जसं की आपण सर्व जण जाणतो की इंग्लंडचे फलंदाज हे धडाकेबाज खेळी करत असतात. त्याचाच नमुना पुन्हा एकदा आजच्या डावात दिसून आला. क्रोली आणि डकेट यांनी डावाची आक्रमक सुरुवात केली. अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर ५९ धावसंख्येवर डकेट (२१) कुलदीप यादवचा शिकार ठरला.
इंग्लंडतर्फे क्रोलीने तुफान फटकेबाजी केली. त्याने अवघ्या ७८ चेंडूत ७६ धावा काढल्या. त्याचा अडथळा अक्षर पटेलने दूर केला. श्रेयस अय्यरने त्याचा झेल टिपला. इंग्लंडचा स्टार फलंदाज रूट (५) आणि त्यासोबत भन्नाट फॉर्ममध्ये असलेला पोप (२३) आणि बेयरस्टो (२५) या तिघांचा अडथळा जसप्रीतने दूर केला.
त्यानंतर फलंदाजीसाठी आलेले फोक्स (६) आणि रेहान (६) यांना कुलदीपने फिरकीच्या जाळ्यात अडकवले. रेहान बाद झाला तेव्हा इंग्लंडचा स्कोअर १८२ – ७ असा होता. रेहान बाद झाल्यानंतर स्टोक्स आणि हार्टली यांनी आठव्या विकेटसाठी ४७ धावा जोडल्या. पुन्हा एकदा जसप्रीत गोलंदाजीसाठी आला आणि त्याने स्टोक्स (४७), हार्टली (२१) व अँडरसन (६) यांचा अडथळा दूर केला.
जसप्रीत बूमराहने या सामन्यात सहा बळी टिपले आणि सर्वात जलद १५० विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. इंग्लंड देखील पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारेल असे वाटले असतानाच भारताची गोलंदाजी मात्र अप्रतिम अशी झाली. त्यामध्ये बूमराह आणि कुलदीप यांनी मोलाचा वाटा उचलला.
भारताचा दुसरा डाव –
इंग्लंडचा डाव आटोपल्यावर भारताच्या दुसऱ्या डावातील ५ षटकांचा खेळ झाला ज्यामध्ये भारताने बिनबाद २८ धावा बनवल्या.