Shivaji Maharaj Information In Marathi Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sat, 02 Oct 2021 13:14:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Shivaji Maharaj Information In Marathi Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 छत्रपती शिवाजी महाराज माहिती । Shivaji Maharaj Information in Marathi https://dailymarathinews.com/shivaji-maharaj-information-in-marathi/ https://dailymarathinews.com/shivaji-maharaj-information-in-marathi/#comments Fri, 12 Jun 2020 10:45:32 +0000 https://dailymarathinews.com/?p=1698 श्री. छत्रपती शिवाजी महाराज ( chhatrapati Shivaji Maharaj ) हे युगपुरूष होते. त्यांनी स्वतःचे संपूर्ण जीवन हे स्वराज्य निर्मितीसाठी वाहून घेतले. त्यांचा आणि महाराष्ट्राचा संपूर्ण ...

Read moreछत्रपती शिवाजी महाराज माहिती । Shivaji Maharaj Information in Marathi

The post छत्रपती शिवाजी महाराज माहिती । Shivaji Maharaj Information in Marathi appeared first on Daily Marathi News.

]]>
श्री. छत्रपती शिवाजी महाराज ( chhatrapati Shivaji Maharaj ) हे युगपुरूष होते. त्यांनी स्वतःचे संपूर्ण जीवन हे स्वराज्य निर्मितीसाठी वाहून घेतले. त्यांचा आणि महाराष्ट्राचा संपूर्ण इतिहास पाहता आपल्याला कळून येते की स्वराज्य हे शून्यातून निर्माण केलेले राज्य होते. या संपूर्ण लेखात छ. शिवाजी महाराज कसे घडले, त्यांचे पराक्रम आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग वर्णिलेले आहेत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण इतिहास आणि माहिती (Shivaji Maharaj Information In Marathi) देण्यात आलेली आहे.

शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र ( History Of Maharashtra Before King Shivaji )

पूर्वी भारतातील संस्कृती ही विविधतेने सजलेली होती. प्रत्येक समाजात आणि प्रदेशात थोड्या फार फरकाने सांस्कृतिक आणि पारंपारिक फरक होता. त्यातील मुख्य फरक म्हणजे बोलीभाषेचा फरक! महाराष्ट्र हे राज्य नावारूपाला आलेले नसताना मराठी भाषिक ज्या प्रदेशात होते तेथे विविध कलाप्रकार आणि अध्यात्मिक बांधिलकी मात्र होती. त्यावरून हिंसाचार हा कधीच महाराष्ट्राची आणि भारताची संस्कृती राहिलेली नाही. 

आध्यात्माचे एक पौराणिक अधिष्ठान महाराष्ट्रात स्थित होते. त्यावरून कळून येते की चार वर्णव्यवस्था ज्या संपूर्ण भारतात लागू होत्या त्या मराठी प्रदेशातही लागू झाल्या होत्या. या सर्व पारंपारिक प्रथा आणि विभागलेला समाजच परकीय आक्रमणाला कारणीभूत होता. अफगाणी सुलतान, बादशाह, पोर्तुगिज आणि इंग्रज हे या भूभागावर आक्रमण करतच आले होते. त्यांची पाळेमुळे वाढत जाण्याचे कारण म्हणजे त्यांनी भारतीयांना दाखवलेली महत्वाकांक्षेची स्वप्ने होती.

वेगवेगळ्या भागांत सांस्कृतिक आणि पारिभाषिक फरक असल्यामुळे हे सर्व परकीय पूर्ण देशावरच सत्ता स्थापन करू शकले. महाराष्ट्रात किंवा पर्यायाने भारतात अगोदर राजे असायचे. त्यांचे हुकुमी नियम आणि प्रजादक्ष कारभार हा कुठल्याही राज्यासाठी हितावह होताच परंतु परकीय आक्रमणाची खबरदारी न घेतल्याने सर्व राज्ये मुघल आक्रमणाने ग्रसित होत गेली. उत्तरेत मुघल राज्य करीत होते तर फक्त महाराष्ट्राचा इतिहास लक्षात घेता अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोन सुलतानांच्या अधिपत्याखाली पूर्ण महाराष्ट्र विभागलेला दिसून येत होता.

दोन्ही सुलतान एकमेकांविरुद्ध लढत होते. त्यांना या मराठी प्रदेशात कुठलाच तिसऱ्या सत्तेचा विरोध नव्हता. याउलट सर्व मराठी सरदार मात्र तुटपुंज्या वेतनात वतनदारी मिळवायचे आणि गडकिल्ल्यांचे संरक्षण करायचे. स्वराज्य असा काही प्रकारच नव्हता. त्यामुळे सामान्य रयतेवर झालेले अन्याय हे आपल्याच लोकांकडून करवून घेतले जायचे आणि हे सम्राट मात्र खुशाल राज्य करायचे. 

उत्सव साजरे करणे, पूजा करणे यांना बंदी येत होती. मंदिरे लुटली जात होती. वतनदारी आणि जहागिरी मिळवण्यातच मराठी घराणी व्यस्त होती. पूर्वीपासूनच राजेशाही ही पाहिली नसल्याने आणि एकजुटता नसल्याने प्रत्येक विभागात एक वेगळाच सरदार असायचा तो देखील कधी निजामशाहकडे तर कधी आदिलशाहकडे कार्यरत असायचा. त्यामुळे आक्रमण आणि प्रतिक्रमण होतच असायचे. सामान्य जनता एकदम त्रासून गेली होती. 

शेतकी आधार असल्याने उदरनिर्वाह तर व्हायचा परंतु त्यातदेखील कर आणि पिकवणीवर हे वतनदार हक्क दाखवायचे. अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला असल्याने रयत त्यामध्ये गुंग होऊन जायची परंतु अन्याय वाढत होता तेव्हा अन्यायाला लगेच प्रतिकार होत नव्हता आणि तेवढी वेळ मारून नेली जात होती. त्यापूर्वी आणि त्याकाळात देखील संतांची आणि साधूंची परंपरा महाराष्ट्रात होती त्यामुळे जगण्याचा एक उदात्त आधार ही संतमंडळी होती. 

• मराठा सरदार शहाजीराजे भोसले! ( Sardar Shahaji Raje Bhosale )

शहाजी राजे भोसले

आदिलशाह आणि निजामशाह अशा दोन सत्ता महाराष्ट्रात केंद्रित असल्या तरी काही मराठे सरदार रयतेची काळजी करत असत. त्यापैकीच एक शहाजीराजे मालोजीराजे भोसले हे होते.

• छ. शिवाजी महाराजांचा पूर्वपिढी इतिहास ( History of Bhosale Gharana )

वेरूळच्या भोसले घराण्याचे बाबाजीराव हे गावचे पाटील होते. त्यांना विठोजीराजे आणि मालोजीराजे अशी दोन मुले होती. दोन्ही मुले शुर होती. त्यांच्याकडे मोठी मराठ्यांची फौज होती. हत्यार बळ देखील होते. हे दोन्ही बंधू पराक्रमी असल्याने त्यांची प्रसिद्धी चारी दिशेला पसरली होती. 

त्याकाळी दौलताबाद ही निजामशाहची राजधानी होती. तेथे मलिक अंबर नावाचा एक वजीर होता. तो देखील शुर आणि कर्तबगार होता. वेरूळ हे ठिकाण दौलताबादपासून जवळच होते. भोसले बंधूंचे पराक्रम मलिक अंबर जाणून होता.

वारंवार निजामशाहीवर होणारे उत्तरेकडील मुघल आक्रमण थोपवण्यासाठी या दोघांची मदत होऊ शकते हे मलिक अंबर जाणून होता. त्याने निजामशाहला याबद्दल माहिती दिली आणि त्या दोघांबद्दल शिफारसही केली. निजामशाहने मग या भोसले सरदारांना पुणे आणि सुपे परगण्यांच्या जहागिरी दिल्या. 

फलटणच्या निंबाळकर घराण्यातील उमाबाई या मालोजीराजे यांच्या पत्नी होत. या दाम्पत्याला शहाजी आणि शरीफजी अशी दोन मुले होती. ज्यावेळी इंदापूरच्या लढाईत मालोजीराजे मारले गेले त्यावेळी शहाजीराजे पाच वर्षाचे होते. त्यानंतर त्यांचे बंधू विठोजी राजे यांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला. 

दिवस छान चालले होते. शहाजी आणि शरीफजी दोघे पराक्रमी बनत चालले होते. शस्त्र चालवण्यात तरबेज झाले होते. विठोजी राजे यांनी निजामशाहीतील आणखी एक शूर मराठा सरदार लखुजीराव जाधव यांच्या मुलीसाठी शहाजीराजे यांचे स्थळ सांगितले. लखुजीराव हे खूप मोठा फौजफाटा बाळगून होते. निजामशाहच्या दरबारी त्यांचा खूप मोठा मान होता. 

लखुजीराव जाधव यांची मुलगी म्हणजे जिजाबाई. जिजाबाई या हुशार आणि सुलक्षणी होत्या. विठोजी राजे आणि लखुजीराव हे दोघे शूरवीर होतेच शिवाय मराठा सरदार एकवटले जावेत या उद्देशाने शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह करवून देण्यात आला. हा विवाह खूप उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला. जिजाबाई आता भोसले घराण्याची सून झाली होती. 

शहाजीराजे पराक्रमी होतेच. त्याची ख्याती निजामशाह ओळखून होता. मालोजीराजे यांची जहागिरी काही काळानंतर शहाजीराजे यांच्यावर सोपवण्यात आली. मुघल सम्राट निजामशाही जिंकण्याच्या बेतात होता. त्याने विजापूरचा आदिलशाह याला मदतीचा हात मागितला. मग दोघांच्या करारावरून त्यांनी निजामशाहीवर आक्रमण केले. शहाजीराजे, शरीफजी आणि वजीर मलिक अंबर हे निकराने लढले. त्यांनी या दोन्ही फौजांचा पराभव केला. ही लढाई अहमदनगरजवळ भातवडी येथे झाली. या लढाईत शरीफजी ठार मारले गेले.

या लढाईनंतर शहाजीराजे यांचा मान आणि प्रतिष्ठा वाढली. खुद्द निजामशाह त्यांच्यावर खूप खुश होता. आता मलिक अंबर मात्र त्यांच्यावर जळू लागला होता. त्या दोघात वितुष्ट निर्माण झाले. पुढे निजामशाहीत पुन्हा वाद नको म्हणून शहाजीराजे निजामशाहीतून बाहेर पडले. त्यांची पुढे खरी पदोन्नती आदिलशाहीत झाली. आदिलशाहने त्यांना सरलष्कर ही पदवी बहाल केली. 

आता इकडे निजामशाहीचा उतरता काळ सर्वजण पाहत होते. वजीर अंबर मलिक मृत्यू पावला होता. त्याचा मुलगा फत्तेखान हा मोठा कारस्थानी होता. अंबर मलिक नंतर तो निजामशाहीत वजीर बनला. त्याचा कारभार पाहता मुघलांचे पुन्हा एकदा आक्रमण होईल अशी भीती निर्माण झाली. खुद्द निजामशाहच्या आईने शहाजीराजांना पुन्हा निजामशाहीत कार्यरत होण्यासाठी सांगितले. वजीर अंबर मलिकचा मृत्यू झाला असल्याने शहाजीराजांच्या नकाराचे काही कारण नव्हते. आता शहाजीराजे पुन्हा निजामशाहीत सेवेसाठी रुजू झाले. 

छ. शिवाजी महाराज जन्म आणि बालपण | Shivaji Maharaj Birth and Childhood | 

शिवरायांचा जन्म

आदिलशाही सोडल्यामुळे शहाजीराजांवर संकट ओढवले होते. आदिलशाहने पुणे या त्यांच्या जहागिरीच्या गावी आक्रमण केले होते. अशातच मुघल बादशाह शाहजहान याने भले मोठे सैन्य दक्षिण भाग जिंकण्यासाठी पाठवले होते. शहाजीराजांची धावपळ वाढली होती. त्यांच्या पत्नी जिजाबाई या काळात गरोदर होत्या. जिजाऊंचे हाल करून चालणार नव्हते. त्यांना कुठे तरी सुरक्षित ठेवणे अपेक्षित होते. 

भक्कम उंच कडे आणि तटबंदी असलेला जुन्नर जवळील शिवनेरी किल्ला शहाजीराजांना सर्वात सुरक्षित वाटला. त्यांनी जिजाबाईंना शिवनेरी किल्ल्यावर ठेवले आणि त्यांनी मुघल सत्तेविरुद्ध लढाईस निघून गेले. विजयराज हा त्यावेळी किल्ल्याचा किल्लेदार होता. त्याने जिजाबाईंच्या सुरक्षेची जबाबदारी उचलली.

दिवसामागून दिवस सरत होते. अखेर फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ रोजी शिवनेरीवर तेजाचा कुंभ जन्मला. ती तारीख होती १९ फेब्रुवारी १६३०. सर्व किल्ल्यावर आणि परिसरात आनंदाची रेलचेल सुरू झाली. सनई चौघडे वाजू लागले. जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला होता. शिवनेरी किल्ल्यावर झालेला जन्म आणि शिवाई देवीच्या नावावरून या पुत्राचे नाव “शिवाजी” असे ठेवण्यात आले. 

शिवरायांच्या बालपणाची सर्व वर्षे संस्कारीत झालेली होती. माता जिजाऊंचा सहवास कधी सुटला नाही. रामायण, महाभारत तसेच भारतीय इतिहास जिजाऊ शिवाजींना सांगत असत. त्या मोकळ्या वेळेत अर्जुन, भीम, अभिमन्यू, राम, लक्ष्मण या शूरवीरांच्या कथा शिवाजींना सांगत असत. काहीतरी पराक्रम करून दाखवण्याची ऊर्मी आणि तडप बाळ शिवाजींना वाटू लागली होती. याबरोबरच जिजाऊ त्यांना साधूसंतांच्या गोष्टीदेखील सांगत असत. त्यामुळे पराक्रम आणि प्रजादक्षता असे गुण लहानपणीच शिवाजींच्या अंगी बाणवले गेले. 

मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळत असत. रानात फिरणे, लपंडाव, पक्ष्यांचे आवाज काढणे, मातीचे प्राणी आणि किल्ले बनवणे अशा प्रकारचे खेळ सर्वजण मिळून खेळत असत. 

शहाजीराजे आणि नवीन निजामशाही | Shahaji Raje and New Nijam Empire |

शहाजीराजे निजामशाहीत परतले होते. त्यांची सेवा आणि जबाबदारी वाढली होती. परंतु निजामशाहीचा दरबार म्हणजे कुरघोडी करण्यात तरबेज होता. हेवेदावे आणि कटकारस्थाने करण्यात सर्वजण पटाईत होते. याच काळात मराठी सरदारांची आपापसात लढाई होत होती. शहाजीराजांचे सासरे लखुजी जाधव यांचा मृत्यू याच काळात झाला. त्यांच्या मृत्यूची कारणे आणि आपसातील वैर शहाजीराजांना स्वस्थ बसून देत नव्हते. 

शहाजीराजे आता मुघल सत्तेत रुजू झाले. सरदारकी आणि जहागिरी आता सुरक्षित असणार होती. याचदरम्यान निजामशाहीत वजीर असणारा फत्तेखान हा भलताच दगाबाज निघाला. त्याने मुघलांची सहाय्यता घेऊन निजामशाहचा अंत केला. आता सर्व निजामशाही मुघलांच्या सत्तेत जाणार हे स्पष्ट होते. शहाजीराजांच्या जहागिरीत असणारा आणि मुघलांच्या सत्तेत नसणारा असा काही प्रदेश परस्पर फत्ते खानने मुघलांना देऊ केला. 

शहाजीराजे मुघल, निजामशाही आणि आदिलशाही या तिन्ही सत्तांना कंटाळले होते. स्वतःचे सामर्थ्य पूर्ण पणाला लावत त्यांनी पुन्हा एक नवीन निजामशाही स्थापण्याचा निर्णय घेतला. निजामाच्या वंशातील एका मुलाचा नवीन निजामशाह म्हणून जयघोष केला. जुन्नरजवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला नवीन निजामशाह बनवले.

एक नवे राज्य शहाजीराजांनी उदयास आणले होते. नीरा आणि गोदावरी नदी यामधील सर्व प्रदेश या नवीन निजामशाहीत येत होता. आदिलशाहने प्रथम त्यांना या कामात साथ दिली परंतु खुद्द मुघल सम्राट शहाजहान दक्षिणेत चालून आला आणि त्याने आदिलशाहला दम दिला. या आक्रमणाला विरोध करून चालणार नव्हते. आदिलशहाने शहाजीराजांविरोधात मुघलसत्तेशी मैत्रीपूर्ण तह केला.

शहाजीराजे आता या दोन्ही सत्तांशी गनिमीकाव्याने लढू लागले. मुघल आणि आदिलशाही सत्ता खूप विस्तारलेली होती. शहाजीराजांचा प्रतिकार अपुरा पडत होता. शेवटी त्यांना मुघलांशी तह करावा लागला. नवीन राज्य उदयास आणण्याचे त्यांचे स्वप्न काही साकार झाले नाही. परंतु मराठी सरदार आणि रयतेस मात्र एक नवीन आत्मविश्वास मिळाला होता की आपणही राज्य निर्माण करू शकतो. 

आदिलशाह आणि मुघल यांनी मिळून नवीन निजामशाहीचा भाग वाटून घेतला. शहाजी राजांची पूर्वीची जहागिरी पुणे-सुपे आदिलशाहने परस्पर शहाजीराजांना देऊ केली. आता त्यांना विविध मोहिमांवर जावे लागे. पुणे ते दूर कर्नाटकपर्यंतचा भूभाग जिंकण्याचा आदिलशाहीचा मनसुबा होता. या  कामी त्यांनी शहाजीराजांची निवड केली. शहाजीराजे या मोहिमेत फत्ते प्राप्त करत गेले. बाळ शिवाजी आणि जिजाऊ त्यांच्यासोबतच असत. आपल्या वडिलांचे पराक्रम बाल शिवाजीच्या कानी पडत होते. आदिलशाहने खुश होऊन शहाजीराजांना बंगळूरची जहागीरी बहाल केली. बंगळूरमध्ये बाळ शिवाजी आणि जिजाऊ आनंदाने राहू लागले होते. 

आत्तापर्यंत शहाजीराजांबरोबर जिजाऊ आणि शिवाजी राजे होते. परंतु आता कर्नाटकातील पुढची राज्ये जिंकण्यासाठी त्यांना सोबत नेता येणार नव्हते. स्वतःची जहागीर पुणे-सुपे सांभाळण्यासाठी त्यांनी जिजाऊंची आणि बाळ शिवाजीची मोठे सैन्यबळ, हत्ती, घोडे, खजिना आणि ध्वज देऊन रवानगी केली.

. शिवरायांचे शिक्षण | Shivaji Maharaj Education 

शिवराय जेव्हा जेव्हा शहाजीराजांच्या सोबत होते. शहाजीराजे त्यांना वाचन, युद्धकला, घोडेबाजी शिकवत असत. ते स्वतः मोहीमांवर असताना त्यांनी शिक्षकांची नेमणूक केली होती. एकदम अल्पकाळात शिवराय लिहायला आणि वाचायला शिकले.

काही जवळचे सरदार आणि शिक्षक त्यांना घोड्यावर बसणे, दांडपट्टा आणि तलवार चालवणे, अशा कला शिकवत असत. शहाजीराजांचे पराक्रम नेहमी शिवरायांना ऐकायला मिळत. रामायण, महाभारतातील साहसी कथांबरोबर वडिलांचे पराक्रम ऐकताना देखील त्यांना स्फुरण चढत असे. 

शहाजीराजांनी पुण्याला पाठवणी केल्यानंतर जिजाबाईंनी शिवरायांचा सांभाळ केला. मुघल सत्ता आणि काही छुप्या शत्रूंच्या आक्रमणाने पुणे बेजार झाले होते. पुणे-सुपे ही शहाजीराजांची जहागिरी होती आणि त्याचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे हे जिजाऊंनी ओळखले होते. 

जिजाबाई, शिवराय आणि सोबतीचे काही विश्वासू सरदार असे सर्वजण पुण्यात राहू लागले. पुण्यात लोकांना खूप मोठा आधार मिळाला होता. लोक आता तिथे शेती करू लागले होते. मंदिरे पुनर्स्थापित केली जाऊ लागली होती. पडकी घरे पुन्हा उभारली गेली होती. हे सर्व शिवराय जवळून पाहत होते. 

जिजाऊंचा कणखर बाणा शिवराय अंगिकारत होते. युद्धकलेचा सराव एका बाजूने चालूच होता. तसेच प्रजाहित आणि राज्यकारभारही शिकत होते. शत्रूशी करावे लागणारे युद्ध आणि त्याची नीती यामध्ये शिवराय पारंगत होत होते. गनिमी कावा कसा करायचा, घोडे व हत्ती यांची पारख कशी करायची असे काही गुणदेखील शिवरायांनी हेरले होते. 

• दादोजी कोंडदेव आणि इतर कार्यकारी मंडळी | Dadoji Kond Dev Information |

दादोजी कोंडदेव शहाजीराजे नसताना पुण्याची जहागिरी संभाळण्यामध्ये महत्वाची कामगिरी बजावत होते. त्यांचा जिजाऊंना अनेक राजकीय आणि सामाजिक निर्णय घेण्यात मोलाचा हातभार लागला. राजकीय समीकरण, राजकारण आणि प्रजाहित कारभार कसा करायचा याचे उत्तम मार्गदर्शन दादोजी कोंडदेव शिवरायांना करत असत.

पुणे जहागिरीत आता शिवराय हळूहळू कारभार पाहू लागले होते. शहाजीराजांनी अनेक मातब्बर मंडळी या जहागिरीत रुजू केली होती. बंगळूरहून पाठवताना सरनौबत माणकोजी, रघुनाथ बल्लाळ सबनीस, बाळकृष्ण हणमंते, सामराज नीलकंठ पेशवे या अधिकाऱ्यांना शहाजीराजांनी पुण्याच्या कारभारात सहाय्य करण्यासाठी सांगितले होते. 

या सर्व अधिकाऱ्यांचा पुण्याच्या विकासात खूप मोलाचा वाटा आहे. शिवराय लहानपणीच न्यायनिवाडा करू लागले होते. शहाजीराजांना आता खरा वारसदार लाभला होता. स्वराज्याचे स्वप्न रुजू लागले होते. एक प्रकारे मराठी साम्राज्याचा सूर्योदय होत होता. संकटसमयी कोण कसा वागतो त्यावर त्याचे चरित्र घडत असते अशी मूलभूत शिकवण जिजाऊंची होती. राज्याचे आणि रयतेचे हित यातच राजाचे हित असते यावर जिजाऊंचा विशेष जोर होता, त्यानुसार शिवराय घडत होते. 

छ. शिवरायांचे लग्न | Shivaji Maharaj Marriage | Shivaji Raje’s Wife Saibai |

त्या काळी लहानपणी लग्न करण्याची प्रथा होती. अशातच शिवरायांना वधु शोधण्यास प्रारंभ करण्यात आला. भोसले घराण्याची शालीनता आणि कुळ सांभाळणारी मुलगी हवी असा माता जिजाऊंचा आग्रह होता. फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील सईबाई ही जिजाऊंच्या पसंतीस उतरली. हा विवाह मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडला. 

छ. शिवाजी महाराजांची स्वराज्य प्रतिज्ञा । Swarajya Pratidya |

शिवराय आणि काही मावळे रायरेश्वराच्या मंदिरात जमले होते. शिवराय तेव्हा १५ वर्षांचे कुमार होते. १६४५ चे ते वर्ष होते. त्या दिवशी काय घडणार होते? याची मागमूस मावळ्यांना नव्हती. भगवान शंकराला कोणते मागणे मागणार होते? 
शिवराय त्यांचे बोलणे स्पष्ट करतात,”वडील शहाजीराजे हे विजापूरचे सरदार आहेत. इथली जहागिरी आणि सरदारकी भविष्यात आमच्या हाती असणार आहे. परंतु मला काही यात स्वारस्य नाही. मी जे स्वप्न पाहतो आहे ते कदाचित तुम्हाला आश्चर्यचकित करेल परंतु आपल्या लोकांसाठी आणि आपल्या राज्यासाठी ते हितकर असेच आहे.”

शिवराय पुढे बोलणे चालू ठेवतात, “सुलतान आणि परकीय सत्ता आपल्यावर राज्य करीत आहे याची जाणीव आम्हाला आहे. जहागिरी जरी असली तरी पूर्ण राज्य हे स्वराज्य असले पाहिजे. एकच राजा, एकच न्याय असला पाहिजे. परकियांच्या सत्तेत अनेक जुलूम होत राहतात. त्यांना इथल्या संस्कृतीची जाणीव नाही. कुटुंब आणि गाव यांचा नायनाट करत या सत्ता आपल्यावर राज्य करीत असतात.”

एवढे बोलून ते थांबत नाहीत. पुढे शिवराय म्हणतात, “आदिलशाह आणि निजामशाह यांनी आपले राज्य वाटून घेतले आहे. त्यावर जोर म्हणून मुघल आक्रमण देखील होत असते. आता ही गुलामगिरी शक्य नाही. वतनदार, सरदार यांनी एकत्र आले पाहिजे. दिलेल्या तुकड्यांवर किती दिवस जगायचे?”

असे शिवराय बोलत असताना सर्व मावळे त्यांच्याकडे उमेदीच्या नजरेने पाहू लागले होते. मावळे नव्हते ते, जणू राजदरबारात एखादा राजा आज्ञा करत आहे असेच सर्वांना वाटू लागले होते. “बोला राजे, काय करायचं?” असं म्हणत मावळे शिवरायांकडे पाहू लागले.

राजे हा शब्द प्रथमच शिवरायांना एक ऊर्जा देऊन गेला, स्फुरण देऊन गेला. मावळ्यांनो, या रायरेश्वराच्या मंदिरात या शंकराला साक्षी ठेऊन शपथ घेऊया. एक दिवस स्वराज्य स्थापन होईल, आपण सर्वजण मिळून ते करू! “हे हिंदवी राज्य स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा!” असा ललकार करीत हर हर महादेवचा जयघोष मंदिरात घुमला.

लाल महालात परत येताच घडलेला प्रसंग शिवरायांनी जिजाऊंना बोलून दाखवला. सुवर्ण काळाची प्रतिक्षा आता संपणार, असा विश्वास जिजाऊंना वाटला. जिजाऊ आज धन्य झाली होती. स्वराज्य स्थापनेचा विडा माझ्या शिवबाने उचलला. हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल, असे मनोमन म्हणत जिजाऊंनी शिवरायांना आशिर्वाद दिला.

• मावळे हेच स्वराज्याचे सैनिक :-

प्रथमतः सुरुवात म्हणून त्यांनी सर्व मावळ्यांना जमवायला सुरुवात केली. होतकरू तरुण शस्त्रविद्या घेऊ लागले. तलवार, दांडपट्टा चालवणे, घोडे फिरवणे असे चक्र सुरू झाले. आसपासचा सर्व परिसर पिंजून काढला. दरीखोरी, आडमार्ग, चोरवाटा शोधून काढल्या. आसपासचे किल्ले तसेच शत्रुची सत्ता, हत्यारे दारूगोळा यांवर त्यांची करडी नजर होती. 
मावळ प्रदेशात असणारे सर्व वतनदार शिवरायांनी एकत्र आणले. आपापसातील भांडणे मिटवली. स्वराज्याचे स्वप्न सर्व जनतेत जागृत केले. मावळ प्रदेशातील बाजी पासलकर, झुंजारराव मरळ, हैबतराव, विठोजी शितोळे, जेधे, पायगुडे, बांदल इत्यादी देशमुख वतनदार मंडळी एकवटली. 

तोरणा गड आक्रमण – स्वराज्याचे तोरण ! Shivaji Maharaj won Torana fort | 

महाराष्ट्रात मुघल, आदिलशाही, निजामशाही आणि सिद्दी अशा चार सत्ता केंद्रित होत्या. चार सत्तांना तोंड देणे अवघड होते. शिवराय स्वराज्याची शपथ घेतात खरी पण ती निभावणे म्हणजे मोठे जिकिरीचे काम होते. थोडेसे मावळे आणि काही विश्वासू जवळचे लोक यांसोबत शिवराय स्वराज्य बांधणीची सुरुवात कशी काय करणार होते?

 शिवरायांकडे असलेल्या जहागिरीत पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूर येत असे. या जहागिरीत असलेले किल्ले आपल्या सत्तेत असले पाहिजेत त्याशिवाय स्वराज्य शक्य नाही, असे शिवरायांना मनोमन वाटत होते. ज्याच्या ताब्यात किल्ला तोच आसपासच्या प्रदेशावर राज्य करीत असे. 

एखादा भक्कम किल्ला ताब्यात घेतला पाहिजे अशी गरज शिवरायांना वाटू लागली. एखादा डोंगरी किल्ला घेतला की त्यावरून सुरुवातीला तरी राज्य करता येईल असा निश्चय करत पुण्याच्या नैऋत्येस कानद खोऱ्यात असलेला तोरणा हा किल्ला काबीज करण्याचे शिवराय ठरवतात. 

माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर सपाट झालेल्या भूभागाची तटबंदी. या किल्ल्यावर दोन भक्कम माच्या होत्या. एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची. किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी झुंजार माचीवरून एकच वाट आहे. ती वाट खूपच अवघड आहे. किल्ल्यावर तोरणजाई देवीचे मंदिर आहे. म्हणून या किल्ल्याला तोरणा असे नाव पडले. 

असा हा भक्कम किल्ला आदिलशाहच्या ताब्यात होता. पूर्णपणे दुर्गम किल्ला असल्याने पुरेसे पहारेकरी या किल्ल्यावर नव्हते तसेच पुरेसा दारुगोळा देखील नव्हता. याची संपूर्ण माहिती शिवरायांना मिळालेली होती. त्यांनी तोरणा जिंकून घेण्याचा निर्धार करीत स्वराज्याचे तोरण बांधण्याचा निर्णय घेतला. 

निवडक मावळ्यांना सोबत घेऊन शिवराय तोरणगडाकडे वाटचाल सुरू करतात. कानद खोऱ्यातून आक्रमणाची योजना बनवून किल्ल्यावर चढून जातात. मावळ्यांनी किल्ल्यावर वेगवेगळे टप्पे काबीज करीत घोडदौड चालू ठेवली. यावेळी येसाजी कंक, तानाजी मालुसरे असे वीर मावळे शिवरायांना साथ देत होते. तोरणागड जास्त परिश्रम न करता शिवराय स्वराज्यात जोडतात. त्याला नंतर प्रचंडगड असे नाव दिले जाते. 

किल्ला मोडक्या तोडक्या अवस्थेत होता. परंतु यावरूनच पुढचा कारभार करणे शक्य होणार होते. शिवरायांनी आपल्या विश्वासातील ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस या अधिकाऱ्यांच्या नेमणुका किल्ल्यावर केल्या. शिबंदीत मावळे, कोळी, महार, रामोशी अशा अनेक जातीतील शूर माणसे नेमली. 

किल्ल्याची डागडुजी सुरू झाली. काम सुरू असतानाच चार घागरी मोहरांनी गच्च भरलेल्या सापडल्या. स्वराज्याचे धन समजून त्या धनाने हत्यारे, दारूगोळा जमा केला. तोरणा गडापासून जवळच पंधरा किलोमीटर लांब मुरुंबदेवाचा डोंगर होता. तेथे एक किल्ला आदिलशाहने अर्धवट बांधून सोडला होता. त्या किल्ल्यावर पहारा देखील जास्त नव्हता. त्याची डागडुजी करून स्वराज्याची राजधानी तो किल्ला बनवायचा असा मानस शिवरायांचा होता.

संधी साधून एके दिवशी तो किल्ला शिवरायांनी ताब्यात घेतला. तोरणा गडावर सापडलेले धन त्या गडाच्या डागडुजीसाठी वापरण्यात आले. त्या किल्ल्याला नाव देण्यात आले “राजगड”. काम जोरात सुरू झाले. राजवाडा, बारा महाल, अठरा कारखाने आणि राजगादी तयार झाली. अत्यंत परिश्रमाने सजवलेला हा किल्ला स्वराज्याची पहिली राजधानी ठरला. 

शिवरायांनी त्यानंतर मावळ प्रांतातील जवळजवळ सर्व किल्ले ताब्यात घेतले. त्या प्रांतातील देशमुख, पाटील सर्वजण मुजऱ्यासाठी येऊ लागले. शिवरायांची प्रसिद्धी त्या प्रांतात वाढली असतानाच काही लोकांनी आदिलशाही ठाणेदाराकडे तक्रारी केल्या. शिवरायांविरुद्धची सर्व हकीकत आदिलशाहच्या कानी पडली. 

आदिलशाहने प्रथम शहाजीराजांना बोलावून जाब विचारला. जहागिरी व्यवस्थित सांभाळण्यासाठी किल्ले ताब्यात असणे आवश्यक आहे त्यामुळे शिवबाने किल्ला घेतला असेल, असा आशय शहाजीराजांनी दिला. शिवरायांना या बाबतीत विचारले असता ते म्हणाले, ” ही सर्व कामगिरी आम्ही आदिलशाहीच्या विकासासाठी करतो आहोत. इथल्या जहागिरीची जबाबदारी आमच्या खांद्यावर असताना कारभार पाहण्यासाठी किल्ले ताब्यात हवेत. आदिलशाहीचे हित बघूनच आम्ही हा निर्णय घेतला.” 

कोंढाणा आणि पुरंदर हे दोन किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. शिवराय आपली घोडदौड चालू ठेवतात आणि हे दोन किल्लेसुद्धा ताब्यात घेतात. त्यानंतर रोहिडा किल्ला जिंकतात. आसपासचे सर्व किल्ले ताब्यात घेत स्वराज्याची सत्ता वाढवण्याचे काम शिवराय चालू ठेवतात. 

स्वराज्याचे चलन : राजमुद्रा | Rajmudra meaning in Marathi |

छत्रपती शिवाजी महाराज पुणे हा प्रांत स्वतः चालवू लागल्यानंतर स्वराज्याची राजमुद्रा असली पाहिजे असे त्यांना वाटू लागले यानंतर त्यांनी राजमुद्रा अस्तित्वात आणली ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती.

त्याच्यावरील लिखित भाष्य सर्वांना ज्ञात आहे. “प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे.” असा अर्थ असणारे राजमुद्रेवरील संस्कृत सुभाषित खालीलप्रमाणे,

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।

• स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त!

शिवरायांना अनेक वेळा स्वकीय आणि स्वतःच्या आप्तेष्टांच्या त्रासाला सामोरे जावे लागे. स्वराज्याचे स्वप्न सर्वांना माहीत असताना काहीजण फितूर होतेच. खंडोजी आणि बाजी घोरपडे हे दोन सरदार आदिलशाहीत सरदार म्हणून कार्यरत होते.

शिवरायांना लगाम घालण्यासाठी आदिलशाहने काही चाली खेळल्या. त्यापैकीच ही एक चाल होती. कोंढाणा परिसरात त्यांनी जनतेला सैरावैरा करून सोडले. शिवरायांनी त्यांचा बंदोबस्त करत हकलवून लावले. शिवरायांचे मेहुणे फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर यांच्या विरोधातही सक्तीची पाऊले शिवरायांना उचलावी लागली. 

शिवरायांचा आणखी एक नातलग संभाजी मोहिते. त्याने सुपे परगण्यात शिवरायांविरूध्द मोहिमा राबवल्या. शिवरायांना हे कळताच त्यांनी संभाजीची पाठवणी कर्नाटक प्रांतात केली. जावळीचे यशवंतराव मोरे उर्फ चंद्रराव हेदेखील शिवरायांच्याविरुद्ध बंड करण्यात यशस्वी झाले. 

शिवरायांना ते राजे मानत नसत. दौलतराव मोरे हे जावळीचे जहागीरदार होते. त्यांच्या मृत्युनंतर त्यांचे जे जे वारसदार होते त्यांमध्ये वाटण्या सुरू झाल्या. परंतु शिवरायांनी यशवंतराव यांना मदत केली आणि खंडणी देण्याचा करार केला. यशवंतराव गादीवर बसल्यानंतर मात्र करार विसरले. आदिलशाहचा हात आपल्यावर आहे, शिवराय आपल्याला काही करू शकत नाहीत, असा त्याचा समज होता. 

आदिलशाहने त्यांना चंद्रराव ही उपाधी दिली होती. त्यामुळे त्यांना चंद्रराव मोरे म्हणून ओळखले जात असे. त्याची स्वारी जावळी प्रांत सोडून होत होती. बाकीच्या मुलुखांवर तो चालून जात होता. शिवरायांना त्याचा बंदोबस्त करण्याची गरज भासू लागली. त्याच्यापासून स्वराज्याला धोका आहे, हे शिवरायांनी हेरले होते. 

शिवरायांनी अगोदर समज म्हणून एक पत्र धाडले. त्याचे उत्तर म्हणून चंद्रराव मोरे यांनी शिवरायांनाच दरडावले. शिवरायांनी आणखी एक पत्र पाठवले त्यामध्ये बंडखोरी केली तर मारले जाल असे ठणकावून सांगितले. तरीही तो काही ऐकला नाही. त्याने बंड सुरूच ठेवले. अखेर शिवरायांनी जावळीवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. 

जावळीवर आक्रमण होताच चंद्रराव बिथरला पण त्याने जावळी प्रांतात निकराने विरोध केला. जवळजवळ एक महिना तो शिवरायांविरूध्द लढला. त्याचे खूप सैन्य मारले गेले. अखेर तो मजबूत अशा रायरी किल्ल्यावर लपून बसला. रायरी किल्ला खूप अवघड आणि घनदाट जंगलात वसलेला होता. त्यावर आक्रमण म्हणून अगोदर शिवरायांनी त्या गडाला वेढा दिला. 

चंद्रराव काही हार मानायला तयार नव्हता. त्याने तब्बल तीन महिने किल्ला लढवत जिकिरीचे सामर्थ्य दाखवले पण अखेर त्याला माघार घ्यावी लागली. रायरीचा किल्ला ताब्यात आल्यानंतर त्याचे “रायगड” असे नामकरण करण्यात आले. जावळीसारखा भला मोठा प्रांत जिंकणे म्हणजे स्वराज्याचे वाढते स्वरूप होते. त्यानंतर काही काळात भोरप्या डोंगरावर आणखी एक किल्ला बांधण्यात आला. त्याचे नाव “प्रतापगड” असे ठेवण्यात आले. 

शिवरायांचा प्रतापगडावरील पराक्रम | अफजलखानाचा वध ! शिवप्रताप दिन (Shiv Pratap Din)

विजापूरला शिवरायांच्या हालचाली कळू लागल्या होत्या. गडकिल्ले जिंकत शिवराय स्वतः कारभार पाहू लागल्याची जाणीव विजापुरी दरबारात झाली होती. आदिलशाहीतील सर्व सरदार, बहादुर सेनानी, वजीर सर्वजण उपस्थित होते. शिवाजीला थांबवले पाहिजे, असा एकच प्रश्न सर्वांसमोर होता. 

बडी बेगम ( साहेबीन ) जातीने त्यावेळी दरबारात उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “कोण करणार शिवाजीचा बंदोबस्त?” सर्वजण एकमेकांकडे बघू लागले. शिवाजी महाराजांची ख्याती सर्वदूर पसरू लागल्याने सह्याद्रीच्या कुशीत जाऊन शिवाजीचा बंदोबस्त करणे हे खूपच जिकिरीचे काम होते.

शेवटी अफजलखान नावाचा धिप्पाड सरदार पुढे आला. शिवाजीला जिवंत किंवा ठार मारून घेऊन येण्याचे वचन भर दरबारात अफजलखान देतो. सर्वांना त्याचा विश्वास बसतो कारण अफजलखानाची ताकद म्हणजे पोलादी! लोहाची हत्यारे आपल्या हातांनी वाकवणारा असा हा अफजलखान शिवरायांना पकडण्यासाठी स्वराज्यावर चालून येतो. 

यापूर्वी अफजलखान वाईचा सुभेदार असल्याने त्याला सह्याद्री हा प्रांत बऱ्यापैकी माहिती होता त्यामुळे महाराष्ट्र काही त्याला नवीन नव्हता. शिवराय राजगडावर असताना त्यांना ही बातमी कळली. खानाचा मुकाबला भर युद्धात आपण करू शकत नाही याची जाणीव शिवरायांना होती. शिवरायांचे सैन्य आणि राज्य लहान होते. त्याचा निभाव खानाच्या फौजेपुढे लागणे शक्य नव्हते. 

अफजलखानाशी मुकाबला हा युक्तीने होऊ शकतो अशी चर्चा शिवराय राजमाता जिजाऊंशी करतात आणि प्रतापगडावर रवाना होतात. शिवराय प्रतापगडावर गेल्यावर खान चांगलाच चिडला. त्याला भलेमोठे सैन्य प्रतापगडावर नेणे शक्य नव्हते. प्रतापगड डोंगरात वसला असल्याने तिथे पोहचणे म्हणजे चांगलेच अडचणीत आणणारे काम होते.

जंगली प्राणी आणि घनदाट वनराई असल्याने सैन्य फाटा प्रतापगडावर जाऊच शकणार नव्हता. शिवाजी महाराज स्वतः उतरून खाली यावे यासाठी खानाने रयतेचा छळ करण्यास सुरुवात केली. देवस्थाने उध्वस्त करण्यास सुरुवात केली. असे केल्याने शिवराय खाली येतील असा खानाचा समज खोटा ठरला. मोठा संयम दाखवत शिवाजी महाराजांची ही चाल यशस्वी ठरली. खानाने मग शिवरायांना भेटण्यासाठी संदेश पाठवला.

“आमचे किल्ले परत द्या आणि आदिलशाहीत सामील व्हा आम्ही तुम्हाला सरदारकी देऊ इच्छितो.” असा संदेश शिवरायांना कळताच ते आणखीनच सावध झाले. मोठ्या बुद्धीने परतीचा संदेश म्हणून शिवराय खानास घाबरतात आणि खानाने खुद्द शिवाजींना भेटण्यासाठी प्रतापगडावर यावे असे सांगितले. 

अफजलखान मोठमोठ्याने हसू लागला, “हा शिवाजी तर डरपोक निघाला. आम्ही त्याच्या पराक्रमाच्या ऐकलेल्या कथा खोट्या होत्या, आम्हीच जातो त्याला भेटायला आणि चिरडून टाकतो,” असे म्हणत खान “प्रतापगडावर भेटू!” असा संदेश पाठवतो. प्रतापगड येथील खालची माची येथे भेटण्याचा बेत ठरला. 

भेटीच्या वेळी दोघांचेही एक एक अंगरक्षक सोबत असतील आणि बाकीचे अंगरक्षक शामियान्याच्या बाहेर असतील असे ठरले. छान असा शामियाना उभारण्यात आला. भेटीची वेळ ठरवण्यात आली. आपल्याबरोबर काही दगा झाला तर किल्ल्यावरील बाकीचे सैन्य आक्रमण करेल आणि अफजल खान देखील माघारी जाता कामा नये, याची पुरेपूर व्यवस्था शिवाजी महाराज करतात.

भेटीचा दिवस उजाडला. शिवराय भवानी देवीचे दर्शन घेतात. अंगात चिलखत, डोक्यावर जिरेटोप आणि पट्टा, वाघनखे आणि बिचवा अशी शस्त्रे शिवराय परिधान करत त्यावरून आपला पोशाख चढवतात. सर्व सरदार आणि सेवकांना सूचना देत शिवराय भेटीसाठी तयार झाले. शामियान्यात जिवाजी महाला याला शिवराय सोबत नेण्याचा बेत करतात. अफजलखान बडा सय्यद नामक आपल्या सेवकासोबत बसलेला असतो. 

शिवराय शामियान्याच्या दाराशी येऊन थांबतात. “शिवाजी आत का येत नाही?” असे अफजलखान महाराजांचा वकील पंताजी गोपीनाथ यांना विचारतात. “शिवाजी राजे बडा सय्यदला घाबरतात”, असे उत्तर मिळताच बडा सय्यद थोडा दूर झाला. “या राजे, भेटा आम्हाला.” असे म्हणत अफजलखान उभा राहतो. 

अफजलखान शिवरायांना आलिंगन देण्याच्या उद्देशाने पुढे सरकतो. शिवराय त्याचे आलिंगन स्वीकारतात. शिवराय अफजलखानापुढे खूपच लहान होते. त्यांना मिठीत घेऊन चिरडून टाकावे असा मनसुबा खानाचा होता. शिवराय मिठीत येताच त्यांच्या पाठीवर कट्यारीचा वार केला. अंगात चिलखत असल्याने शिवराय बचावले. प्रसंगावधान राखून शिवरायांनी वाघनख्या आणि बिचवा काढून अफजलखानाचा पोटळा बाहेर काढला. 

खानाचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे सरसावताच एका पट्ट्याच्या वारातच शिवराय त्यांना ठार करतात. सय्यद आता वार करणार एवढ्यात जिवाजी महालाने त्याला ठार केले. संभाजी कावजी, जिवाजी महाला आणि शिवराय हे तिघे या संघर्षात सहभागी होते. या घटनेनंतर “होता जिवा म्हणून वाचला शिवा” ही म्हण प्रचलित झाली. 

शिवरायांनी केलेली विजयी सूचना सगळे मावळे ऐकतात आणि खानाच्या फौजेवर तुटून पडतात. अफजलखानाचा मुलगा फाजलखान या चकमकीत निसटतो आणि विजापूरला पोहचतो. विजापूरच्या दरबारात एवढ्या बलाढ्य सरदाराचा मृत्यू संपूर्णपणे हाहाकार उडवून देतो. शिवरायांच्या पराक्रमाची गाथा आता सर्वदूर पसरू लागली होती.  

पावनखिंड आणि बाजी प्रभूंचा पराक्रम | Baji Prabhu Deshpande | Pavan khind Battle |

अफजलखानाच्या वधानंतर आदिलशाही पुरती हादरली होती. आदिलशाहाच्या ताब्यातील पन्हाळागड जिंकल्यावर तर आदिलशाह भयंकर चिडला. शिवरायांचा बिमोड करण्यासाठी सिद्दी जौहर आणि अफजलखानाचा मुलगा फाजलखान हे दोघे भले मोठे सैन्य घेऊन स्वराज्यावर चाल करून आले. 

सिद्दी जौहर शिस्तप्रिय सरदार होता. त्याने जास्त गाजावाजा न करता पन्हाळगडाला वेढा दिला. शिवरायांना कोंडीत पकडले. हा वेढा उठता उठेना. पावसाळा सुरू झाला तरी वेढा काही उठण्याचे नाव घेईना. शक्तीचा उपयोग कामी येणार नव्हता. सिद्दीने यावेळी खूपच संयम दाखवला होता. 

“लवकरच किल्ला माघारी देतो” असा निरोप शिवरायांनी सिद्दीला धाडला. शिवाजी शरण येतो आहे असे समजताच त्याचे सैन्य थोडे ढिले पडले. अनेक दिवसांचा वेढा आता सैल होऊ लागला होता. आता शिवरायांनी युक्ती लढवली. गडावरून निसटण्यासाठी दोन पालख्या तयार करण्यात आल्या. एका पालखीतून शिवराय स्वतः अवघड मार्गाने बाहेर पडणार, त्याअगोदर एक पालखी राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार ज्यामध्ये शिवरायांसारखा वेष धारण केलेला व्यक्ती बसलेला असणार. 

शिवा काशिद हा तरुण हुबेहूब शिवरायांसारखा दिसत असे. केशभूषा करणारा हा सेवक हे धाडसी कृत्य करण्यास तयार झाला. रात्रीच्या वेळेस राजदिंडी दरवाजातून एक पालखी बाहेर पडली. पहारेकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी ती पालखी पकडून “शिवाजी महाराज सापडले” असा गाजावाजा केला. सिद्दी जौहरकडे ही पालखी नेण्यात आली. तेव्हा दुसऱ्या मार्गाने शिवराय आणि निवडक बांदल-देशमुख सैन्य आणि सोबत बाजीप्रभू देशपांडे निसटण्यात यशस्वी झाले. 

सिद्दी जौहर हुशार होता. त्याने शिवा काशीदला लगेच नकली असल्याचे ओळखले. शिवा काशिद ठार मारला गेला. त्याचे बलिदान अजरामर ठरले. शिवराय निसटले असे समजताच सिद्दी पेटून उठला. त्याच्या सैन्याने शिवरायांचा पाठलाग सुरू केला. शिवराय संकटात सापडले. सिद्दीचे भले मोठे सैन्य मागावर होते. 

घोडखिंडीत शिवराय बाजी प्रभुंशी सल्ला मसलत करतात, तेव्हा बाजीप्रभू शिवरायांना विशाळगड गाठण्यासाठी विनंती करतात. घोडखिंड अडवून निकराने लढा देऊ असे वचन बाजीप्रभू शिवरायांना देतात. गडावर पोहचल्यावर शिवराय तोफांचे आवाज करण्याचे सूचित करतात आणि तोफांचा आवाज येताच ताबडतोब खिंड सोडून तुम्ही विशाळ गडावर निघून या! असे शिवराय सांगतात आणि पुढची वाटचाल सुरू ठेवतात.

खिंडीतील वाट बिकट होती. शत्रू सैन्य एकदम चालून येणे शक्य नव्हते. खिंडीच्या तोंडावर बाजीप्रभू आपले सैन्य उभे करतात आणि स्वतः समशेर घेऊन लढण्यासाठी सज्ज होतात. शत्रू खिंड चढू लागला होता. मावळे शत्रूंवर तुटून पडतात. “हर हर महादेव” अशा गर्जनेत पहिल्या तुकडीला तर दगड गोट्यांनी मावळे ठेचून काढतात. 

सिद्दी मसूद (मसउद) हा सेनापती आता चिडला होता. त्याने कशाचीही पर्वा न करता बाजीप्रभूंना प्रथम घेरले. इतर मावळे प्रतिकार करतच होते. बाजींना एवढ्या जणांचा प्रतिकार पुरेसा ठरत नव्हता. शत्रूंना प्रत्येक घावानिशी धारातीर्थी पाडणारे बाजीप्रभू अतुल्य शौर्य गाजवत होते. अंगावर घणाघाती वार सहन करत बाजींचे लक्ष मात्र तोफांच्या आवाजाकडे होते. 

तोफांचा आवाज झाला. बाजीप्रभू आता सुखावले. “महाराज गडावर पोहचले, आता मी सुखाने मरू शकतो.” असे शब्द बाजीप्रभूंचे शेवटचे शब्द ठरले. स्वामीभक्त बाजीप्रभू यांनी शर्थीने खिंड लढवली. त्यांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. म्हणून घोडखिंडीला नाव देण्यात आले पावनखिंड!

शायिस्ते खान आणि छ.शिवाजी महाराज चकमक | Shayista Khan and Shivaji Maharaj Encounter |

आदिलशाही आता पुरती नरमली होती. शिवरायांचे स्वतंत्र राज्य मान्य करीत आदिलशाह दक्षिण विभाग सांभाळून होता. आता शिवराय मुघलांकडे वळले. महाराष्ट्रातील कित्येक प्रांत हे मुघलांच्या आक्रमणाने त्रस्त होते. शिवरायसुद्धा मग अनेकवेळा मुघल प्रांत जिंकून घेत असत. मुघल बादशाह औरंगजेब आता चिडला आणि त्याने आपला मामा शायिस्तेखान याला स्वराज्यावर आक्रमण करण्यास सांगून त्याची भल्यामोठ्या सैन्यानिशी पाठवणी केली.

प्रथम पुरंदरचा वेढा हा शायिस्तेखानाची चाल होती. परंतु मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे खानाचे सैन्य त्रस्त झाले होते. पुरंदरला घातलेला वेढा अखेर उठवला गेला. मग शायिस्ते खान पुण्याकडे वळला. त्याने चाकणचा किल्ला घेतला नंतर पुण्याच्या लाल महालात त्याने तळ ठोकला. तेथील जनतेला त्रास द्यायला सुरुवात केली.

शायिस्ते खानाची खोड मोडायची असे शिवराय ठरवतात. लाल महाल हा लहानपणापासून शिवरायांना परिचित होता. त्यापद्धतीने मग नियोजित आक्रमण करण्याचा बेत शिवराय ठरवतात. मध्यरात्री लाल महालात शिरून खानाला पकडायचे असा मनसुबा शिवरायांचा होता. महालात शिरणे हे खूप अवघड काम होते. हजारोंचे सैन्य अवतीभोवती पसरले होते तसेच महालात देखील कडक सुरक्षा होती. 

आक्रमणाची तयारी झाली. ५ एप्रिल १६६३ रोजी रात्री शिवराय आपल्या निवडक साथीदारांसोबत लाल महालाच्या दिशेने चालून जातात. स्वतःचाच वाडा असल्याने शिवरायांना त्यातील सर्व जागा माहीत होत्या. एका भिंतीला भगदाड पाडून शिवराय आणि साथीदार आत शिरतात. सुरक्षा सेवकांवर मात करीत शिवराय खानाला शोधत पुढे सरसावत होते. एका खोलीत शायिस्ते खान झोपला होता. 

कोणीतरी आलंय याची जाणीव शायिस्ते खानाला झाली. जाग येताच शिवराय समोर दिसतात. आपला मृत्यू समोर दिसताच, आहे त्या स्थितीत भर वेगाने शायिस्ते खान इकडे तिकडे पळत सुटतो. खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न खान करतो आणि त्याची बोटे शिवराय कापतात. त्याच्यावर झालेला तलवारीचा वार तो त्याच्या बोटांवर निभावून जातो. 
“शिवाजी आला, शिवाजी आला” असे म्हणत सर्वजण पळत सुटतात. त्यात स्वतः शिवराय देखील सामील असतात.

शिवराय त्यानंतर सिंहगडाकडे निघून जातात. शायिस्ते खानाला मारण्याचा प्रयत्न तर फसतो. परंतु शिवरायांचा धाक मात्र मुघल सत्ता चांगलीच अनुभवत असते. औरंगजेबाला ही बातमी कळल्यावर तो चांगलाच बिथरतो. या घटनेनंतर शायिस्ते खानाची रवानगी बंगालला केली जाते. 

पुरंदरचा तह । Purandarcha Tah

मुघल साम्राज्याचा त्रास महाराष्ट्रात वाढत चालला होता. त्याला लगाम घालण्यासाठी शिवरायांनी सुरत लुटायची ठरवले. सुरत ही त्यावेळची खूप मोठी व्यापार पेठ होती. सुरतेच्या खजिन्यावर छापा मारला गेला. औरंगजेब भयंकर चिडला. मराठ्यांचे राज्य आणि शिवराय यांचा हिशोब लावलाच पाहिजे असा निर्णय औरंगजेब बादशहाने घेतला. 

मुघल बलाढ्य सरदार मिर्झाराजे जयसिंग यांना स्वराज्यावर चालून पाठवले. त्यांच्याबरोबर दिलेरखान या सरदाराला धाडले. जयसिंग आणि दिलेरखान आता प्रचंड दारूगोळा आणि फौज घेऊन दक्षिणेकडे वाटचाल करू लागले. शिवराय सुरतेच्या मोहिमे वरून परतताच त्यांना शहाजीराजे निधन पावले अशी बातमी समजते. ते वर्ष म्हणजे १६६४ चे होते. या घटनेचे जिजाऊ, शिवराय आणि स्वराज्यातील प्रत्येक शिलेदाराला प्रचंड दुःख झाले. 

पुरंदरला वेढा आणि मुरारबाजींचा पराक्रम Murarbaji Parakram ।

पुरंदर हा भला मोठा गड! मजबूत आणि तेवढाच प्रचंड! हा किल्ला आपल्या हाती आलाच पाहिजे या हेतूने दिलेरखान या किल्ल्याला वेढा देतो. त्याची फौज मोठी होती. त्यावेळी पुरंदरचा किल्लेदार होता मुरारबाजी देशपांडे! मुरारबाजी हा मोठा शूर होता. त्याच्या हाताखालचे मावळे हे देखील पराक्रमी होते. 

दिलेरखानाच्या तोफा आसमंतात गरजू लागल्या. तोफांचे गोळे किल्ल्यावर धडकू लागले. माचीचा बुरुज ढासळला. मुघल किल्ल्यावर चढाई करतच होते. दिलेरखान हा स्वतःच्या छावणीत बसून हे सर्व दृश्य पाहत होता. मराठे आता वरच्या बालेकिल्ल्याचा आधार घेऊन लढत होते. स्वतः आक्रमण केल्याशिवाय पर्याय नाही असा विचार करून मुरारबाजी पेटून उठला. 

“हर हर महादेव” या एकाच गर्जनेने सर्व मावळ्यांना सोबत घेऊन मुरारबाजी बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडत मुघल फौजेवर तुटून पडतो. तुंबळ युद्ध सुरू होते. या भयंकर लढाईत मराठे मुघल फौजेचा धुव्वा अडवते. सर्व मुघल सेना दिलेरखानाच्या छावणीच्या दिशेने पळत सुटले. मुरारबाजी आता काही माघार घेणार नव्हता. तो देखील छावणीमध्ये घुसला. 

छावणीत एकच जल्लोष आणि ललकार गाजला. दिलेरखान हत्तीच्या अंबारित जाऊन बसला. मुरारबाजीची तलवार तळपत होती. सापडेल त्याला कापत होती. मुघल सैन्य थोड्याशा मावळ्यांपुढे हतबल झाले होते. मुरारबाजी आता दिलेरखानाच्या दिशेने जाऊ लागला, तोच दिलेरखानाने त्याला मुघलांची चाकरी देऊ केली पण ती चाकरी मुरारबाजी नाकारत आक्रमण सुरूच ठेवतो. 

दिलेरखान हत्तीच्या अंबारित बसला असल्याने त्याला बाण चालवणे सोप्पे गेले. त्याचा एक बाण मुरारबाजींचा प्राण हेरून गेला. मुरारबाजी धारातीर्थी पडला. तरीही मावळे काही माघारी हटले नाहीत. त्यांचा पराक्रम पाहून मुघल सैन्य अचंबित झाले होते. शेवटी मराठी मावळे देखील वीरगतीला प्राप्त झाले.

आता असेच चालू राहिल्यास स्वराज्य उभे राहू शकत नाही असा विचार करून शिवराय तह करण्याचे ठरवतात. शिवराय स्वतः मिर्झाराजे यांची भेट घेतात. स्वतःचा मनसुबा आणि स्वराज्याच्या हिताचे काम हाती घेतल्याचे देखील शिवराय समजावतात. मिर्झाराजे सर्व मान्य करतात पण तह करण्याचे सांगतात. त्या तहात ठरल्याप्रमाणे तेवीस किल्ले व त्याखालील चार लक्ष होनांचा मुलुख देण्याचे शिवराय मान्य करतात. 

“बादशाह तुम्हाला भेटून खुश होतील. नक्की बादशाहच्या भेटीला जा!” असे मिर्झाराजे शिवरायांना सुचवतात. मिर्झाराजे आणि दिलेरखान यांचे आक्रमण परतवण्यासाठी आणि स्वराज्याच्या सुरक्षिततेसाठी शिवराय बादशाहभेटीचा प्रस्ताव मान्य करतात आणि त्यासाठी स्वतः आग्र्याला जाऊन बादशाहची भेट घेऊ असे जयसिंग यांना कळवतात. 

छ.शिवाजी महाराज आणि बादशाह औरंगजेब आग्र्याची भेट | बादशाहच्या हातावर तुरी !Shivaji Maharaj and Baadshah Aurangzeb

मिर्झाराजे यांच्या शब्दावर विश्वास ठेऊन शिवराय बादशाह भेटीसाठी आग्र्याला पोहचतात. स्वतःबरोबर बाल संभाजीराजे आणि निवडक सरदारांना शिवराय आग्र्याला आलेले असतात. भेटीचा दिवस उजाडतो. त्या दिवशी बादशाह औरंगजेबचा पन्नासावा वाढदिवस असतो. बादशाह आता सर्व सरदार आणि शिवरायांच्या भेटीसाठी महालात येतो. 

सर्व सरदार मानाप्रमाने उभे केलेले असतात. त्यातच मराठ्यांना भिऊन अनेक वेळा परतलेला जसवंतसिंग राठोड हा सरदार शिवरायांच्या पुढे उभा असतो. शिवरायांना हा अपमान सहन झाला नाही. शिवरायांना वाटले, आपला मान बादशाहच्या बरोबरीचा आहे. आम्हीही राजे आहोत. आम्हाला सरदार समजले की काय? शिवराय रागारागाने तिथून निघून आपल्या निवासस्थानी येतात. घडलेला प्रसंग सर्वदूर पसरतो.

औरंगजेब ही संधी दवडणार नव्हता. त्याने शिवरायांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पहारा वाढवला. शिवरायांना कळून चुकले की आपण आता कैद झालो आहोत. औरंगजेब आपल्याला काही सोडणार नाही. शिवराय स्वराज्यात परतण्यासाठी अर्जही करतात पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. काहीही झाले तरी कैदेतून सुटलेच पाहिजे असा विचार करून शिवराय अगोदर निवडक साथीदारांना दक्षिणेत पाठवण्याची परवानगी मागतात. आता फक्त संभाजीराजे, हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर एवढेच जण तेथे राहणार होते. 

शिवराय आणखीनच हतबल होतील, अशा विचाराने औरंगजेब लगेच ती परवानगी देतो. त्यानंतर शिवराय आजारी असल्याचे ढोंग करतात. पोटात प्रचंड दुखत असल्याचे सोंग ही करतात. आजार बरा व्हावा म्हणून अनेक उपचार सुरू झाले पण शेवटी ढोंगच असल्याने आजार कसा काय बरा होईल!

आजार काही बरा होत नाहीये. आता साधू महात्म्यांच्या आशीर्वादाने बरा झालो तर झालो असा संदेश बादशाहकडे पाठवून साधू मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास शिवराय सुरुवात करतात. बादशाह परवानगी देतो पण मिठाईचा पेटारा जाताना व्यवस्थित तपासण्याचा आदेशही देतो. मिठाईचे पेटारे दररोज पाठवले जात होते. आता पहारेकरी पेटारे तपासून कंटाळले होते. ते सर्व पहारेकरी आता पेटारा उघडतही नसत.

शिवरायांना संधी सापडली. त्यांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले आणि मदारीला त्याची सेवा करण्यास सांगितले. एक पेटारा उघडून शिवराय त्यात बसतात आणि संभाजीराजे दुसरा पेटारा उघडून त्यामध्ये बसतात. पेटारे सुरक्षित ठिकाणी पोहचल्यानंतर शिवराय आणि संभाजीराजे बाहेर पडतात. विश्वासू साथीदार घोडे घेऊन आलेले असतात. इकडे हिरोजी आणि मदारी औषध आणायला जातो असे म्हणून तेही दोघे तिथून पळ काढतात. 

औरंगजेब बादशाहला ही बातमी समजताच त्याची तळपायाची आग मस्तकात शिरते. सर्वजण हतबल होऊन एकमेकांकडे बघत राहतात. पूर्णपणे वेष बदलून शिवराय पुढची वाटचाल करीत असतात. वाटेत दगा होऊ नये म्हणून शिवराय संभाजीराजेंना मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवतात. शिवराय थेट राजगडावर पोहचतात. दोन महिन्यांनी संभाजीराजे देखील राजगडावर सुखरूप येतात. अशा प्रकारे बादशाहाच्या हातावर तुरी देण्यात शिवराय यशस्वी झाले होते. 

गड आला पण सिंह गेला | तानाजी मालुसरे यांचा पराक्रम! Tanaji Malusare Information, Battle |

मिर्झाराजे जयसिंग यांस दिलेले तेवीस किल्ले परत घेण्याची वेळ आली होती. मोठमोठे आणि प्रचंड बळकट किल्ल्यांचा त्यामध्ये समावेश होता. कोंढाणा हा देखील त्यापैकीच एक! जिजाऊ माता कोंढाणा काबीज करण्याचा आग्रह शिवरायांसमोर ठेवतात. पुण्याजवळच हा किल्ला असल्याने स्वराज्यातच तो असला पाहिजे असे राजमाता जिजाऊंना वाटत होते.कोंढाणा हा अडचणीचा किल्ला होता. कोंढाणा   जिंकणे अवघड काम होते. 

तानाजी मालुसरे हा शिवरायांचा निष्ठावंत साथीदार! अगदी स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीपासून तानाजी शिवरायांसोबत होता. कोकणात महाडजवळ असणारे उमरठे हे त्याचे गाव! तानाजीचा मुलगा रायबा. रायबाचे लग्न करायचे ठरले होते. लग्न अगदी चार दिवसांवर येऊन ठेपले होते. महाराज आणि जिजाऊंना लग्नासाठी आमंत्रण दिले पाहिजे या हेतूने तानाजी स्वतः आणि शेलारमामा शिवरायांकडे येतात.

कोंढाणा जिंकण्याची जबाबदारी शिवरायांनी स्वतः जातीने घेतली असल्याने शिवराय लग्नाला येण्यास नकार कळवतात. तानाजी मालुसरे ताडकन उत्तर देतात,”हा तानाजी जिवंत असताना शिवाजींनी कामगिरी फत्ते पाडायची? कोंढाणा हा असा जिंकून स्वराज्यात सामील करवून घेतो.” शिवराय आणि जिजामाता रायबाचे लग्न उरकून घ्या असा सल्ला देतात परंतु तानाजी त्यावर म्हणतात,”आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे!”

कोंढाणा किल्ल्यावर उदेभान नावाचा किल्लेदार होता. तो ही मोठा पराक्रमी होता. गडाला दोन दरवाजे होते. दोन्ही ठिकाणी पक्का बंदोबस्त होता. पश्चिमेला असलेल्या उंच कड्यावरून गडावर गेल्यास फायदेशीर ठरेल, कारण तेथे कोणताच पहारा नव्हता. असा बेत ठरल्यानंतर तानाजी आपला धाकटा भाऊ सुर्याजीला कल्याण दरवाजावर पाचशे मावळे सोबत देऊन पाठवतो. स्वतः तानाजी तीनशे मावळे घेऊन कड्यावरून चढाई करण्याचे ठरवतो. 

वेळ रात्रीची होती. उंच कडा चढण्यासाठी मोठ्या हिमतीची गरज होती. निवडक मावळे कड्यावरून चढू लागले. वर पोहचल्यावर त्यांनी दोर झाडाला बांधला. दोराचे दुसरे टोक खाली सोडले. त्यावरून तानाजी आणि सर्व मावळे कडा सर करून गेले. गडावर पोहचताच आक्रमण सुरू झाले. उदेभान जागा झाला. सर्व सैनिक सुद्धा जागे झाले. सूर्याजी तिकडे दरवाजावर वाट पाहत उभा होता. मावळ्यांनी तो दरवाजा उघडला. सूर्याजी आणि पाचशे मावळे देखील तुटून पडले. एकच गोंधळ, एकच जल्लोष उडाला. 

हर हर महादेवच्या गर्जना होऊ लागल्या. तलवारी आणि ढाली एकत्र खणाणू लागल्या. उदेभान आणि तानाजी आता एकत्र भिडले. दोघात तुंबळ युद्ध झाले. दोघेही मोठे पराक्रमी वीर! तानाजीची ढाल तुटली. त्याने हाताला शाल गुंडाळून युद्ध सुरू ठेवले. दोघेही एकमेकांच्या विरोधात जबर जखमी झाले. दोघेही धारातीर्थी पडले. तानाजी मालुसरे पडला. आपला सरदार पडला म्हणून मराठी मावळे सैरावैरा झाले. 

आता सूर्याजी तिकडून दाखील झाला. त्याने पुन्हा मावळ्यांना एकत्र लढण्यासाठी प्रवृत्त केले. पळून जाऊन काहीही उपयोग नाही. मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. “आता कड्यावरून उडी मारून मरा किंवा लढून मरा! आपल्याला ही लढाई जिंकलीच पाहिजे.” असे म्हणत पुन्हा एकदा तुंबळ युद्ध सुरू झाले. मावळ्यांचा हा पराक्रम त्यांना विजय देऊन गेला. गड आता मराठ्यांनी काबीज केला. 

तानाजी मालुसरे गेल्याची बातमी कळताच जिजाऊ आणि शिवरायांना प्रचंड दुःख झाले. सिंहासारखा शुर गडी धारातीर्थी पडला. कोंढाणा काबीज झाला पण तानाजीला गमावला या दुःखात शिवरायांचे उद्गार खूप मोलाचे ठरले, “गड आला पण सिंह गेला!” तानाजीच्या सिंहासारख्या पराक्रमाचा कोंढाणा गड साक्षीदार होता. त्यानंतर कोंढाण्यास नाव देण्यात आले सिंहगड! ही घटना १६७० मध्ये घडली. उमरठे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न लावून दिले. 

शिवरायांचा राज्याभिषेक ! Shivaji Maharaj Rajyabhishek

स्वराज्याची प्रतिज्ञा पूर्णत्वाला आली होती. स्वतंत्र स्वराज्य उभे राहिले होते. अनेक मावळ्यांना स्वतःचे प्राण त्यासाठी गमवावे लागले होते. अनेक प्रांतप्रदेशात महाराष्ट्र देखील उठून दिसावा आणि स्वतंत्र मराठा स्वराज्य असल्याचे सर्वांनी मान्य करावे यासाठी शिवराय स्वतःचा राज्याभिषेक घेण्याचे ठरवतात. मराठी रयतेचा स्वराज्यधिष्ठीत राजा म्हणून एकदा घोषणा झाली की मग सर्व परकीय सत्ता आक्रमण करताना दहावेळा विचार करतील आणि स्वराज्याची स्वतंत्र कार्य व्यवस्था देखील राबवता येईल, असा विचार शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा घेण्यामागे होता. 

शिवरायांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाची निवड केली. स्वराज्य सांभाळणे आणि शत्रूंचा बिमोड करणे रायगडावरून खूपच सोप्पे होते. राज्याभिषेक सोहळ्यासाठी सोन्याचे सिंहासन तयार करण्यात आले. अनेक सरदार, राजे, मावळे, विश्वासू साथीदार, ब्राम्हण पंडीत अशा सर्वांना निमंत्रणे धाडण्यात आली. राज्याभिषेक करण्यासाठी काशीचे प्रसिद्ध पंडित गागाभट्ट यांना बोलावण्यात आले. 

राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. असंख्य लोकांची गर्दी जमली होती. वाद्य वृंद वाजू लागले. गवई गाऊ लागले. शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले. त्यांच्या शिरावर छत्रचामरे धरण्यात आली. गागाभट्ट स्वतः सोन्याचा कलश आणि त्यात सात पवित्र नद्यांचे पाणी घेऊन उभे होते. शिवरायांच्या डोक्यावर ती घागर धरण्यात आली. गागाभट्ट मंत्र म्हणू लागले. घागरीच्या छिद्रातून शिवरायांवर जलाभिषेक झाला.

 राजमाता जिजाऊ आणि शिवरायांचे स्वप्न तसेच अखंड मराठी मनाचे स्वप्न साकार झाले होते. स्वराज्याला पहिला छत्रपती राजा शिवाजी मिळाला होता. जलाभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराज जिजाऊंना भेटले. त्यानंतर सिंहासनावर बसताच सर्व उपस्थित रयतेने “शिवाजी महाराज की जय!” असा एकच जयघोष केला. गागाभट्ट यांनी सोन्यामोत्याची झालर असणारे छत्र शिवरायांच्या डोक्यावर पकडले आणि “क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती यांचा विजय असो”, असा जयजयकार केला.

हा राज्याभिषेक १६७४ मध्ये करण्यात आला. निरनिराळ्या प्रदेशाचे वकील आणि राज्यकर्ते या समारंभास उपस्थित होते. इंग्रजांनी ऑक्सिंडेन नावाचा आपला वकील नजराणा घेऊन पाठवला होता. शिवरायांची किर्ती आता सर्वदूर पसरली होती. 

शिवरायांची दक्षिण मोहीम! 

राज्याभिषेकानंतर, काही काळानंतर राजमाता जिजाऊ यांचे निधन झाले. शिवरायांचा खरा मार्गदर्शक आणि गुरू हरपला. आता स्वराज्य रक्षण आणि विस्तार गरजेचा होता. कर्नाटक प्रांतावर स्वारी करण्याचे शिवरायांनी ठरवले. आदिलशाही आता अगोदर होती तेवढी मजबूत राहिली नव्हती. मुघल आक्रमण थोपवून धरणे आणि लढा देणे त्यासाठी दक्षिण भारतातला विस्तार गरजेचा होता. 

शिवरायांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागीर सांभाळून होते. वडिलांची जहागिरी देखील त्यांच्याकडेच होती. त्यातील थोडासुद्धा वाटा शिवरायांना देऊ केला नव्हता. शिवरायांशी त्याचे मतभेद होते. तरीही त्याची भेट घेऊन स्वराज्य वाढीसाठी काही मदत झाली तर चांगलेच होईल, असा हेतू ठेऊन शिवराय स्वारीस निघाले. 

दक्षिण दिग्विजय करण्याअगोदर गोवळकोंड्याचा अबुल हसन कुतुबशहा याने शिवरायांना भेटण्याचे निमंत्रण दिले. शिवरायांनी ते स्वीकारले. गोवळ कोंड्यात प्रवेश होताच शिवरायांचे जंगी स्वागत झाले. शिवरायांची किर्ती सर्वदूर पसरली होती. सर्व प्रजा स्वराज्याच्या राजाला बघण्यासाठी आतुरली होती. कुतुबशहाने राजांच्या सेवेत कोणतीच कमी पडू दिली नाही. या भेटीनंतर शिवराय दक्षिण मोहिमेसाठी निघाले. 

चेन्नईच्या दक्षिणेस असणारा जिंजीचा किल्ला रायगडाप्रमाणे प्रचंड आणि मजबूत होता. त्याला वेढा देऊन तो गड प्रथम शिवरायांनी ताब्यात घेतला. त्यानंतर वेलुरचा किल्ला कित्येक महिन्यांच्या परिश्रमानंतर जिंकला. कर्नाटकात एकूण वीस लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि कित्येक छोटे मोठे किल्ले जिंकत शिवरायांनी स्वराज्याच्या सीमेत नक्कीच वाढ केली होती.

 महाराजांनी त्यानंतर व्यंकोजी राजांची भेट घेण्याचे ठरवले. व्यंकोजी राजे स्वतः राजांच्या भेटीस आले. काही दिवस शिवरायांबरोबर व्यंकोजी राहिले. स्वराज्यकार्यात व्यंकोजी राजांची मदत असावी, असा प्रस्ताव देखील शिवरायांनी अनेक वेळा व्यंकोजी समोर ठेवला. व्यंकोजी राजे तरीही शिवरायांवर नाराज होते आणि एक दिवस काहीही न बोलता तिथून निघून गेले. याउलट शिवरायांच्या फौजेवर त्याने पलटून हल्ला केला. शिवरायांनी यावेळेस त्याचा चांगलाच समाचार घेतला. त्याचा पराभव करीत त्याची जागा दाखवून दिली. शिवराय दक्षिण मोहीम गाजवून रायगडावर परतले. त्यानंतर लगेच जंजिऱ्याच्या सिद्दी विरूध्द आरमारी मोहिमेसाठी शिवरायांना जावे लागले. 

शिवराय अथक पस्तीस वर्षे स्वराज्य निर्मितीसाठी लढले. त्यांना कधीही विश्रांती मिळाली नाही. आपल्या उभ्या आयुष्यात त्यांनी अनेक पराक्रम गाजवले. त्यांची गाथा सर्वत्र ऐकली जाऊ शकत होती. रायगडावर ३ एप्रिल १६८० रोजी अशा नरवीर युगपुरुषाची प्राणज्योत मालवली. संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. एक महान आणि थोर राष्ट्रपुरुष म्हणून त्यांची ख्याती तेव्हाही होती, आजही आहे आणि भविष्यातही असेल. असा हा प्रजादक्ष राजा, राष्ट्रपुरुष शिवाजी महाराज “छत्रपती” म्हणून अनंत काळासाठी अजरामर झालेला आहे. या महान राजास त्रिवार मुजरा!

छत्रपती शिवाजी महाराज माहिती (Chhatrapati Shivaji Maharaj Information in marathi) व त्यांच्या जीवनावरील हा लेख तुम्हाला कसा वाटला? नक्की कळवा. शिवाजी महाराजांबद्दल इतर माहिती हवी असल्यास पुढील लिंक्सवर क्लिक करून ती माहिती मिळवा.

वाचा शिवजयंती बद्दल संपूर्ण माहिती!
शिवप्रताप दिन संपूर्ण माहिती

The post छत्रपती शिवाजी महाराज माहिती । Shivaji Maharaj Information in Marathi appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/shivaji-maharaj-information-in-marathi/feed/ 1 1698