कुटुंब म्हणून आपली एकत्र ओळख दर्शवताना कुटुंबातील सर्व लोकांनी वेगवेगळ्या वैचारिक आणि वैयक्तिक स्तरावर जगून चालत नाही. याच आशयाचा हा लेख सुखी कुटुंबाचे ७ नियम (Happy Family Rules in Marathi) तुम्हाला नक्की एक नवीन दृष्टिकोन देऊन जाईल अशी आशा करतो.
हे नियम कुटुंबात असताना, वावरताना पाळावयाचे नियम आहेत. कुटुंबात जगताना इतरही व्यक्ती संपर्कात येत असल्याने त्यांच्यासाठी काळजी, स्नेह, प्रेम, आपुलकी असणे गरजेचे आहेच.
त्यामुळे सामूहिकरित्या हे नियम तुम्हाला एकमेकांबद्दल आदर निर्माण होण्यास सहाय्यक ठरतील शिवाय नात्यांतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. नियम जरी कौटुंबिक असले तरी बदल जो करावयाचा आहे तो मात्र वैयक्तिक स्वरूपाचा आहे.
कुटुंब नियम – Family Rules
1 – स्वावलंबी बनणे (दैनंदिन कामे) –
कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वावलंबी असला पाहिजे. कुटुंबातील स्वावलंबत्व म्हणजे दैनंदिन जीवनातील सर्व कामे स्वतःची स्वतः पार पाडणे आणि तेही कोणाकडून मदतीची अपेक्षा न ठेवता!
स्वतःच्या कामात इतरांकडून अपेक्षा न ठेवणे हे ऐकुन थोडे नवल वाटेल परंतु तोच एक गुण आहे जो तुम्हाला स्वावलंबी बनवू शकेल आणि कुटुंबातील तुमचे स्थान हे मोलाचे ठरेल.
त्यानंतर आपण काळजी आणि प्रेमापोटी इतरांना मदत करू शकतो. अशा वागण्याने बहुतांशी कौटुंबिक कलह कमी होतात.
2 – सर्वांचा आदर करणे / प्रेम दर्शवणे –
लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत एकमेकांचा अनुभव आणि जगण्याची कला याबद्दल कमालीचा आदर आणि प्रेम असणे आवश्यक आहे.
आदर आणि प्रेम फक्त वरवरच्या बोलण्यातून नव्हे तर मनातून असले पाहिजे. लहान मुलांच्या खोड्या आणि मोठ्या लोकांच्या चुका या तितक्याच महत्त्वाच्या मानल्या गेल्या पाहिजेत. त्यावर उपाय आणि नियोजन असले पाहिजे त्यानुसार मग कृती घडली पाहिजे.
अशा वागण्यातून प्रेम आणि आदर सहज व्यक्त होतो आणि वाढतही जातो.
3 – वैयक्तिक स्वभावाची ओळख आणि कृती –
प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. त्यानुसार तो कृती करत असतो. परंतु स्वभाव हा वैयक्तिक बाब आहे, हे सर्व वडीलधाऱ्या व्यक्तींनी ओळखले पाहिजे. कारण स्वभावाचा परिणाम नकळत कुटुंबातील भावी पिढ्यांवर होतच असतो.
राग, द्वेष, घृणा, ईर्ष्या, वासना या गोष्टी वैयक्तिक असतात. त्याचा परिणाम कुटुंबातील इतरांवर होणे गरजेचे नाही. जर तसे झालेच तर कुटुंबात वितुष्टता निर्माण होते. याउलट आनंदी आणि समाधानी स्वभावाने मात्र सर्व लोक एकमेकांशी जोडले जातात.
स्वतःचा स्वभाव ओळखला की त्यानुसार कुटुंबातील आपली कृती आपणच ठरवू शकतो. कुटुंबाला घातक ठरेल अशी कृती कधीच आपण करणार नाही आणि किंबहुना आपल्या हातून तशी कृती घडणारही नाही.
जरी स्वभावात काही दोष असले तरी योग्य वेळी त्यामध्ये सुधारणा घडवत जाणे हेच आपल्या हातात असते आणि भविष्यात कुटुंबासाठी तेच फायदेशीर ठरते.
4 – काळजी घेणे / मदत करणे
कुटुंबातील सदस्य हे वेगवेगळ्या वयोगटातील असतात त्यामुळे प्रत्येकाच्या कुवतीनुसार आणि क्षमतेनुसार ते आयुष्य जाणून घेत असतात. त्यांचे चुकत असेल तर समजवून मदत करणे आणि समस्या असेल तर काळजी घेणे गरजेचे ठरते.
लहान मुले, तरुण पिढी व वृद्ध व्यक्ती यांचा एकत्र मिलाप असल्याने सर्वांस एकावेळी समजून घेणे अवघड ठरू शकते. त्यामुळे एकत्र असले तरी सर्वांची जबाबदारी ओळखून ज्यांना गरज आहे त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.
कुटुंबातील एका जरी व्यक्तीवर इतर व्यक्तींच्या प्रभावामुळे नकारात्मक परिणाम होत असेल तर ते कुटुंब स्वस्थ राहू शकत नाही. त्यामुळे व्यक्ती कोणत्या स्वभावाचा आहे ते जाणून घेऊन त्याला समजून घेऊन घेणे हे देखील प्रत्येकाचे कर्तव्यच आहे.
5 – आरोग्य आणि आनंद –
स्वस्थ आणि आनंदी राहणे हे प्रत्येकाच्या हातात आहे. रोजच्या आपल्या सवयीच आपले आरोग्य आणि आनंद ठरवत असतात. उत्तमोत्तम वैयक्तिक सवयी लावून घेणे आणि त्याचा पाठपुरावा करणे यासाठी सर्वच कुटुंबीय आग्रही असले पाहिजेत.
जसे रोजचा शारीरिक व्यायाम करणे, मानसिक शांतीसाठी ध्यान, योगा करणे या साध्या सोप्या सवयींमधून तुम्ही व्यक्तिमत्त्व विकास साधू शकता. त्यासाठी मोठ्या जबाबदार व्यक्तींनी तशा सवयी स्वतःला आणि भावी पिढीला लावणे आवश्यक आहे.
टेलिव्हिजन, मोबाईल्स यांचे घातक परिणाम सध्या व्यक्तीवर होत आहेत. सीरिअल्स, बातम्या आणि चित्रपटातून जे दाखवले जाते त्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होत असतो. त्यामुळे दिवसेंदिवस आपण निराश आणि हिंसक बनत जातो. ते कुटुंबासाठी थोडे सुद्धा हितावह नाही.
6 – वैयक्तिक स्वातंत्र्य –
स्वातंत्र्य हे नुसते सामाजिक असून चालत नाही तर कौटुंबिक स्तरावर देखील स्वातंत्र्य अनुभवता आले पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे आयुष्य चांगल्या सवयींनी घडवावे आणि स्वतंत्रता अनुभवावी.
सर्वप्रथम जाणून घ्या की स्वतंत्रता ही एक स्थिती आहे जी आपण अनुभवू शकतो. कुटुंबात वाढताना आणि जगताना व्यक्तीवर योग्य संस्कारांचा प्रभाव पडला की स्वतंत्रता ही सहज गोष्ट आहे.
वैयक्तिक समस्या दूर केल्यानंतर व्यक्तिगत स्तरावर आपण स्वातंत्र्य अनुभवू शकतो. त्यानंतर कुटुंबातील इतर व्यक्तींनाही आपण जगण्याची आणि मुक्तपणे वागण्याची स्वतंत्रता देऊ शकतो.
7 – कौटुंबिक आणि वैयक्तिक प्राधान्यता –
कौटुंबिक प्राधान्यता ठरवणे. ही प्राधान्यता घरातील वडीलधारी मंडळी ठरवू शकतात. प्रत्येकाचे आयुष्य कसे काय चांगले घडू शकते म्हणजेच वैयक्तिक विकास कसा काय होऊ शकतो आणि त्यासाठी कुटुंब व त्यातील व्यक्ती कशा काय सहाय्यक ठरू शकतात याचा विचार केला जातो.
त्यामध्ये पुढील बाबींचा विचार केला जाऊ शकतो आणि प्राधान्यक्रम ठरवू शकतो –
• कौटुंबिक स्तरावर भविष्यात कराव्या लागणाऱ्या कृतींची यादी करणे. त्यासाठी सर्व जाणत्या व्यक्तींनी प्रयत्नशील असणे.
• वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर विधायक सवयींचा पाठपुरावा करणे. घरात सुखी वातावरणासाठी काही मूलभूत नियम बनवणे. जसे की प्रार्थना असेल, हसतमुख राहणे, खरे बोलणे, व्यक्तींवर मालकी हक्क न गाजवणे, कला – छंद असेल, एकत्र फिरायला जाणे व सोबत वेळ व्यतित करणे असेल, अशा सवयींनी कुटुंबात वितुष्टता कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा पसरते.
वरील सर्व नियम हे मूलभूत मानवी मूल्ये आहेत ज्याद्वारे माणुसकी आणि समानता व्यक्त होते. ती सर्व मूल्ये वैयक्तिक स्तरावर अंगिकारली पाहिजेत तरच आपल्याला नात्यांचे आणि कुटुंबाचे महत्त्व समजू शकेल.