क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले। Savitribai Phule Information in Marathi |

भारतीय स्त्रीच्या समस्यांना वाचा फोडून त्या सोडवणाऱ्या व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात स्त्रीला देखील महत्वाचे स्थान मिळवून देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज ३ जानेवारीला जयंती असते. जयंती निमित्त आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय Savitribai Phule Information in Marathi (सावित्रीबाई फुले यांची माहिती मराठीमध्ये)

सावित्रीबाई फुले – संपूर्ण माहिती! Savitribai Phule Marathi Mahiti

स्त्रीचे शिक्षण आणि तिचा उद्धार करण्यात आपले संपूर्ण जीवन समर्पित करून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समाजविकासाच्या कामात देखील सहकार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ साली सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झाला. त्यांचा विवाह लहानपणीच म्हणजे वयाच्या फक्त ९ व्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. लहानपणापासून सोसलेल्या जातीयतेच्या वेदना आणि रुढीपरंपरा यांचा दाह सहन करत दोघे मोठे होत होते. शिक्षणाचं महत्त्व त्यांना लहाणपणीच कळलं होतं.

महात्मा ज्योतिबा फुले स्वतः शिक्षण घेऊन समाजकार्यात आरूढ झाले. त्यांनी पुन्हा सावित्रीबाई फुले यांना देखील शिक्षित केले. कर्मकांडाला आणि मानवतेच्या विरूध्द असणाऱ्या रुढी परंपरांना सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांचा कडकडून विरोध होता. हे सर्व जर थांबवायचे असेल तर समाजाला शिक्षणाची गरज आहे याची जाणीव त्यांना झाली. प्रथमतः त्यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली. 

Savitribai Phule Social Work । सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य:

मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ आणि प्रसार करत असताना या दाम्पत्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण व समाजकार्यासाठी घराबाहेर पडावे लागले. ज्योतिरावांच्या कार्यात त्यांनी पूर्णपणे साथ देण्याचा निश्चय त्यांनी केला होता. सावित्रीबाई फुले अगोदर अशिक्षीत होत्या. त्यांना ज्योतिराव फुले यांनी घरी शिकविले व नंतर शाळेत शिक्षण देण्याचे कार्य सावित्रीबाईंनी केले.

इस १८४८ ते १८५२पर्यंत त्यांनी एकूण १८ शाळांची स्थापना त्यांनी केली. त्यांच्या शाळेची नोंद सरकारी दफ्तरात झाली त्यावेळी १२ फेब्रुवारी १८५२ मध्ये मेजर कॅन्डी यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळांना सरकारी अनुदान देण्याचे देखील जाहीर केले.

समाजात बालविवाहामुळे अनेक मुली गरोदर असताना विधवा झाल्या होत्या. फुले दाम्पत्याने १८६३ रोजी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून एक प्रसूतिगृह सुरू केले. केशवपनाविरुद्ध नाभिकांचा संप कामगार नेते नारायण लोखंडे यांनी घडवून आणला. त्यामागे सावित्रीबाईंचे सहकार्य आणि प्रेरणा त्यांना लाभली. विधवा आईच्या पोटी जन्म घेणाऱ्या यशवंतला दत्तक घेऊन सावित्रीबाईंनी त्याला शिक्षण दिले व त्याला डॉक्टर बनवले. जुलै १८८७ मध्ये ज्योतिरावांना पक्षाघाताचा आजार झाला. त्यांच्या आजारपणात सावित्रीबाईंनी त्यांची सेवा केली.

Savitribai Phule information

२८ नोव्हेंबर १८९० रोजी ज्योतिरावांचे त्या आजारात निधन झाले. अत्यंयात्रेच्यावेळी जो टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळत असल्याने दत्तक मुलगा यशवंतला जोतीरावांच्या पुतण्यांनी विरोध केला. त्यावेळी स्वतः सावित्रीबाईंनी टिटवे धरले. अंत्ययात्रेच्या अग्रभागी त्या चालल्या आणि स्वत:च्या हाताने ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला. हे कार्य तेव्हा खूपच बंड घडवून आणणारे होते.

इ.स. १८९६-९७ दरम्यान पुणे व परिसरात प्लेगची साथ आली होती. ह्या जीवघेण्या आजाराने अनेकांचा जीव जात होता. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यानंतर ब्रिटिश शासनाने जबरदस्ती रुग्णांना वेगळ्या ठिकाणी स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला. या वेळी रुग्णांचे होणारे हाल होते. सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ  दवाखाना सुरू केला. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला.

यातच १० मार्च १८९७ रोजी वयाच्या ६६व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अशा या भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, आद्य शिक्षिका, क्रांतिज्योती ‘सावित्रीबाई फुले‘ यांच्या १९०व्या जयंती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! 

आशा करतो हि Savitribai Phule Information in Marathi तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

हे सुद्धा पहा- GST Information in Marathi | जीएसटी म्हणजे काय?

Leave a Comment

close