नेत्रदान हेच श्रेष्ठ दान – मराठी निबंध | Netra Dan Hech Sreshth Dan Nibandh |

मानवी शरीराचा कोणताही अवयव दान करणे हे अत्यंत पुण्याचे काम मानले जाते. एखाद्या गरजू व्यक्तीला कोणत्या अवयवाची गरज असेल तर त्याला तो उपलब्ध होण्यासाठी इतर लोकांनी त्या अवयवाचे कधी ना कधी दान देणे गरजेचे आहे.

काही अवयव हे आपण जिवंतपणी देऊ शकतो तर काही अवयव हे आपण मृत्यूनंतर द्यावयाचे असतात. अवयवाचे दान हे आपल्या मृत्यूनंतर होत असल्याने त्या पद्धतीची करुणामय वृत्ती सर्वांनी दाखवणे अत्यावश्यक ठरते.

इतर अवयवांप्रमाणेच आपले डोळे हे देखील दान दिले जाऊ शकतात. आपले डोळे हे आपल्या मृत्यूनंतर कोणाची तरी दृष्टी बनू शकतात याची जाणीव समाजमनात रुजणे गरजेचे आहे. याच आशयाचा प्रस्तुत लेख हा नेत्रदान हेच श्रेष्ठ दान (Netra Dan Hech Sreshth Dan Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे.

नेत्रदान मराठी निबंध | Eye Donation Essay In Marathi |

नेत्रदान म्हणजे डोळ्यांचे दान! स्वेच्छेेने आपण आपल्या डोळ्यांचे दान हे आपल्या मृत्युनंतर करू शकतो. आपले डोळे हे एखाद्या दृष्टिहीन व्यक्तीला उपयोगी पडू शकतात आणि त्याला नवीन दृष्टी प्राप्त होऊ शकते. इतर अवयवांपेक्षा डोळ्यांचे दान हे श्रेष्ठ मानले जाते कारण डोळे प्राप्त झालेल्या व्यक्तीला संपूर्ण जग नव्याने अनुभवता येते.

शरीरात इतर अवयव नसतील तर जीवनातील अनुभव आणि चलनवलन थोड्या प्रमाणात कमी होते, परंतु डोळे नसल्यास जीवनात खूपच फरक पडतो. दृष्टिहीन व्यक्तीला सर्वत्र अंधारच अंधार जाणवतो. तो व्यक्ती सुंदर अशा बाह्य सृष्टीला पाहू शकत नाही. निसर्गाचा, जीवनाचा, मानवी नात्यांचा मनमुराद आनंद तो घेऊ शकत नाही.

दृष्टिहीन व्यक्तीस नेत्र प्राप्ती झाल्यास त्याच्या जीवनात एक नवीन उमेद जागू शकते. नवनवीन शक्यतांचा तो विचार करू शकतो. संपूर्ण शरीर व मनाचा अगदी योग्य वापर त्याच्याकडून होऊ शकतो. त्यामुळे नेत्रदान केले जाणे हे अगदी महत्त्वाचे पुण्यकर्म म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

आपण आपले डोळे हे जिवंतपणी अर्पण करू शकत नाही. कायद्यानुसार मृत्युनंतरच नेत्रदान करण्यास परवानगी आहे. आपण मृत्यू पावल्यानंतर आपल्याला डोळ्यांचा काहीही उपयोग होणार नसतो, आपल्यासाठी ते काहीही कामाचे उरत नाहीत. तेच डोळे एखाद्या अंध व्यक्तीस मिळाले तर त्याचे जीवन मात्र उजळून निघू शकते.

नेत्रदान करण्याबाबत जनजागृती व्हावी आणि संपूर्ण जगभरातील लोकांना नेत्रदानाचे महत्त्व कळून यावे यासाठी जागतिक दृष्टिदान दिन हा १० जून रोजी साजरा करण्यात येतो. त्या संदर्भात मोठमोठे फलक जागोजागी उभारण्यात येतात. तसेच सोशल मीडियावर नेत्रदानाचे महत्त्व सांगणारे संदेश देखील पाठवले जातात.

नेत्रदान करताना विशेष काळजी घ्यावी लागते. नेत्रदान करणाऱ्या व्यक्तीला कोणताही डोळ्यांचा आजार नसावा तसेच मृत्यूनंतर अवघ्या सहा तासांच्या आतच नेत्रदान केले जावे. मृत्युनंतर डोळ्यांना इजा पोहचू नये याबाबत काळजी घ्यावी लागते. त्यासाठी सूक्ष्मजंतू नाशक औषधाचे थेंब डोळ्यांत टाकले तरी चालू शकते.

नेत्रदानाचे व्यक्तिगत पातळीवर फायदे असूनही त्याबाबत सामाजिक जाणीव व जागरूकता जाणवत नाही. त्यासाठी धार्मिक व सामाजिक धारणा जबाबदार आहेत. तसेच नेत्रदानाविषयी सर्व प्राथमिक व विस्तृत स्वरूपाची माहिती व सुविधा सर्वत्र उपलब्ध नाहीत.

नेत्रदान केल्याने आपले डोळे हे दृष्टी बनून इतरांच्या आयुष्यात नवीन प्रकाश बघू शकतील. इतरांच्या जीवनात दृष्टी बनून राहण्यासाठी आपल्याला संवेदनशील व करुणामय व्हावेच लागेल. त्यासाठी नेत्रदान या श्रेष्ठ दानाचा विचार करूयात आणि नक्कीच एका नवीन सामाजिक दृष्टीची सुरुवात करुयात.

तुम्हाला नेत्रदान हेच श्रेष्ठ दान हा मराठी निबंध (Netra Dan Hech Sreshth Dan Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment