आजचा नववा आयपीएल सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांत डि. वाय. पाटील स्टेडियम, मुंबई येथे दुपारी ३:३० वाजता खेळवला जाणार आहे.
मुंबई आणि राजस्थान हे दोन्ही संघ अत्यंत तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांतील फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण ही तिन्ही बाजू जमेच्या आहेत. मुंबईने आपला पहिला सामना गमावला असला तरी त्यांचा संघ कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याची क्षमता ठेवून आहे.
राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी यावेळी अत्यंत मजबूत दिसत आहे. बोल्ट, चहल आणि आश्विन हे खेळाडू संघात आल्याने विरोधी संघातील फलंदाजीचा धावा जमवताना चांगलाच कस लागणार आहे. अशातच राजस्थानने आपला पहिला सामना जिंकलेला असल्याने त्यांचे मनोबल चांगलेच उंचावलेले आहे.
रोहित विरूध्द संजू –
रोहित शर्माने आत्तापर्यंत आपले नेतृत्व कणखर असल्याचे वेळोवेळी दाखवून दिलेले आहे. त्यामुळेच तर मुंबई हा आयपीएल मधील सर्वात जास्त सातत्यपूर्ण आणि यशस्वी संघ आहे. परंतु यावर्षी अत्यंत अनुभवी पांड्या बंधू, बोल्ट, डिकॉक यांसारख्या खेळाडूंची साथ सुटल्याने बदली खेळाडूंचा जम कसा काय बसतो हे पहावे लागेल.
यावर्षी राजस्थानची गोलंदाजी मजबूत असल्याने संजू सॅमसनला कर्णधारपदी जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत. तसेच राजस्थानच्या फलंदाजीची कमान बटलर, संजू सॅमसन, जयस्वाल यांच्या खांद्यावर असणार आहे.
मुंबईची पलटण विरूध्द राजस्थानचे रॉयल्स –
मुंबईतून बुमराह, रोहित, ईशान किशन, पोलार्ड हे मॅच विनर खेळाडू आहेत तर राजस्थान बटलर, संजू सॅमसन, चहल आणि बोल्ट यांच्यावर अवलंबून आहे. दोन्ही संघ अत्यंत मजबूत असल्याने संजू सॅमसनच्या नेतृत्वाची कसोटीच आज लागणार आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. गूगल एक्सपर्टच्या मते ५६% मुंबई तर ४४% राजस्थानचे जिंकण्याचे चान्सेस आहेत.