चांगला संवाद बनवेल आपली नाती आणखीनच घट्ट!

आपल्याला नेहमीच वादविवाद लक्षात राहतो परंतु कोणी केलेला संवाद लक्षात राहत नाही. किंबहुना दिवसातून आपण देखील कितीतरी वेळा संवाद केलेला असतो पण त्याची दखल आपले मन घेताना दिसत नाही. आपण जर आपल्या अनुभवातून किंवा संवादाविषयी बारकाईने विचार केल्यास समजून घेऊ शकू की नाती, मैत्री आणि व्यावहारिक जीवनात संवादाचे किती महत्त्वाचे स्थान आहे.

दैनंदिन जीवनात आपला अनेक व्यक्तींशी संबंध येत असतो. त्यानिमित्ताने आपल्याला अनेक वेळा बोलावे लागते. आपले बोलणे होत असताना भावनिक व वैचारिक मतभेद निर्माण होण्याची शक्यता असते. तेव्हा भावना अनावर होऊन वाद देखील होतात. परंतु अशा वादाने नाती किंवा संबंध बिघडण्याची शक्यता निर्माण होत असते.

नातेसंबंध व्यवस्थित करायचे असतील तर वाद टाळावाच शिवाय तटस्थ अथवा व्यावहारिक बोलणे देखील टाळावे. तटस्थ बोलण्याने भावनेचा ओलावा जाणवत नाही तसेच आपल्याला यांत्रिक पद्धतीने वागावे लागते. त्यामुळे व्यक्तिला आपण वस्तूप्रमाणे वागवू लागतो आणि मग हळूहळू अबोला निर्माण होऊ लागतो.

प्रत्येक व्यक्ती हा विचार करतो. तसेच विचारांना भावनेचा आधार देखील असतो. त्यामुळे कोणाशीही नातेसंबंध व्यवस्थित प्रस्थापित करायचे असतील तर संवाद होणे अत्यावश्यक आहे. संवाद निर्माण झाल्यास नात्यात आपलेपणा जाणवू लागतो. नाते जिवंत बनू लागते. नाते जिवंत बनल्यास एकमेकांविषयी आदर, प्रेम व जिव्हाळा निर्माण होऊ लागतो.

एकदा जर आपल्याला संवादाची कला जमली की मित्रपरिवार वाढवणे, नवीन नातेसंबंध निर्माण करणे, त्यांना वाढवणे, नवीन ठिकाणी अनोळखी व्यक्तींशी बोलणे अशा बाबी आपल्याला सहजच जमतात. संवाद म्हणजे वरवरचे गोड बोलणे नसावे तर तो हृदयातून स्फुरलेला असायला हवा, आपल्या पूर्ण अस्तित्वानिशी असायला हवा.

नातेसंबंधांत संवाद हा फक्त तार्किक चर्चा नसावी तर माणूस म्हणून त्यामध्ये आपुलकी असायला हवी. शब्दांमध्ये प्रेम – करुणा – जिव्हाळा असावा. याउलट व्यावहारिक संवादात अनाक्रमक तर्क उपयोगी ठरतो. एकमेकांना समजून घेत, दृष्टिकोन जाणून घेत, नियम व अटी लागू करतच संवाद करावा लागतो. 

संवाद साधण्याची कला जाणून घेतली तर आपले वाद, इतरांसोबत मतभेद तसेच क्रोध व त्याकारणाने होणारी भांडणं खूप कमी होऊ शकतील. प्रत्येक जण एका वेगळ्या संस्कारांनी वाढलेला असतो. त्यानुसार त्याची विचारपद्धती व भावना निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे एकाएकी आपण संवाद सोडून जर वाद घातला तर आपल्याच कर्माने आपण अडचण निर्माण करू.

भाषा आणि शब्द एकदम निर्जीव आहेत. एखादा व्यक्ती भाषेतील शब्दांमध्ये किती ऊर्जा आणि भावना ओततो त्यातून संवाद घडत असतो. तसेच समोरच्या व्यक्तीला समजून घेऊन त्याचे म्हणणे व्यवस्थित ऐकून घेतल्यावर संवाद निर्माण होत असतो. त्यामुळे फक्त बुद्धीची कीव म्हणून आपण जर बोलत असू तर त्यातून फक्त बडबड निर्माण होईल त्यातून नाती घट्ट होण्याऐवजी बिघडतील.

Leave a Comment