वय कोणतेही असो स्वतःची काळजी स्वतः घ्यायला शिकणे अनिवार्य आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत सेवा भाव हा गुण खूप महत्त्वपूर्ण मानला गेला आहे. स्वतः सेवा करणे आणि त्याचे परिणाम म्हणून समाधानी आयुष्य जगणे ही संकल्पना पूर्वी असायची.
सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञान अति विकसित होत असल्याने मानव आळशी आणि परावलंबी बनत चालला आहे. सेवा करणे हा भाव तर सोडाच पण तो स्वतःची देखील काळजी घेणे विसरला आहे. मानवाला अशा काही सवयी आणि व्यसने जडलेली आहेत ज्यामुळे स्वतःचे होणारे नुकसान देखील त्याला समजत नाहीये.
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत आसपास खूप सारे लोक असायचे जे एकमेकांची काळजी घेऊ शकतील. सध्या एकत्र कुटुंब पद्धती लयास चालली आहे. बहुसंख्य लोकं एकलकोंडी बनत चालली आहेत. त्यामुळे होणारे नुकसान व फायदे हे ज्याचे त्यालाच पाहावे लागत आहेत.
अशा समाज रचनेत आपण इतरांकडून सेवेची आणि मदतीची अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्यामुळे जसजसे आपण मोठे होत जाऊ तसतसे स्वावलंबी बनणे अत्यावश्यक आहे. शारिरीक व मानसिक आरोग्य याबाबत सजग असणे ही काळाची गरज बनली आहे.
सुरुवातीला पालकांनी आपल्या मुलावर स्वावलंबी बनण्याचे संस्कार करणे गरजेचे आहे. त्यानंतर तीच मुले आयुष्यभर स्वतःची काळजी स्वतः घेण्यास सक्षम असतील. स्वावलंबी बनण्याचे संस्कार जर झाले नसतील तरी ते हळूहळू आपण व्यक्तिमत्त्वात रुजवू शकतो.
स्वतःची कामे स्वतः करणे आणि स्वतःची दैनंदिन पातळीवर काळजी घेणे याची सुरुवात आजपासून केल्यास भविष्यात बहुतांश नुकसान आणि इतरांकडून असलेली अपेक्षा आपण टाळू शकू.
काळजी घेणे म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी प्रयत्नशील असणे, स्वतःच्या गरजा आणि अपेक्षा ओळखून जीवन व्यवस्थित आणि आनंदी व्यतित करणे. प्रत्येक व्यक्ती अशा जबाबदारीने भारावून गेल्यास तो नक्कीच स्वतःच्या कुटुंबासाठी आणि दुसऱ्या व्यक्तींसाठी प्रेरणा ठरू शकेल.