प्रस्तुत लेखात सेंद्रिय शेती संपूर्ण माहिती (Organic Farming Information in Marathi) देण्यात आलेली आहे. त्यामध्ये सेंद्रिय शेती कशी करावी, तिची वैशिष्ट्ये, सेंद्रिय खत प्रकार अशा विविध निगडित मुद्द्यांची आणि प्रश्नांची चर्चा करण्यात आलेली आहे.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतात पारंपारिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारची शेती केली जाते. शेतीला सहाय्यक असे कृषी तंत्रज्ञान देखील सध्या विकसित झालेले आहे. विविध अवजारे आणि शेती कामांच्या निगडित यंत्रे तयार करण्यात आलेली आहेत.
अशा सर्व तंत्रज्ञान विकासामुळे शेतीला आता आधुनिक महत्त्व प्राप्त झाले आहे. परंतु झालेल्या विकासात आपल्याला फायदे आणि तोटे पाहिले पाहिजेत ज्याद्वारे शेत जमिनीचा कस कमी होणार नाही.
भारतात सध्या कृषी विद्यापीठे उभारण्यात आलेली आहेत. शेतीचे योग्य व्यवस्थापन करून शेती उद्योग अगदी सोयीस्कर करण्यात आला आहे. खत – बियाणे निर्मिती आणि पोषक बियाणांचा दर्जा सुधारून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जात आहेत.
बियाणांना पोषक आणि योग्य अशी खत निर्मिती प्रकल्प देखील उभारले जात आहेत. खतनिर्मिती प्रक्रियेत रासायनिक आणि सेंद्रिय असे प्रकार उपलब्ध आहेत.
दोन्हीं पैकी शेतीसाठी योग्य खत कोणते? सध्या शेतकरी बांधव कोणत्या खतांना जास्त प्राधान्य देतात? तसेच भविष्यातील खत वापराचे निकष कसे असू शकतील? याचा सारासार विचार करून सेंद्रिय शेती सध्या कशी काय फायदेशीर ठरू शकते, याचे संपूर्ण विश्लेषण देखील करण्यात आलेले आहे.
Table of Contents
सेंद्रिय शेती संपूर्ण माहिती | Organic Farming Marathi Mahiti |
या संपूर्ण लेखात आपल्याला विविध प्रश्नांची चर्चा करावी लागेल ज्याद्वारे आपल्याला सेंद्रिय शेतीबद्दल सर्व माहिती मिळू शकेल.
सेंद्रिय शेती का करावी?
आजच्या लोकसंख्या वाढीमुळे मानवाला प्राथमिक गरजा भागवण्यासाठी निसर्गावर आक्रमण करावे लागले आहे. नैसर्गिक संपत्तीचा नाश करून सर्वत्र काँक्रिट आणि औद्योगीकरण करण्यात आलेले आहे.
त्यामुळे प्रामुख्याने प्रदूषण, जमिनीची धूप, जागतिक तापमानवाढ अशा भीषण समस्या जाणवू लागल्या आहेत. शेतीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे.
जमिनीचा कस व पोषणमूल्ये वृक्षतोडीमुळे कमी झालेली आहेत. झाडांची पाने आणि मुळे यांचे नैसर्गिकरित्या जमिनीला मिळणारे सानिध्य व पोषण वृक्षतोडीमुळे कमी झाले आहे.
मागील काही दशकांत शेतीतून भरपूर उत्पन्नासाठी रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. त्यामुळे उत्पन्न तर वाढले परंतु धान्याचे अन्नघटक कमी होऊ लागले. शेत पिकांची, भाज्यांची, फळांची चव बदलू लागली आहे.
अन्नातील अशा पोषणमूल्यांच्या कमतरतेमुळे मानवी आरोग्य देखील धोक्यात येऊ लागले आहे. शरीराची रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊ लागली आहे.
वरील सर्व परिणामांचा विचार करता सध्या पारंपारिक शेती व्यवस्थेकडे कल दाखवणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे योग्य सेंद्रिय खतांचा वापर करून शेती करणे हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे तरच आपण परंपरागत शेतीव्यवस्था आणि पर्यावरण टिकवू शकू.
सेंद्रीय शेतीची मुख्य वैशिष्ट्ये कोणती?
• मातीचे संवर्धन –
आपल्याला जगण्यासाठी मिळणारे अन्न हे जमिनीतून मिळत असते. त्यासाठी जमिनीची माती सुपीक असणे गरजेचे ठरते. भारतात पूर्वीपासून जमीन सुपीक आणि संवर्धित आहे कारण येथे पारंपारिक पद्धतीची शेती केली जात आहे.
जर आपण सेंद्रिय शेती करत असू तर मातीचे संवर्धन पूर्वी प्रमाणेच यापुढेही होत राहील आणि जमिनीतील सर्व अन्नद्रव्ये तशीच टिकून राहतील. त्यामुळे मातीचे संवर्धन हे सेंद्रिय शेतीचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येईल.
• नैसर्गिक अनुकूलता –
सेंद्रिय शेतीमुळे निसर्गात अनुकूलता निर्माण होते. जल आणि माती संवर्धन होते. नैसर्गिक समतोल टिकून राहतो. जैव विविधतेचा विनाश होत नाही. गुरे – जनावरे यांची संख्या वाढते. तसेच त्यांचे पोषण केल्याने आपल्याला जमिनीस खत देखील मिळते.
• पिकाची पोषकता –
रासायनिक शेतीने पिकाच्या वजनात फरक पडतो पण पोषणमूल्ये मात्र कमी होत जातात. अशा पद्धतीचे शेतीचे होणारे नुकसान सेंद्रिय शेतीने होत नाही. पिकांची पोषकता आणि जमिनीची गुणवत्ता टिकून राहते. त्यामुळे पोषक अन्न निर्मिती तर होतेच शिवाय मानवी आरोग्य टिकून राहण्यास मदत होते.
सेंद्रिय शेती कशी करावी? How to do an Organic Farming
• तापमानाचे व्यवस्थापन –
जमीन सतत नांगरणे टाळावे. जमीन हिरव्या गवताखाली असणे आवश्यक आहे. नैसर्गिक विपुलता जसे की झाडे, पाणी असणे गरजेचे आहे. असे केल्याने जमिनीचे तापमान व्यवस्थित राखले जाते. जमीन जास्त कसावी लागत नाही आणि उत्पन्न ही भरघोस मिळते.
• माती आणि जल संवर्धन –
मातीचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी तिचे संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यासाठी बांधावरून छोट्या उंचीची झाडे लावणे आणि जमीन वर्षातून ४ महिने तरी विनापीक ठेवणे गरजेचे आहे.
जलसंवर्धन म्हणजे पाऊसाचे पाणी साठवून ठेवणे, त्या पाण्याला जमिनीत मुरवणे आणि पाण्याचा उपयोग योग्यरीतीने करणे. त्यासाठी बांध-तलाव बांधणे. शेतालगत शेततळी निर्माण करणे आवश्यक ठरते.
• सेंद्रिय खतनिर्मिती आणि वापर –
सेंद्रिय खतनिर्मिती करून त्या खताचा योग्य वापर करणे आणि शेती उत्पन्न वाढवणे असे मुख्य उद्दिष्ट सेंद्रिय शेतीत असते. तसेच रासायनिक खतांचा वापर टाळणे, वर्षभर केवळ उत्पन्नासाठी शेती न करता जमिनीची सुपीकता वर्षानुवर्षे टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असणे, अशी धोरणे देखील सेंद्रिय शेतीत ठरवावी लागतात.
• जैव विविधता –
शेतात विविध स्वरूपाचे जीव – कीटक असणे गरजेचे असते. त्यांचा वावर मात्र अति होऊ न देणे. त्यासाठी शेताची व्यवस्थित निगराणी करणे. शेत परिसरात प्राणी, पक्षी, कीटक, अशी जैव विविधता असणे खूप आवश्यक आहे. तसेच गांडूळ पैदास वाढवणे देखील शेतीसाठी अनेकवेळा फायदेशीर ठरते.
• जनावरे एकत्रीकरण –
गुरे – पाळीव जनावरे यांचा शेतातील वावर फायदेशीर ठरतो. त्यांचे मलमुत्र जमिनीसाठी पोषक ठरत असते. तसेच ते शेतातील गवत आणि इतर पालापाचोळा चारा म्हणून ग्रहण करत असतात. त्यामुळे गवताची आणि इतर अनावश्यक कीटक जीवांची वाढ होत नाही.
सेंद्रिय खत म्हणजे काय? What is Organic Manure/Fertiliser
सेंद्रिय शेतीसाठी सेंद्रिय खत असणे अत्यावश्यक आहे. त्याची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे –
वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषापासून, मलमुत्रापासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात. प्रामुख्याने शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, हिरवळीची खते, माशांचे खत, खाटीक खान्याचे खत, इत्यादी खतांचा सेंद्रिय खतांमध्ये समावेश होतो.
सेंद्रिय खताचे प्रकार | Types Of Organic Manure/Fertiliser
१) शेणखत –
जनावरांचे शेण, मुत्र, चारा यांपासून तयार होणाऱ्या खताला शेणखत असे म्हणतात. शेणखत हे शेतीसाठी प्राचीन काळापासून वापरले जाते. अजूनही ग्रामीण भागात शेतीसाठी शेणखताचा वापर केला जातो.
शेणखतामुळे जमिनीचा पोत चांगलाच सुधारतो. जमीन सुपीक बनते. त्यामध्ये नत्र, स्फूरद व पालाश असते. बायोगॅस निर्मितीसाठी शेणखताचा वापर केला जातो.
२) कंपोस्ट खत –
शेतातील गवत, कापलेल्या पिकांचे अवशेष, भुसा, पाचट, झाडांचा पालापाचोळा अशा घटकांचे कुजवून म्हणजेच सूक्ष्मजंतूंनी विघटन करून जे खत तयार केले जाते त्याला कंपोस्ट खत असे म्हणतात. या खतामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश भरपूर प्रमाणात असते.
३) गांडूळ खत –
गांडूळ हे शेतकऱ्यांचे मित्र असतात कारण ते जमीन भुसभुशीत करतात. त्यांची विष्ठा आणि त्यांचा संचार हा जमिनीच्या आतच असल्याने जमिनीची पोषकमूल्ये वाढतात.
गांडूळ आणून आपण जर शेण, पालापाचोळा, जनावरांचे मलमुत्र यामध्ये टाकले तर गांडूळ खत तयार होत असते. त्यामध्ये गांडूळाची विष्ठा देखील मिसळत असते त्यामुळे अत्यंत उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत तयार होते.
४) हिरवळीची खते –
जमिनीत लवकर येणाऱ्या पिकांची दाट पेरणी केली जाते. पीक थोडे वर आल्यावर नांगराच्या साहाय्याने ते जमिनीत तसेच गाडले जाते. गाडलेली पिके कुजण्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी पुरेसा असतो. अशा प्रकारे तयार होणाऱ्या खतांना हिरवळीची खते असे म्हणतात.
प्रामुख्याने ताग, मूग, धैच्या, चवळी, शेवरी, बरसीम, गवार अशा प्रकारची पिके हिरवळीच्या खतासाठी वापरली जातात. त्यापासून जमिनीला भरपूर प्रमाणात नत्र मिळते.
५ – खाटीकखान्याचे खत –
खाटीकखान्यात जनावरांच्या अवशेषापासून जे खत बनवले जाते त्याला खाटीकखान्याचे खत म्हणतात. या खताचा वापर शेतीसाठी केला जातो. जनावरांच्या रक्तापासून आणि इतर अवशेषापासून तयार केलेल्या या खतात नत्र आणि स्फुरद भरपूर प्रमाणात असते. त्यापासून जमिनीचा पोत सुधारतो.
६ – माशाचे खत –
समुद्रकिनारी विविध प्रकारचे मासे जे मेल्यानंतर वाया जातात, किंवा कापल्यानंतर त्यांचे अवशेष शिल्लक राहतात त्यांचे जे खत बनवले जाते त्याला माशाचे खत असे म्हणतात. या खतामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाण विपुल असते.
रासायनिक खते आणि सेंद्रिय खते यामधील फरक –
रासायनिक खते कमी वेळात जास्त उत्पन्न मिळवून देतात खरी पण जमिनीचा पोत आणि कस हळूहळू कमी होऊ लागतो.
बियाणांची वाढ योग्यरित्या कशी होऊ शकेल यासाठी रासायनिक आणि सेंद्रिय खत चाचणी केली जाते. यामध्ये रासायनिक खतांची योग्यता सरस ठरते पण सेंद्रिय खतांनी जमीन वर्षानुवर्षे कसदार बनून राहते.
सेंद्रिय खतांचा वापर करून उगवल्या जाणाऱ्या पिकांची पोषकता तुलनेने जास्त असते. सेंद्रिय खतांमुळे मातीची सुपीकता टिकवली जाते आणि जमिनीचे संवर्धन होते.
संपूर्ण लेख वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला सेंद्रिय शेती संपूर्ण माहिती (Organic Farming Information in Marathi) हा लेख कसा वाटला, त्याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा…