विरोधक नाही तर सहाय्यक बना । विरोध सारखाच का करायचा?

विरोध हा शब्द आपण सारखाच ऐकत असतो. आपले मत भिन्न असले किंवा आपला दृष्टिकोन वेगळा असला की समोर घडणाऱ्या परिस्थितीला किंवा बोलणाऱ्या व्यक्तीला आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे विरोध करत असतो.

घर असेल किंवा कामाचे ठिकाण, स्वतःप्रमाणे सगळे जगतीलच किंवा वागतीलच कसे? घरातील नाती आणि कामातील परिस्थिती ही नेहमी आपल्या जबाबदारीतून आणि प्रामाणिकपणे काम करण्यातून सुधारत जात असते.

त्यामध्ये आपण चुका शोधल्या किंवा मदत न करता नुसता विरोध केला तर ती परिस्थिती कोणालाच न पटणारी असते. मग घरातील साफसफाई, मुलांच्या सवयी, जेवण, कामातील व्यक्तींचे निर्णय अशा छोट्या गोष्टींतून देखील आपला विरोध सतत पुढे येत राहतो.

जगण्याची उमेद आणि कुतूहल नाहीसे होत गेल्यास आपल्याला आपलंच व्यक्तिमत्त्व खटकतं. आपले काम, अभ्यास स्वतःला नुसता बोजा वाटू लागतो. आपण गुलाम असल्याची जाणीव होऊ लागते. या सर्व कटू अनुभवातून बाहेर निघण्याचा मार्ग आहे. त्याचा बारकाईने विचार करावा लागेल.

सर्वप्रथम आपण जाणले पाहिजे की आपली उदासी आणि प्रत्येक गोष्टीला विरोध ही फक्त मानसिक स्थिती आहे. आपल्या वागण्यातून अजाणतेपणे आंतरिक विरोधाला सातत्य मिळाल्याने आपली मानसिक स्थिती ही देखील हळूहळू विरोधक बनत जाते.

तुम्हाला विरोधक न होता सहाय्यक व्हायचे असेल तर सर्वप्रथम स्वावलंबी बना. स्वतःची कामे स्वतः करा. मग कळेल की इतर नातेवाईक किंवा कामातील लोक आपल्या जीवनात कितीतरी महत्त्व ठेवतात. आपली कितीतरी कामे ते न सांगता पार पाडतात.

स्वावलंबी बनण्यामुळे तुम्ही इतरांचा स्वतःसाठी वापर करून घेणार नाही. उलट त्यांनाच आपली काही मदत होते का? याकडे तुमचे लक्ष असेल. त्यानंतर तुमच्याशी निगडित सर्व व्यक्तींबद्दल तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींतून व प्रसंगांतून आश्चर्य, आनंद, आणि कुतूहल व्यक्त कराल.

दुसरी पायरी म्हणजे ज्यांची मदत होते त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगा. त्या कृतज्ञतेतून हळूहळू दुसऱ्या व्यक्तींबद्दल विरोध कमी होऊ लागेल. प्रेम, स्नेह, आपुलकी या गुणांची वाढ होईल. कृतज्ञतेमुळे आपल्याला इतर व्यक्तींबद्दल आदर वाढत जातो, याची जाण होईल.

तिसरी पायरी म्हणजे स्वतःला समाधानी स्थितीत ठेवणे. मन शांत, समाधानी व आनंदी असेल तर आपल्याला इतर सर्वजण आणि सर्व परिस्थिती छान वाटतात. त्यांच्याबद्दल विरोध राहतच नाही. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे जोडले जाणे आणि आनंदाचे क्षण फुलवणे हाच आपला स्वभाव बनत जातो.

खाली दिलेल्या सूचनांचा नक्की उपयोग करून पाहा – (मनातील विरोध नक्कीच कमी होईल आणि समस्यांचा विचार करून रडत बसण्यापेक्षा त्या सोडवण्यावर तुमचा भर असेल.)

१. स्वावलंबी बनणे. (स्वतःची कामे स्वतः करणे, स्वतःची जबाबदारी ओळखणे)

२. नातेवाईक, मित्र, स्नेही या सर्वांबद्दल कृतज्ञता बाळगणे.

३. स्वतःला शांत आणि समाधानी मनःस्थितीत ठेवणे.

Leave a Comment