नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने फलंदाजी करण्याचा निर्णय यशस्वी जैस्वाल या उदयोन्मुख डावखुऱ्या फलंदाजाने रास्त ठरवला. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारतीय संघ सर्व बाद झाला खरा परंतु जमेची बाजू म्हणजे यशस्वी जैस्वालने शानदार द्विशतक झळकावले. भारताच्या पहिल्या डावात ३९६ धावा झालेल्या आहेत.
पहिल्या दिवशी भारताने ६ खेळाडूंच्या मोबदल्यात ३३६ धावा जमवल्या होत्या. त्या धावसंख्येवरून पुढे खेळाला सुरुवात झाली. जैस्वाल पहिल्या दिवशी १७९ धावांवर नाबाद खेळत होता. त्याने आज द्विशतक झळकावले आणि २९० चेंडूंचा सामना करत २०९ धावा पटकावल्या.
आश्विन (२०) हा मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला. त्यानंतर भारताची तळातील फलंदाजी लगेच बाद झाली आणि भारताला ३९६ धावांवर समाधान मानावे लागले. खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असतानाही भारतीय फलंदाजी मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरली.
संपूर्ण पहिल्या डावात फक्त यशस्वी जैस्वालचाच डंका वाजत होता. इंग्लंडतर्फे बशीर, अँडरसन आणि रेहान या गोलंदाजांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले तर हार्टलीने एक बळी टिपला.