खाण्यावर नियंत्रण असणे खूप आवश्यक आहे फक्त नियंत्रणामुळे तुम्ही अनेक रोगांपासून दूर राहू शकता. परंतु पूर्वी झालेल्या चुकांमधून जर तुम्हाला मधुमेह झालाच असेल तर खाण्याबाबतीत काळजी घेणे अत्यावश्यक आहे. मधुमेही लोकांनी काही पदार्थ वर्ज्य करणे आवश्यक आहे.
रक्तातील साखरेचे प्रमाण आपल्याला काम करण्यासाठी ऊर्जा देत असते. परंतु ते प्रमाण नियंत्रणात असणेही तेवढेच महत्वाचे आहे. उपचारापेक्षा काळजी घेतलेली बरी अशी एक म्हण आहे. त्यामुळे अगोदर काळजी घेऊन तुम्ही अनेक रोगांपासून स्वतःला वाचवू शकता.
साखरेचे प्रमाण कमी असलेले पदार्थ खाणे आवश्यक आहे. काही फळांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. अशावेळी ती फळे खाल्ल्याने तुम्हाला फायदा होण्याऐवजी नुकसानच होईल. खाली दिलेली फळांबद्दल माहिती फायदेशीर ठरेल आणि त्यांचे सेवन मधुमेही लोकांनी जपून करावे.
Fruits with Sugar content | साखरेचे प्रमाण जास्त असलेली फळे –
चेरी – साखरेचे प्रमाण चेरीमध्ये खूप असते. सुमारे ७ ते ८ ग्रॅम एवढे प्रमाण चेरीमध्ये असते. चेरीचे अति प्रमाणात सेवन मधुमेही लोकांच्या आरोग्याला कधीच हितावह नसते. रक्तातील साखरेचे प्रमाण अगोदरच जास्त असल्याने चेरिमुळे ते आणखी वाढू शकते. चेरीचे आरोग्यदायी फायदे खूप आहेत. परंतु मधुमेही लोकांनी दोन हात दूर राहिलेले बरे!
आंबा – अनेक जण आश्चर्य व्यक्त करतील की मधुमेहात आंबा खाऊ नये! खाल्ला तरी चालेल परंतु नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण आंब्यामध्ये जास्त असते. त्यामुळे अगोदर रक्तातील शर्करा नियंत्रणात नसल्याने मधुमेही लोकांनी तरी आंबा खाणे टाळावे. सुमारे ४० ते ४५ ग्रॅम एवढी साखर एका आंब्यामध्ये असते. म्हणून सावधान व्हा. वर्षातून एकदा सीझन येत असला तरी तुमच्या आरोग्याबाबत खेळ करू नका.
द्राक्षे – द्राक्षे खाताना थोडी काळजी घ्यावी लागेल. थोडीशी द्राक्षे ठीक आहेत कारण अर्धा पावशेर द्राक्ष म्हणजे ३० ते ३५ ग्रॅम साखर! म्हणून त्रास वाचवण्यासाठी द्राक्षे सेवन न केलेलीच बरी. द्राक्षे खाल्ल्यानंतर रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
डाळिंब – डाळिंब हे जीवनसत्त्वयुक्त असे फळ आहे. रक्तातील हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन वाढवण्याचे काम डाळिंब करत असते. परंतु साखरेचे प्रमाणदेखील त्यात जास्त आहे. जवळजवळ ३५ ग्रॅम साखर एका डाळिंबामध्ये असते. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी डाळिंबाचे सेवन करून रक्तातील साखरेचे प्रमाण आणखी वाढवू नये.
लिची – १ वाटी लिची फळामध्ये साखरेचे जवळजवळ ३० ग्रॅम एवढे प्रमाण असते. जास्त साखरेचे प्रमाण असलेल्या फळांच्या प्रकारात लीचीचे देखील नाव आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राखण्यासाठी लिची फळ खाऊ नये.