासाची पूरक क्रिया करावी.
स्थिती ५
हळूहळू दुसरा पाय देखील मागे न्यावा. दोन्ही पाय जुळवावे. दोन्ही पाय व हात ताठ असावेत. श्वासाची रेचक क्रिया करावी.
स्थिती ६
दोन्ही हात दुमडावे. छाती, गुडघे जमिनीला टेकलेले असावेत. श्वासाची कुंभक (बहिर्कुंभक) क्रिया करावी.
स्थिती ७
कमरेपासूनचा वरचा भाग हळूहळू वरच्या दिशेने उचलावा. डोके आणि नजर वर असावी. मांड्या, पाय जमिनीला टेकलेले असावेत. श्वासाची पूरक क्रिया करावी.
स्थिती ८
कंबर हळूहळू वरच्या दिशेला न्यावी. शरीराचा कोन तयार करावा. श्वासाची रेचक क्रिया करावी.
स्थिती ९
मागे नेलेल्या पायांपैकी एक पाय पुढे आणत स्थिती ३ प्रमाणे आसनात यावे. श्वासाची पूरक क्रिया करावी.
स्थिती १०
स्थिती २ प्रमाणे शरीर उभे करून मागच्या दिशेला वाकवा वे आणि पुन्हा दोन्ही हात नमस्कार करून पूर्ववत स्थिती १ मध्ये यावे. श्वासाची रेचक क्रिया करावी.
वरील १० आसने पूर्ण झाल्यानंतर एक सूर्यनमस्कार पूर्ण होतो. सवय झाल्यानंतर दररोज सूर्यनमस्कार वाढवत जावे. शरीर जास्त गतिमान असू नये. श्वासाची गती मंद असावी. सूर्यनमस्कार करण्याची प्रथमच वेळ असेल तर योगगुरू किंवा योग्य मार्गदर्शनाखाली तो सुरू करावा.
वरील सूर्यनमस्कार मराठी माहिती (Suryanamaskar Information In Marathi) हा लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा…