स्वातंत्र्यदिन २०२२ – मराठी भाषण | Independence Day Speech In Marathi |

प्रस्तुत लेख हा स्वातंत्र्यदिन (Swatantrya Din Bhashan Marathi) या विषयावर आधारित मराठी भाषण आहे. स्वातंत्र्यदिनी विद्यार्थी, शिक्षक व इतर सरकारी कर्मचारी अशा सर्वांना भाषण करावे लागते. सर्वांना सहज लक्षात राहतील आणि लगेच पाठ होतील अशा अप्रतिम भाषणांचा समावेश आम्ही या लेखात केलेला आहे.

स्वातंत्र्यदिन मराठी भाषण क्र. १ | Swatantrya Din Bhashan Marathi |

प्रस्तावना –

सुप्रभात! येथे जमलेल्या मान्यवर लोकांचे मी सर्वप्रथम आभार मानतो कारण त्यांच्या कर्तुत्वाची उंची अफाट असल्याने भारत भूमीच्या विकासात त्यांचा नक्कीच हातभार लागत असतो. तसेच इतर सहकारी वर्ग, विद्यार्थी वर्ग, शिक्षक वर्ग व येथील स्थानिक लोक अशा सर्वांना मी नमस्कार करून भाषणाची सुरुवात करतो.

भाषण – Independence Day Speech In Marathi

आपल्यासाठी स्वातंत्र्यदिन हा एक प्रकारचा फक्त जल्लोष नसून स्वातंत्र्यासाठी अर्पण केलेल्या प्रयत्नांची आणि प्राणांची आठवण करून देणारा दिवस आहे. भारतभूमीच्या संरक्षणासाठी ज्यांनी स्वतःचे प्राण वेचलेले आहेत अशा महान लोकांची स्मृती जागृत करून आपण हा दिवस प्रत्येक वर्षी साजरा करत असतो.

आज १५ ऑगस्ट! आजपासून ठीक ७५ वर्षांपूर्वी जे महत्कार्य घडले त्या दिनाची आठवण आणि स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची जाण सर्वांना व्हावी म्हणून आपण सर्वजण एकत्र जमलेले आहोत.

इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केल्याने आपली सामाजिक दृष्टी आणि एकता पूर्णपणे खालावलेली होती. आपल्या सामाजिक नीती मूल्यांना आणि अखंड चालत आलेल्या संस्कृतीला खिंडार पाडले गेले होते. त्यावेळी भारताच्या स्वातंत्र्यासाठी काही असे लोक उभे राहिले ज्यांनी ब्रिटिश सत्तेचा कडाडून विरोध केला.

भारतीय जनतेत स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करण्याचे काम महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लाला लजपतराय, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, भगतसिंह, चंद्रशेखर आझाद अशा अनेक महान लोकांनी केले. आजच्या या शुभ प्रसंगी त्या सर्व महान लोकांना मी अभिवादन करतो. तसेच इतरही सर्व व्यक्तींना मानवंदना देतो ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण केले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील आपल्या देशामध्ये शांतता नांदावी याकरिता सीमेवर आपले नौजवान सैनिक तैनात असतात. देशाच्या सुरक्षेसाठी आपले प्राण धोक्यात घालून ते देशसेवा करत असतात. नौदल व वायुदल अशा सुरक्षा क्षेत्रांत देखील आपले वीर जवान समाविष्ट असतात. त्यांचा आदर्श युवा पिढीने नक्कीच ठेवावा.

सुरक्षा क्षेत्राव्यतिरिक्त भारतात राजकारण, व्यवसाय, शिक्षण, विज्ञान – तंत्रज्ञान अशा क्षेत्रांत काम करणारे लोक हे देखील भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे काम करत असतात. एका अर्थी देशाला प्रगती पथावर नेण्याचे काम हे सर्व लोक करत असतात.

अशा लोकांच्या कर्तुत्वाला नवीन उंची भविष्यात मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! त्याशिवाय भारताचा कणा असलेल्या कृषी व अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांचे कार्य देखील निदर्शनास आणून दिले गेले पाहिजे.

भारताचा आर्थिक पाया खऱ्या अर्थाने मजबूत करण्याचे काम कृषी क्षेत्र करत असते. तर अध्यात्मिक अधिष्ठान साधण्याचे कौशल्य आणि तशी परंपरा आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून आहे.

स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी आज प्रत्येकाच्या सामाजिक व वैयक्तिक स्वातंत्र्याच्या सीमा विस्तारल्या गेलेल्या आहेत. आज आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली भारतीय प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वी ठरत आहोत. अनेक यशस्वी उद्योजक, क्रीडापटू, सामाजिक संस्था या भारत देशाचे नाव उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत.

कोणताही देश हा तेथील नागरिकांच्या उदात्त ध्येय आणि कर्मांनी विकसित होत असतो. विकसित भविष्याची कल्पना मनात घेऊन आपणही आपल्या जीवनात देशाला एका अत्युच्च उंचीवर नेण्याचे कार्य पार पाडू शकतो. तरी आजच्या स्वातंत्र्यदिनी जे कार्यक्रम पार पडले आणि जे पार पडणार आहेत त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा! एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो…जय हिंद… जय महाराष्ट्र!

तुम्हाला स्वातंत्र्य दिन – मराठी भाषण (Swatantrya Din Bhashan Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment