माझे आवडते फळ सिताफळ – मराठी निबंध | Sitafal Nibandh Marathi |

प्रस्तुत लेख हा माझे आवडते फळ सिताफळ (Majhe Avadte Fal Sitafal Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. सिताफळ खाण्याचे फायदे आणि त्याचे आहारातील महत्त्व या निबंधात स्पष्ट करण्यात आलेले आहे.

सिताफळ – मराठी निबंध | Custard apple Essay In Marathi |

फळांतून आपल्याला ऊर्जा आणि आवश्यक असणारी सर्व पोषकतत्त्वे मिळत असतात. फळांचे पचन लगेच होत असल्याने शरीराला त्यांचे सेवन हे अत्यंत लाभदायी ठरते. त्यामुळे मी फळे खाण्यासाठी नेहमीच उतावीळ असतो. मला तशी सर्वच फळे आवडतात परंतु सिताफळ हे माझे अत्यंत आवडते असे फळ आहे.

सिताफळ मूळचे वेस्ट इंडीज देशातील आहे. त्याची लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत होऊ शकते परंतु उष्ण कटिबंधात सिताफळाचे प्रमाण जास्त आढळते. सिताफळाच्या झाडाची उंची ही बारा ते पंधरा फूट एवढी असते. सिताफळ झाडाचे खोड हे मध्यम आकाराचे असते.

आकाराने गोल असणाऱ्या सिताफळाचा रंग हिरवा असतो. त्याचे आवरण खवलेयुक्त असून गाभा हा पांढऱ्या रंगाचा असतो. सिताफळात काळ्या रंगाच्या बिया असतात. प्रत्येक बीजाला पांढऱ्या गाभ्याचे आवरण असते. सिताफळ हे चवीला गोड असून त्याचे सेवन हे शरीरास आरोग्यदायी ठरते.

सिताफळ हे घरगुती खाण्यात वापरत असल्याने त्याची लागवड आपण अंगणात किंवा शेतात करत असतो. सध्या त्याचे सेवन वाढल्याने भारतातील काही भागांत त्याची लागवड ही व्यावसायिक दृष्टीने देखील केली जात आहे. बाजारात विक्रीला आणलेली सिताफळे ही साधारण आकारापेक्षा मोठी असतात.

महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटक व तामिळनाडू या राज्यांत सिताफळाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. महाराष्ट्रातील संभाजीनगर, सोलापूर, परभणी व नाशिक या जिल्ह्यांत सिताफळाची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात.

सिताफळाच्या आकारावरून त्याची जात ठरवली जाते. बालंगर, मॅमोथ, बुलक हार्ट अशा विविध प्रकारच्या जातींची सिताफळे सध्या अस्तित्वात आहेत. सिताफळाचे डोळे उघडल्यावर म्हणजे त्याच्या खवल्यांची कडा थोडी लालसर झाल्यावर त्याला पिकवण्यासाठी हवाबंद ठिकाणी गवतात किंवा धान्यात ठेवले जाते.

सिताफळात कॅल्शियम व लोह विपुल प्रमाणात आढळते. तसेच बी-१, बी-२ आणि सी या प्रकारची जीवनसत्त्वे देखील असतात. सिताफळ पिकल्यावर त्याचे आवरण काढून त्यातील गर खाल्ला जातो. सिताफळ हे उत्पादन क्षेत्रांत देखील वापरात आणले जाते. पेय, कँडी व आईसक्रीम अशा स्वरूपांत सिताफळाची उत्पादने प्रसिध्द आहेत.

सिताफळ नियमित सेवन केल्याने शरीरात थकवा जाणवत नाही. सिताफळ हे शीत फळ असल्याने ते पित्तशामक व रक्तवर्धक आहे. सिताफळाचे अतिसेवन केल्याने पोटात वायू तयार होतो. जुलाब, सर्दी, खोकला व ताप असे आजार जडण्याची शक्यता असते.

पौराणिक कथांनुसार भगवान राम व देवी सिता वनवासात असताना देवी सिता या फळाचे सेवन करत असल्याने या फळाला सिताफळ असे संबोधले जाते, अशी मान्यता आहे. याउलट वैज्ञानिक तथ्य पाहता थंड ऋतूत उत्पादन होत असलेल्या सिताफळाच्या शीत प्रकृतीमुळे त्याला शीत – फळ म्हणजेच सिताफळ असे नाव पडलेले आहे.

सिताफळ झाडाची पाने ही औषधी गुणधर्माची आहेत. तसेच सिताफळाच्या बियांचे तेलसुध्दा काढले जाते. म्हणजेच सिताफळ हे अत्यंत बहुपयोगी असे फळ आहे. आमच्या शेतात सिताफळाची पाच झाडे आहेत. प्रत्येक वर्षी सिताफळाच्या ऋतूत मी भरपूर सिताफळे खात असतो.

तुम्हाला माझे आवडते फळ सिताफळ हा मराठी निबंध (Majhe Avadte Fal Sitafal Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment